‘वी आर ऑन, होऊन जाऊ द्या’

धिस इज नॉट ऑन, मिस्टर पालेकर!

अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी दिग्दर्शित केलेला ‘वी आर ऑन, होऊन जाऊ द्या’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. एकाच शब्दात या सिनेमाचं वर्णन करायचं तर ‘अपेक्षाभंग’ असंच करावं लागेल.

 

‘मागच्या वेळी ब्लाऊजला चोची आल्या होत्या…’

‘अहो पॅडिंगमुळे येणार्या चोचींबद्दल बोलताहेत त्या…’

किंवा

‘पुरुषांच्या विशेष भागाकडे बाईने बघितलं की जे पुरुष पायावर पाय टाकतात ते असुरक्षित असतात…’

अशा अर्थाचे संवाद असणारा सिनेमा सेक्स कॉमेडी असावा असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. आणि खरोखरच तो तसा असेल आणि खरोखरच धमाल आणत असेल तर त्याला हरकत घ्यायचं कारणही नाही. पण ‘आम्ही हृषिकेश मुखर्जी आणि बासु चटर्जी यांना सलाम करण्यासाठी एक हलकाफुलका, खराखुरा विनोदी सिनेमा बनवत आहोत,’ असं सांगितलेलं असलं की वर दिलेले संवाद ऐकताना फसवल्यासारखं वाटतं. त्यातून हे संवाद सहजी, दृश्याच्या ओघात आलेले असतील तर हसायला येईलही पण दृश्यच मुळी जर घुसडल्यासारखी वाटत असतील तर? तर फसवणूक झाल्याची भावना अधिकच तीव्र होते. काहीसं असंच अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांचा ‘वी आर ऑन, होऊन जाऊ द्या’ हा सिनेमा पाहताना होतं.

या सिनेमाची जमेची बाजू कोणती असा जर प्रश्न विचारला तर कलावंतांचा अभिनय एवढं एकच उत्तर देता येईल. अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, सतीश आळेकर, मनोज जोशी, रमेश भाटकर, वंदना गुप्ते, निवेदिता सराफ, आतिषा नाईक, गौतम जोगळेकर, सतीश पुळेकर आणि अशा अनेक दिग्गज कलावंतांची फौज सिनेमात असेल तर अभिनयाची बाजू भक्कम होणं अगदीच स्वाभाविक म्हणायला हवं. पण त्याच्या पलीकडे काय?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचा पाया अत्यंत भुसभुशीत आहे. एक मोठं मैदान. त्यावर सकाळी फिरायला येणारा मध्यमवयीन पुरुषांचा एक ग्रूप. त्याच मैदानात सहा आठवड्यांसाठी क्रिकेटची प्रॅक्टीस करू पाहणारी तरुण (या तरुण मुलांचा वयोगट काय असा प्रश्न मनात येतो, पण ते असो) मंडळी. त्यांच्यात वाद होतात, मैदान कोणाचं यावर बाचाबाची होते आणि मग ते ठरवायचा मार्ग म्हणून क्रिकेटची मॅच घ्यायचा निर्णय होतो. इतक्या कमकुवत कल्पनेवर उभी राहिलेली कथा-पटकथा-संवाद सगळंच ढिसाळ वाटतं.

मुख्य म्हणजे या सिनेमातल्या व्यक्तिरेखा या आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत आणि आपण जगत असताना जे नर्मविनोद आयुष्यात घडतात त्याचं दर्शन या सिनेमात होईल अशासारखी विधानं सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी ऐकलेली असल्याने मनातले प्रश्न अधिकच मोठे होतात. या मैदानात आपल्या पात्रांखेरीज इतर कुणीही कधीही फिरायला येत नाही का? अगदी सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळातही? प्रश्न जर फक्त सहाच आठवड्यांचा असेल, तर मग सहा वर्षं एकत्र असणारी ही मंडळी आपल्या मुलाबाळांसाठी ‘स्पर्धेत भाग घेताहेत ना, मग जाऊ दे,’ असं म्हणण्याइतका समंजसपणा का दाखवत नाहीत? सामन्यात जिंकेल त्याचं मैदान म्हणजे नक्की कोणाचं? आणि त्यामुळे नेमकं काय होणार असतं? बरं, हे प्रश्न बाजूला ठेवले आणि पडद्यावर जे चाललंय ते एन्जॉय करायचं म्हटलं तरी सिनेमामध्ये अजिबात गुंतून जायला होत नाही. कारण एवढे मोठमोठे कलावंत घेतल्यावर त्या प्रत्येकाला न्याय द्यायला हवा म्हणून प्रत्येकाचा एक स्वतंत्र ट्रॅक असणं दिग्दर्शकांना आवश्यक वाटल्याने सगळे प्रसंग तुकड्यातुकड्याने येतात. त्यात कुठेच एकसंधपणा येत नाही.

सिनेमात अशी अनेक दृश्यं आहेत जी काढून टाकली तरी कथेला किंचितही धक्का लागणार नाही. उदाहरणार्थ, आतिषा नाईक आणि तिचा मित्र यांचं रेस्टॉरन्टमधलं दृश्य. ते कशासाठी आहे? ती म्हणते, ‘तुमचा विग काढून दाखवा ना.’ तो म्हणतो, ‘लग्नानंतर बघण्यासाठी काही गोष्टी हव्यात ना?’ यावर तिचं उत्तर, ‘तशा अनेक असतीलच की, निदान लग्नानंतरच्या पहिल्या आठवड्यात!’ विनोद निर्मिती एवढा एकच हेतू या दृश्यामागे असावा. अन्यथा सिनेमाच्या प्रवाहात ते विजोडच आहे. आणखी एक उदाहरण. क्रिकेटची मॅच चालू असताना आनंद इंगळे कुठल्या तरी खोलीत असलेल्या रेकॉर्डिंग रूममध्ये असतो. आपल्या सहकार्यांना तो करत असलेल्या शॉर्ट फिल्मसाठी ऑन लाईन एडिटिंगच्या सूचना देतो. का? आणि मग अचानक, ‘आता शेवटची ओव्हर सुरू होतेय तेव्हा मी मैदानात असणं आवश्यक आहे,’ असं म्हणून पुन्हा खेळायला येतो, नव्हे शेवटची ओव्हर टाकायला लागतो. काय संबंध आहे या दृश्याचा कथेशी? माहीत नाही. किमान मला कळला नाही.

सिनेमाचा पहिला संपूर्ण भाग म्हणजे नुसती बडबड आहे. त्यातून फारशी विनोद निर्मितीही होत नसल्यामुळे ती अनेकदा कंटाळवाणी होते. आणि मध्यंतरानंतरचा सगळा वेळ क्रिकेट खेळण्यात जातो. त्यातही बाईच्या वेशातला पुरुष आणणं, एखादा विचित्र पद्धतीने बोलणारा सेल्समन असणं किंवा बाथरूमला जाणं अनावर झालेल्या या सेल्समनने अंगविक्षेप करणं यासारखी अनेक सिनेमांमध्ये वापरण्यात आलेली गिमिक्स इथेही दिसतात. आणि मग आणखी काही प्रश्न मनात येतात. अविवाहित असलेल्या मनोज जोशीला लग्न झालेल्या बायका अशा लाडात येऊन पदार्थ खायला का आणून देत असतात? समाजाचा क्रॉस सेक्शन हवा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष दाखवायला हवेत आणि असाही एखादा पुरुष असतो असं दिग्दर्शकांना सांगायचं आहे का? म्हणून मग एक दुःखी कर्नल, एक डॉक्टर, एक वृद्धाश्रमात राहणारा, एक कानडी, एक रा. स्व. संघवाला अशी भेळ केलीये? आतिषा नाईकसारखी बहीण कुठे असते जी भावासाठी मुलगी बघायला गेलेले असताना मुलीच्या भावाला कानकोंडं होईल असे प्रश्न विचारते किंवा स्टेटमेंट्स करते?

शेवटी एकच. दिग्दर्शक डेव्हिड धवनचा सिनेमा बघायला जाताना आपली एक विशिष्ट मानसिकता असते. आणि त्या मानसिकतेमधूनच तो सिनेमा बघितला जातो. मुळात फारसं काही बरं दिसेल अशी अपेक्षाच नसल्याने अपेक्षाभंगाचं दुःख नसतं. पण एखादा चांगलं नाव असलेला दिग्दर्शक आपण उत्तम विनोदी सिनेमा केलाय असं सांगतो आणि आपण तो सिनेमा पहायला जातो तेव्हा मनात प्रश्न येतात. त्या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्याने होणारं अपेक्षाभंगाचं दुःख मग मोठं वाटतं. अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्या ‘वी आर ऑन, होऊन जाऊ द्या’बाबत नेमकं हेच झालंय.

मीना कर्णिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *