केदारनाथ, बद्रीनाथ, हृषिकेश, हरिद्वार हा सगळा परिसर देवभूमी म्हणून ओळखला जातो. याच देवभूमीत यंदा निसर्गाचा कोप झाला आणि गंगेने आपला रुद्रावतार दाखवला. हजारोंना आपले प्राण गमवावे लागले. जेव्हा भगीरथाने भगवान शंकराकडे गंगा धरतीवर सोडण्याची विनंती केली आणि त्यानंतर गंगा जेव्हा भूतलावर अवतरली, त्यावेळी तिचं ते रौद्ररूप आणि तिचा तो वेग थांबवणं भगीरथाला शक्य झालं नव्हतं, असे काही दाखले आपल्याला पुराणात वाचायला मिळतात. तसाच काहीसा प्रकार इथे यंदा केदारनाथच्या महाप्रलयात पाहायला मिळाला. पण नेहमीच इथे येणार्या भक्तांना विचाराने प्रेरित करून आपल्याकडे आकर्षित करून आपला शिष्य आणि भक्तसंप्रदाय वाढवू पाहणारे तथाकथित धर्मगुरू मात्र या भक्तांच्या मदतीला धावून आल्याचं चित्र फारसं कुठे दिसलं नाही. मग हे सगळे बाबा आहेत कुठे?

केदारनाथ परिसराच्या इतिहासात कधीही न भूतो न भविष्यती अशी हानी इथे झाली. नेहमीच हा सगळा परिसर अनेक बाबांच्या मठांनी आणि त्यांनी बांधलेल्या धर्मशाळांच्या इमारतींनीच गजबजलेला दिसतो. पण कठीण परिस्थितीत हे सगळे बाबा होते कुठे? कुणीही समोर येऊन इथे अडकलेल्या भक्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला नाही की, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचतेय, कशावर अवलंबून राहू नका, असं म्हणून त्यांचं सांत्वन करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला नाही. का होतं असं? मग अशा बाबांना आणि त्यांनी दिलेल्या लंब्याचौड्या प्रवचनांना आपण भुलतो आणि ते सांगतील तसं करू लागतो. परंतु अशा कठीण प्रसंगी आपल्या भक्तांच्या किंवा अनुयायांच्या मदतीला हे सगळे का धावून आले नाहीत?

योगगुरू बाबा रामदेव यांचा मुख्य आश्रम तर काही तासांच्या अंतरावर असलेल्या हरिद्वारमध्ये आहे. मग तिथे वास्तव्य करणार्या बाबा रामदेव यांनी खुद्द बाहेर येऊन का नाही आपल्या भक्तांना धीर दिला. कदाचित हे सगळं घडल्यानंतर आम्ही शक्य ती मदत केली, असा दावाही ते करतील, पण नेहमीच कुठलीही राजकीय घडामोड घडली की टीव्हीवर दिसणारे हे बाबा आज टीव्हीपासून लपत का होते? अण्णांच्या आंदोलनानंतर काळ्या पैशासाठी आंदोलन उभं करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणारे हेच बाबा रामदेव जेव्हा जनता अशा मृत्युप्रसंगात सापडलेली असताना, त्यांच्यासाठी वायुवेगाने एखादी गोष्ट करताना का दिसले नाहीत. जनतेला नव्या विचारांची भूल देऊन स्वतःच्या स्वप्नांचे इमले उभे करण्यासाठी कुठं तरी उपोषण किंवा सरकारच्या विरोधात एखादं आंदोलन करून हे बाबा वेगळ्या अर्थाने आपली राजकीय पोळी भाजून घेताना दिसतील. पण अशा कठीण प्रसंगी त्यांच्या मदतीला धावून, सरकारने ज्या चुका केल्या त्यावर कधी टीका करताना दिसत नाहीत. मदत करण्याऐवजी त्याचं राजकारण करणार्या ढोंगी आणि लोभी राजकारण्यांवर सूड उगवताना कधी दिसणार नाहीत. का घडतं हे असं? हे भक्त आणि त्यांचे अनुयायी म्हणून आज विचार करण्याची वेळ आलीय. देवभूमीत याच सगळ्या बाबा लोकांचं तर राज्य आहे. देवाच्या नावावर भक्तांची निष्ठा आपल्या पायी वाहून घ्यायची आणि संकटसमयी त्यांच्याकडे पाठ फिरवायची. कधी म्हणायचं की, आमचे स्वयंसेवक इथे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले होते. पण प्रत्यक्षात लष्कराच्या व्यतिरिक्त तिथल्या जनतेला कुणाची फारशी मदत मिळाली असेल की नाही, ही मुळात शंका उपस्थित होतेय.

हे झालं बाबा रामदेव यांचं… पण तिकडे अहमदाबादमध्ये बसून देशाला जय रामजी की असं म्हणून संदेश देणारे आसाराम बापूजी, इथे केदारनाथला जनतेला ‘राम’ म्हणायची वेळी आली तेव्हा कुठे होते? अनेक ठिकाणी जाऊन समाजाने कसं वागावं याचे धडे देणारे आसाराम बापू भक्त संकटात सापडल्यावर त्यांच्या मदतीसाठी का नाही गेले? हजारो भक्तांना जमवून सत्संग शिबिरावर लाखो रुपये खर्च करणारे आसाराम बापू अशा संकटसमयी भक्तांच्या मदतीकरता तितके तत्पर का नाही दिसले? प्रश्न उपस्थित केले तर त्याची संख्या अगणित होईल. पण त्याची इथे चर्चा करणं खरंच गरजेचं आहे. कदाचित आसाराम बापूंचा एखादा मठ किंवा आश्रम केदारनाथ, बद्रीनाथच्या परिसरात असेलदेखील. जसं नेहमीच टीव्हीवर एखाद्या सत्संगाच्या माध्यमातून हे बाबा झळकत असतात, मग टीव्हीवरच का होईना, समोर येऊन भक्तांना धीर देताना का नाही दिसले?

तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आवाहन करताना का नाही दिसले? दिल्लीतल्या मुलीवर जेव्हा सामूहिक बलात्कार होतो, त्यावेळी एखादं वादग्रस्त विधान करून चर्चेत येणारे आसाराम बापू, देवभूमीतल्या या आपत्तीच्या परिस्थितीत समोर यायला हवे होते. अजूनही ते लोकांसमोर येऊन तिथल्या विध्वंसाविषयी बोलायला तयार नाहीत. किंबहुना तेच काय त्याच परिसरात काही तासांच्या अंतरावर राहणारे बाबा रामदेवही अगदी कठोरपणे काही बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा फोल ठरली. बाबा रामदेव यांनी हा सगळा परिसर लहानपणापासूनच पिंजून काढला असेल कदाचित! त्यांना हा परिसर चांगला अवगत असणार, मग अशा संकटकाळात ते भक्तांना खुष्कीच्या मार्गाने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे का आले नाहीत. समाजात जगावं कसं, वागावं कसं असं हिरिरीने सांगणारे हे सगळे बाबा, अशावेळी मूग गिळून गप्प का बसतात? अध्यात्माची ताकद समजावून सांगत, जगण्याचा दृष्टिकोन समजावून सांगणारे हे तथाकथित धर्मगुरूआपल्या सगळ्या भक्तांना इथल्या वास्तवाचं भान का आणून देत नाहीत? हीच तर वेळ आहे… आपण कुठे चुकलो आणि विध्वंसाला आपण कसे कारणीभूत ठरलो… हे स्पष्टपणे समजावून सांगण्याची गरज आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचं तत्त्वज्ञान समजावून सांगणारे आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी होऊन देशहितासाठी अण्णांना त्यांचं उपोषण मागे घ्यायला लावणारे श्री श्री रविशंकर आज केवळ त्यांच्या अनुयायांना पुढे करून स्वतः मात्र समोर येण्याचं टाळताहेत. आपल्या मृदू भाषेच्या जोरावर मोहिनी टाकून नेहमीच जगण्याचं शास्त्रोक्त तत्त्वज्ञान सांगणारे रविशंकर अशावेळी निसर्गावर जनतेने किती अत्याचार केलाय, हे स्पष्टपणे सांगण्यासाठी समोर येताना दिसत नाहीत. त्यांच्या सत्संगामध्ये नेहमीच जगण्याची दिशा दाखवणारे हे गुरू- झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून – आपल्या भक्तांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार मांडून, त्यांना झालेली चूक समजावून सांगताना का दिसत नाहीत. पण जेव्हा कधी राजकीय पटलावर जाऊन सरकारविरोधात उभं राहण्याची वेळ आली तर हे सगळे धर्मगुरू देशातल्या अनेक लोकांना आपल्याकडे अशा राजकीय व्यासपीठाचा वापर करून आपणही कसे या धोरणाविरुद्ध आहोत, असं दाखवून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

हे झालं सामाजिक दृष्टिकोनातून स्वार्थासाठी केला गेलेला राजकीय विचार. पण जेव्हा याच गंगा नदीच्या प्रदूषणाबाबत आणि होणार्या वाळू उपशाच्या विरोधात वाराणसीमध्ये स्वामी निगमानंद यांनी बेमुदत आमरण उपोषण केलं होतं, त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं. त्यांच्याकडे या तथाकथित धर्मगुरूंपैकी कुणीही साधं त्यांची विचारपूस करण्यासाठीही गेलं नाही. त्याचवेळेला दुसरीकडे बाबा रामदेव यांचं उपोषण सुरू होतं, त्यांचं उपोषण सोडायला मात्र सर्व धर्मगुरू पोहोचले. पण यातील दुर्दैवाची बाब म्हणजे या सगळ्या निष्ठुर आणि आडदांड यंत्रणेच्याविरोधात लढताना स्वामी निगमानंद यांना आपले प्राण गमवावे लागले. त्याची कदर ना यातल्या कुठल्या बाबांना आहे, ना सरकारमधल्या कुठल्या सजगतेची जाणीव असलेल्या एखाद्या अधिकार्याला. गंगेला स्वच्छ करण्याऐवजी तिला अधिक प्रदूषित करण्याचंच काम आपण केलं. पण आपल्या वैशिष्ट्यपूर्ण विचाराने लोकांना आकर्षित करून त्यांना आपलंसं करणारे हे बाबा अशा समाजोपयोगी गोष्टी करून लोकांमध्ये जनजागृती कधी करणार हाच खरा प्रश्न आहे. पण असं काहीही न करता केवळ स्वार्थासाठी सगळं काही आहे, हे आता हळूहळू भक्तांना कळायला हवं. पण तो स्वार्थ परमार्थासाठी नसून केवळ धर्माच्या नावावर राजकारण करून सत्तेतला वाटा मिळून आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेली धडपड आहे. समाजाला योग्य वळणावर घेऊन जातोय, असं म्हणणारे सगळे बाबा केदारनाथच्या आपत्तीमध्ये मात्र त्यांच्या भक्तांना आणि तिथे अडकलेल्या लोकांना वाचवण्यात कमी पडले, हे मात्र तितकंच खरं!

तनपुरे महाराजांच्या मठाची कामगिरी

पण या सगळ्यांना अपवाद ठरली ती संत तनपुरे महाराज महाराष्ट्रीय धरमशाला या मठाची कामगिरी. महाराष्ट्रातल्या संत तनपुरे महाराजांचा बद्रीनाथ इथे मठ आहे. तिथे अजूनही त्यांच्या मठात जवळपास २०० लोक आसर्याला आहेत. त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची जशी जमेल तशी व्यवस्था या मठाच्या व्यवस्थापनाकडून केली जातेय. पंढरपुरात साने गुरुजींनी याच तनपुरे महाराजांच्या मठात बसून आमरण उपोषण करून विठ्ठलाच्या मंदिरात दलितांना मंदिर प्रवेश मिळवून दिला होता. त्यामुळे त्यांच्या कार्याला एक सामाजिक समतेची किनार आहे. अशी सामाजिक समता आणि त्या दृष्टीने वेगळा विचार समाजासमोर मांडून इतर बाबा आपल्यामध्ये कधी बदल करतील?

– राजेंद्र हुंजे

(लेखक ‘आयबीएन लोकमत’चे डेप्युटी न्यूज एडिटर आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *