माणूस हा मुळातच छांदिष्ट प्राणी आहे. त्याच्या छंदाची बातच काही और आहे. या छंदांचे प्रकारही नानाविध आहेत. कुणाला प्राणी पाळण्याचा छंद असतो तर कुणाला पक्षी पाळण्याचा. कुणाला सिनेमातील नटनट्यांचेफोटो जमा करण्याचा छंद असतो तर कुणाला विविध विषयांची पुस्तकं संग्रही ठेवण्याचा छंद असतो. विशेष म्हणजे हे सारे छंद पूर्ण करण्यासाठी मुंबईत त्या त्या गोष्टींच्या खास बाजारपेठाही आहेत. असाच एक छंद आहे मासे पाळण्याचा. या छंदाचीही मोठी बाजारपेठ मुंबई नगरीत आहे.

शैक्षणिक सहल म्हणून अनेकदा आपण मुंबईच्या मत्सालयाला भेट दिलेली आहे. या भेटीत माशांचे विविध प्रकार आपल्याला पहायला, अभ्यासायला मिळतात. यातूनच काही जणांना मासे पाळण्याचा छंदही जडतो. घरामध्ये फिशटँकच्या मदतीने काही मासे पाळता येतात. पण मग यासाठी मासे आणि फिशटँक घरात आणावे लागतात. मुंबईच्या कुर्ला उपनगरात मासे आणि फिशटँकचं मोठं मार्केट आहे. इथल्या नेहरूनगर इथे फिश अॅक्वेरीअमचं एक मोठं मार्केट आहे. या मार्केटमध्ये जवळजवळ सगळ्याच प्रकारचे मासे आणि टँक मिळण्याची तीस दुकानं आहेत. या दुकानांमध्ये गोल्डफिश, एंजल, टेस्ट्री फिश, अखाना, फ्लॉवर हॉर्न, एलीगेतर फिश, डिस्कस, पॅरॉट फिश, शार्क, डॉलर, किसिंग फिश, सकस, मलेशिया कासव, सिंगापुरी कासव, स्नेक फिश असे नाना तर्हेचे मासे या मार्केटमध्ये मिळतात. तसंच मोठ्या माश्यांना खाण्यासाठी लागणारे छोटे मासे म्हणजे फीडिंगदेखील इथे मिळतं. त्यासोबतच फिशटँकच्या सजावटी करता वेगवेगळ्या प्रकारचे दगड, माती, रेती, झाडं, बॅग्राऊंड पेपर यांचे सुरेख असे प्रकारही या मार्केटमध्ये मिळतात. माश्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारं ऑक्सिजन, फिल्टर, औषधं, विविध लाईट्स या गोष्टीही इथे सहज उपलब्ध होतात. थोडक्यात, आपल्याला फिशटँकसाठी जे जे काही लागतं ती प्रत्येक गोष्ट इथे मिळते. या मार्केटमधील प्रत्येक दुकानात आपल्याला हव्या त्या प्रकारच्या माशांसाठी हवा त्या साईजचा फिशटँक बनवून मिळतो. काही दुकानांमध्ये तर समुद्रात अगदी खोलवर आढळणार्या खार्या पाण्यातील माशांच्या जाती म्हणजे जेली फिश, सी हॉर्स, स्टार फिश, शेवाळी इत्यादी प्रकारचे मासेदेखील मिळतात.

स्पर्धा ही मार्केटला कधीच चुकलेली नाही. काही ठिकाणी कोणाकडे ग्राहक जास्त यासाठी स्पर्धा असते तर काही ठिकाणी दर्जासाठी स्पर्धा असते. पण इथे स्पर्धा आहे ती माशांच्या विविधतेची. प्रत्येक दुकानदार हाच प्रयत्न करत असतो की आपल्या दुकानात सगळ्यात वेगळा मासा हवा. दुसरं म्हणजे कुर्ल्याच्या या माशांच्या नगरीत महाराष्ट्र भरातून फिशटँक विक्रेते मासे आणि फिशटँक विकत घ्यायला येतात. इथे माशांची जोडी वगैरे घेतली तर ती महाग मिळते. पण तेच जर इथे डझनाच्या संख्येत मासे विकत घेतले तर ते खूपच स्वस्त दरात मिळतात.

कुर्ल्याच्या या फिश अॅक्वेरीअममध्ये येणारे मासे हे भारतातील मद्रास, कोलकता या शहरांतून तर जगातील मलेशिया, थायलंड, बँकॉक या देशांतून आयात होतात. हे मासे या मार्केटमध्ये आणतात त्यांना एका थर्माकॉलच्या खोक्यात एका वर एक अशा प्रकारे रचून आणले जातात. तसंच त्यांच्यावर पाणी शिंपडलं जातं. एरव्ही मासा पाण्यातून बाहेर काढला की तो मरतो पण अशा प्रकारचा सातासमुद्रापारचा प्रवास करूनही हे मासे सुखरूप या फिश अॅक्वेरीअमपर्यंत पोचतात. हे मार्केट मुळातच होलसेलचं मार्केट असल्यामुळे इथे अगदी तासातासाला लाखांची उलाढाल होत असते. हे मार्केट सकाळी दहा ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू असतं.

– प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *