उत्तराखंडात जो काही महाप्रलय आलाय तो उत्तराखंडाच्या निर्सगाशी विकासाच्या नावाखाली खेळलेला खेळ आहे. या खेळात सरकार, भांडवलदार, बिल्डर सारेच सामील आहेत. त्यांच्याच चुकांमुळे ही इतकी मोठी आपत्ती ओढवली आहे. नदी वाचवा, धरणं वाचवा, जंगलं वाचवा, जमिनी वाचवा असं म्हणणार्यांना या सार्यांनी वेडं ठरवलं. इतकंच कशाला, या आंदोलनात स्वामी निगमानंद सारख्या व्यक्तिला आपले प्राणही गमवावे लागलेत. उत्तराखंडात जे घडलं त्याची कारणं तपासायला हवीत. नदीचं पाणी सामावून घेण्याची कपॅसिटीच उरली नसेल तर तिथल्याच काय कुठल्याही नदीचं पाणी असंच उफाळून येणार. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या भागांमध्ये जेव्हा जेव्हा पॉवर प्रोजेक्ट बनवले गेले तेव्हा तेव्हा पर्यावरणवाद्यांनी, आम्ही सर्वांनी सरकारला कल्पना दिली होती. यातील तीन प्रोजेक्ट्स मंत्रालयानी थांबवलीदेखील. पण तरीही जो खेळ खेळला गेला तो इतका भीषण होता ज्याचे परिणाम आज आपल्यासमोर आहेतच.
उत्तराखंडात आलेल्या या संकटाला आणखी एक कारण जबाबदार आहे. ते म्हणजे या भागांमध्ये पर्यटनाच्या नावाखाली जे काही उभं केलंय ते संपूर्ण काम चुकीचं आहे. या चुकीच्या कामांमुळेच आज महापुरात इथली गावंच्यागावं नेस्तनाबूत झालीत. इथल्या नद्यांना आलेल्या महापुरात जे वाहून गेले ते गेले. ते काही पुन्हा परत येणार नाहीत. पण जी गावं या पुराच्या तडाख्यात सापडली आहेत त्या गावांकडे कुणाचंच लक्ष नाहीय. त्यांना सोयीसुविधा कोण पुरवणार? तसंच नवीन उत्तराखंड बनवणार्यांचा विचारच होत नाहीय. स्थानिक लोकांचा विचार करूनच या भागांचा विकास व्हायला हवा. कारण चुकीच्या विकासाच्या धोरणामुळे इथल्या स्थानिक लोकांचं भांडवलच संपत असेल तर तो तसला विकास काय उपयोगाचा? या संकटात जे स्थानिक लोक उद्ध्वस्त झालेत त्यांचं योग्यप्रकारे पुनर्वसन झालं पाहिजे. कारण या संकटाला ते जबाबदार नाहीत. ही चूक सर्वस्वी सरकारची आहे. त्यामुळे आता तरी या भागांचा विकास हा स्थानिकांना गृहीत धरून व्हायला हवा, पर्यटनाच्यादृष्टीने नव्हे! त्यांचे मूलभूत अधिकार, सोयीसुविधा त्यांना मिळायलाच हव्यात.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला यानिमित्ताने मांडावासा वाटतो. तो म्हणजे, उत्तराखंडात इतके लोक का दगावले याची नेमकी कारणंही शोधली गेली पाहिजेत. धार्मिक स्थळाच्या नावाखाली लाखो लोक अशाप्रकारे जमा करणं हेही चूक आहे. आता तिथे यज्ञ वगैरे केले जात आहेत. पण तसे यज्ञ करून काय होणार? कारण वेडवाकडं झाल्यावर देव काहीच करत नाही. जे काही करायचं असतं ते माणसांनाच करायचं असतं. म्हणूनच अजूनही यासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. धार्मिक स्थळांवर मोठ्या संख्येने लोक जमा होतात. अशावेळी त्या ठिकाणी जेव्हा दुर्घटना घडते तेव्हा तितक्याच मोठ्या संख्येने माणसं मृत्युमुखी पडतात. आपल्याकडच्या अनेक धार्मिक स्थळांवर अशा घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. नव्हे, त्या वारंवार घडतच आहेत. कुंभमेळ्याची घटना ताजी आहेच. नुसत्या चेंगराचेंगरीतही लोक मरताहेत. हे खूपच भयानक आहे. म्हणूनच हे सारं थांबवायचं असेल आणि नाहक होणारी मनुष्यहानी रोखायची असेल तर सर्वप्रथम सगळ्याच धार्मिक स्थळांवर मर्यादा घातल्या गेल्या पाहिजेत.
– मेधा पाटकर