कॉलर १

कॉलर : हॅलो, युवामैत्री?

युवामैत्री : हो, नमस्कार बोला…

कॉलर : मला एका पर्सनल प्रश्न आहे. विचारू का?

युवामैत्री : हो, बिनधास्त विचारा. ही हेल्पलाईन तुमच्यासाठीच आहे.

कॉलर : मी टी.वाय.बी.ए.ला शिकतोय. मला एक मुलगी खूप आवडते. ती माझ्याच कॉलेजमध्ये शिकतेय. मी परवा तिला प्रपोज केलं. तिने मला ‘नॉट इंटरेस्टेड’ असं उत्तर दिलं. तिने मला ‘नाही’ कसं म्हटलं?

युवामैत्री : तू त्या मुलीला कधीपासून ओळखतोयस?

कॉलर : गेल्या एक वर्षापासून…

युवामैत्री : तुझा तिच्याशी किती वेळा संपर्क-भेटणं-सहवास होतं?

कॉलर : साधारणपणे आठवड्यातून एक-दोनदा… बहुतेकदा ग्रूपमध्ये.

युवामैत्री : तुझं ज्या मुलीशी वन टू वन भेटणं, शेअरिंग फार होत नाही, जिथे तुम्ही एकमेकांशी आपल्या भावना, आपल्या आवडीनिवडी, आपलं भावी आयुष्य याबद्दल कधी बोलला नाहीत तिथे तू सरळ तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलंस?

कॉलर : पण सर, ती मला खरंच फार आवडते. बरेच दिवस माझ्या मनात जे होतं, ते मी परवा थोडं रिलॅक्स असताना तिच्याशी बोललो…

युवामैत्री : हे बघ, तुला एखादी मुलगी आवडलीय म्हणून तिला तू आवडायला पाहिजेस हे तू कसं म्हणू शकतोस? तू ज्या वयात आता आहेस तिथे तुला एखाद्याबद्दल आकर्षण वाटू शकतं. पण आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम म्हटलं तर त्यात एकमेकांबद्दल आदर, विश्वास, आधार वाटणं हे सगळं येतं. असं काही आहे का तुमच्या दोघांत? तेव्हा तू हे लक्षात ठेव की, तुला जशी एखादी मुलगी आवडली किंवा नाही आवडली, तसं तिलाही एखादा मुलगा आवडू किंवा नाही आवडू शकतो. तिच्या ‘नकारा’चा तू मोकळ्या मनाने स्वीकार करावास. स्वतःच्या वर्तनाकडेही तटस्थपणे बघ.

कॉलर : ठीक आहे. तुमच्या बोलण्याचा मी विचार करेन. मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद!

कॉलर २

कॉलर : हॅलो, युवामैत्री…?

युवामैत्री : हो, हा युवामैत्रीचाच नंबर आहे. बोला…

कॉलर : मी सांगलीहून बोलतोय… मी १९ वर्षांचा आहे. माझं मन अलीकडे चंचल बनत चाललंय. काय करावं ते समजतच नाहीये.

युवामैत्री : म्हणजे नेमकं काय होतंय?

कॉलर : मला वाटतं मला एक वाईट सवय लागलीय. थोडं स्पष्टपणे बोलू ना?…

युवामैत्री : हो बोल ना, अगदी निश्चिंत होऊन.

कॉलर : आमच्या घराशेजारी एक जोडपं राहतंय. त्यांच्या घराच्या दरवाज्याबाहेर एक छोटंसं छिद्र असलेलं पीपहोल आहे. दोन आठवड्यांपूर्वी मी त्या पीपहोलमधून लपून बघितलं. तेव्हा मला त्या घरात राहणार्या बाईची अंतर्वस्त्रं दिसली. मी नंतर लगेच तिथून सटकलो. चार-पाच दिवसांनी माझी नजर पुन्हा त्या होलकडे वळली. मला कळत नाहीये मी असा का वागतोय ते…

युवामैत्री :  हे बघ, तुझ्या वयाच्या मुलांच्या बाबतीत लैंगिक कुतूहल आणि आकर्षण असणं नैसर्गिक आहे. पहिल्यांदा अनावधानपणे तू शेजारच्या घरात डोकावून बघितलंस, पण जर ती गोष्ट पुनःपुन्हा तुझ्याकडून घडतेय तर त्याचा तू नीट विचार कर. अलीकडे स्त्रियांवरील लैंगिक गुन्ह्यांबाबत जो नवा कायदा आलाय, त्याबद्दल तू वाचलं/ऐकलं असशील.

कॉलर : नाही, सर. कशाबद्दल आहे तो कायदा?

युवामैत्री : दिल्लीमध्ये डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर जो जनक्षोभ उसळला, त्यानंतर महिलांवरील लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी कडक कायदे व्हावेत म्हणून एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारशी मान्य होऊन एक नवा कायदा संमत झाला. त्या कायद्यांतर्गत एखाद्या पुरुषाने चोरटेपणाने एखाद्या स्त्रिला विवस्त्र होत असताना किंवा खाजगीत लैंगिक कृती करताना बघितलं, तर तो गुन्हा ठरणार आहे. अशाप्रकारचं कुठलंही कृत्य स्त्रिच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप झाल्याचं मानण्यात येईल.

कॉलरः पण सर, मी माझं लैंगिक आकर्षण/भावना दाबून ठेवू शकत नाही.

युवामैत्री : तू तुझ्या लैंगिक भावनांना योग्य पद्धतीने वाट करून द्यायला हवीस. हस्तमैथुन करून तू तुझ्या लैंगिकतेला चालना देऊ शकतोस.

कॉलरः तुम्ही मला वेळीच हे सगळं मागदर्शन केलं, बरं झालं. धन्यवाद!

 संकलन- हरीश सदानी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *