पंधरा दिवसांपूर्वीच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नोव्हार्टिस या स्वीस औषध कंपनीचा ग्लिव्हेक या कर्करोगावरील औषधासाठीचा स्वामित्वाचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे नोव्हार्टिस जगभरात चर्चेत आली. अगदी युएस-इंडिया बिझिनेस काऊन्सिल या महत्त्वाच्या औद्योगिक संस्थेनेही नोव्हार्टिसची बाजू घेत भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविषयी चिंता व्यक्त केली. इतकंच नव्हे तर भारतीय राज्यकर्ते आणि राजकीय नेतृत्वाला इशारा दिला आहे. ग्लिव्हेक औषधाचा स्वामित्व अधिकाराचा ‘लढा’ नोव्हार्टिसने गमावणं हा जणू काही फार मोठा अन्याय आहे, असा सूर बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या वर्तुळात लावला जात आहे. नोव्हार्टिस भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे ‘हुतात्मा’ ठरली आहे. आता बहुराष्ट्रीय औषध कंपन्या नवीन औषधांच्या संशोधनासाठी प्रयत्नच करू शकणार नाहीत, जागतिक नागरिकांचं आणि एकूणच औषध उद्योगाचं या निर्णयामुळे महाप्रचंड नुकसान झालं आहे, असं सुचवलं जात आहे.

पण एवढा कळवळा दाखवला जात असणार्या या नोव्हार्टिसचं पितळ उघडं पडलं आहे. तेही अमेरिकेतच! नोव्हार्टिस ही कंपनी युरोपमधील सर्वात मोठी औषध कंपनी आहे. या कंपनीने अमेरिकन आरोग्य व्यवस्थेत केलेला मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अमेरिकन अॅटर्नी प्रीत भरारा यांनी नोव्हार्टिस विरुद्ध आर्थिक घोटाळ्यासाठी दिवाणी दावा न्यायालयात दाखल केला आहे.

काय आहे हा घोटाळा?

नोव्हार्टिस कंपनीने अमेरिकन फार्मासिस्टना आपल्या ‘मायफॉर्टिक’ या मानवी प्रतिकारशक्तीशी संबंधित औषधाचा खप वाढवण्यासाठी गैरमार्गाचा वापर केला असा नोव्हार्टिसवर आरोप आहे. कंपनीने फार्मासिस्टना मायफॉर्टिकच्या वाढीव खपावर विशेष आणि डिस्काऊंटस्ची योजना नोव्हार्टिसने सन २००५ पासून फार्मासिस्ट कंपन्यांना ‘परफॉर्मन्स’ रिबेट योजना लागू केली. ही योजना अमेरिकेतील किमान २० मोठ्या फार्मासिस्टना देय होती.

याठिकाणी अमेरिकन ‘फार्मासिस्ट’ कसं कार्य करतात हे समजून घ्यायला हवं. अमेरिकन नागरिकांना वैद्यकीय सेवेसाठी आरोग्य विमा घ्यावा लागतो. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं फार्मासिस्टच्या दुकानातून खरेदी करावी लागतात. फार्मासिस्ट प्रत्येक रुग्णाला दिलेल्या औषधांची नोंद ठेवतात. इतकंच नाही तर त्या औषधाचं कॉम्बिनेशन, रुग्णाला औषधाचा संभाव्य उपप्रभाव कोणता आहे हे समजावून सांगतो. रुग्णाला पर्यायी ब्रॅण्डनेमचं औषध सुचवू शकतो. औषध कसं घ्यावं हे सांगतो. थोडक्यात फार्मासिस्टवर रुग्णाला योग्य औषध पुरवण्याची कायदेशीर जबाबदारी असते. रुग्णाला फार्मासिस्टतर्फे देण्यात आलेल्या औषधाची किंमत विमा कंपनीकडून देण्यात येते.

अमेरिकन अॅटर्नींनी नोव्हार्टिसवर दाखल केलेल्या दाव्यात असं म्हटलं आहे की, ‘नोव्हार्टिस कंपनीने सन २००५ पासून अमेरिकन फार्मासिस्टसाठी एक परफॉर्मन्स रिबेट आणि डिस्काऊंट

योजना राबवली. या योजनेंतर्गत कंपनीने मायफॉर्टिक या औषधाचा खप वाढवला तर त्यांना औषधाच्या किमतीत पाच टक्के सूट दिली जाईल. यासाठी त्यांनी डॉक्टरांना मायफॉर्टिक औषध लिहून देण्यासाठी उद्युक्त करावं. डॉक्टरांनी मूळ औषध (जेनेरिक मेडिसीन) न लिहिता मायफॉर्टिक हेच औषध लिहून द्यावं अशी ही योजना होती.’ याचा परिणाम असा झाला की, या जेनेरिक औषधाचा खप कमी होऊन त्या जागी मायफॉर्टिक औषधांची विक्री वाढली. अर्थातच मायफॉर्टिक औषधाची किंमत जेनेरिक औषधापेक्षा खूपच जास्त होती. म्हणजेच संबंधित अमेरिकन आरोग्य विमा कंपन्यांना मायफॉर्टिकच्या विक्रीसाठी अधिक रक्कम मोजावी लागली. किती अधिक रक्कम या आरोग्य विमा कंपन्यांनी मोजली असावी? तर आतापर्यंत उघडकीस आलेल्या माहितीनुसार ७५० हजार कोटी डॉलर्सचा हा घोटाळा असावा असा अंदाज व्यक्त झाला आहे.

नोव्हार्टिसच्या या योजनेमुळे हजारो रुग्णांनी मूळ औषध सोडून (जेनेरिक औषधाचा वापर सोडून) मायफॉर्टिक औषध वापर करण्यास सुरुवात केल्याचं उघड झालं आहे. तर यामुळे फार्मासिस्टना हजारो डॉलर्सचा नियमित लाभ झाला आहे. अर्थातच नोव्हार्टिसने या वादग्रस्त, भ्रष्टाचारी योजनेतून लाखो डॉलर्सचा नफा कमावला हे उघडच आहे. सन २०१२ मध्ये नोव्हार्टिसच्या मायफॉर्टिक या औषधाची अमेरिकेतील विक्री २३९ दशलक्ष डॉलर्स इतकी होती. आधीच्या २०११ या वर्षातील विक्रीच्यापेक्षा २० टक्के वाढ नोव्हार्टिसने या एकाच औषधातून मिळवल्याचं नोव्हार्टिसच्या वार्षिक वित्तीय अहवालात नोंदवलं गेलं आहे.

अमेरिकेच्या अॅटर्नींनी असंही म्हटलं आहे की, नोव्हार्टिसचा हा पहिलाच घोटाळा नव्हे. नोव्हार्टिस ही कंपनी वारंवार अशी गुन्हेगारी कृत्यं करत आहे. सन २०१० मध्ये याच नोव्हार्टिसने आकडी येण्याच्या विकारावरील औषधासाठी (ट्रिलेप्टस – हे नोव्हार्टिसचं औषध) अशाच रितीने डॉक्टर आणि फार्मासिस्टना लाच देणारी

योजना राबवल्याचा घोटाळा न्यायालयात सिद्ध झाला. त्यावेळी नोव्हार्टिसने नुकसानभरपाईपोटी ४२३ दशलक्ष डॉलर्स भरून हा दावा तडजोडीने मिटवला होता.

बहुराष्ट्रीय औषध कंपन्या रुग्णांची कशी लूट करतात, याचं हे आणखी एक प्रकरण! पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारतात ग्लिव्हेक या औषधाच्या स्वामित्व अधिकारासाठी धडपणार्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध नक्राश्रू काढणार्या नोव्हार्टिसची खरी प्रतिमा उघडकीस आली आहे.

मात्र नोव्हार्टिसच्या प्रवक्त्याने या नव्या घोटाळ्याविषयी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, ’आमची कंपनी नैतिक पद्धतीने व्यवसाय करण्याला बांधील असून मायफॉर्टिक औषधसंबंधीचा खटला न्यायालयात निश्चितच लढवणार आहेत.’

म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *