महाराष्ट्र राज्यातील सर्वात दुष्काळी जिल्हा म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. यंदा तर संपूर्ण मराठवाडा होरपळून निघालाय. दुष्काळाने सर्वात उग्र रुप धारण केलंय. मराठवाड्याची जनता या दुष्काळामुळे पुरती हैराण झालीय. पण मराठावाडा म्हणजे दुष्काळ ऐवढीच या जिल्ह्याची आता ओळख राहिलेली नाहीय. निसर्गाने काही बाबतीत या जिल्ह्यावर अवकृपा दाखवली असली तरीही काही बाबतीत मराठवाडा प्रचंड प्रभावशाली आहे, हे मान्य करावंच लागेल. खास करून शिक्षणाच्याबाबतीत हा मराठवाडा संपूर्ण राज्यात आपलं नाव अग्रक्रमावर राखून आहे. यातच आता मराठवाडा आणखीच प्रगतीच्या वाटेने कूच करतोय. मराठवाड्यातील तरुणाई आता थेट आकाशात झेप घेण्याचं स्वप्न पहातेय. आणि त्यांचं हे स्वप्न आता प्रत्यक्षातही उतरणार आहे.  मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात आता पहिलं वहिलं वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झालंय. या केंद्रामुळे मराठवाड्यातील तरुणांना विकासाच्यादृष्टीने आणखी एक पाऊल टाकण्याचा मार्ग मिळालाय.

कधी नव्हे पण आता मात्र उस्मानाबाद शहराच्या आकाशात विमानं घिरट्या घालू लागली आहेत. इतकंच नाही तर उस्मानाबाद आणि सबंध मराठवाड्यात आता हे चित्र कायम पहायला मिळणार आहे. उस्मानाबाद इथे ब्ल्यू रे एव्हिएशन नावाच्या या कंपनीने वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे. मराठवाड्यातील हे पहिलं-वाहिलं प्रशिक्षण केंद्र ठरलंय. सध्या या केंद्रामध्ये चार विमान असून १२ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. येत्या काही दिवसांत या केंद्रात आणखी चार विमान दाखल होणार आहेत.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि मराठवाड्याचे भूमीपुत्र अशोक चव्हाण यांनी नांदेड, बारामती, उस्मानाबाद, यवतमाळ या ४ ठिकाणी विमानतळाची धावपट्टी बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पुण्याच्या ब्ल्यू रे एव्हिएशन या कंपनीने या धावपट्ट्या भाडेतत्वावर घेतल्या असून इथे त्यांच्यामार्फतच वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. त्यावेळेचे उद्योग राज्यमंत्री आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी २००८ साली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांच्याच माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद विमानतळ विकसित करून याठिकाणची धावपट्टी १२५० मीटरपर्यंत वाढवली. त्यासाठी तब्बल ४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता या विमानतळावर प्रत्येक बिझनेस जेट विमानाचं लँडिंग होऊ शकतंय. तसंच धावपट्टीवरील टॅक्सी-पेमुळे प्रशिक्षणार्थींचीही मोठी सोय झाली आहे. लँडिंगनंतर प्रशिक्षणार्थी आपलं विमान धावपट्टीवरून बाजूला घेऊ शकतात. त्यामुळे अन्य विमानांना सोयीने लँडिंग करता येतं. या प्रशिक्षण केंद्रात १२ प्रशिक्षणार्थींपैकी ३ मुली आहेत. त्यांना मुख्य ऑपरेटिंग अधिकारी नदिन रझा यांच्यासह एस.आर.मीना दिवांग दास प्रशिक्षण देत आहेत. तसंच हे प्रशिक्षण केंद्र निवासी असून महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, दिल्ली, लक्षद्विप, कर्नाटक या राज्यांमधील विद्यार्थी या प्रशिक्षण केंद्रात सध्या वैमानिक प्रशिक्षण घेताहेत.

या प्रशिक्षण केंद्राच्या पहिल्या बॅचमध्ये उस्मानाबादचा अझरुद्दीन काझी हा विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. तसंच भुवनेश्वर येथील ३० विद्यार्थी पुढच्या काही दिवसांतच या प्रशिक्षण केंद्रात वैमानिक होण्याच्या जिद्दीने प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहेत. प्रशिक्षणार्थींचा वाढता प्रतिसाद पाहून त्यांना प्रॅटिकली या अभ्यासाचं ज्ञान मिळावं या करता इथल्या केंद्रातील विमानांची संख्याही वाढवण्यात येत आहे. आज या केंद्रात जी विमानं तैनात आहेत त्यांच्यासोबतीलाच आता अजून ३ लहान आणि २ इंजिन असलेलं आणखी एक मल्टी विमान दाखल होतंय. या मल्टी विमानाचाही वैमानिकाचा अभ्यास करताना प्रशिक्षणार्थींना खूप फायदा होतो. या विमान प्रशिक्षणाचा कालावधी सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर संध्याकाळी ४ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत असतो. त्याव्यतिरिक्त रोज २ तास या प्रशिक्षणार्थींसाठी लेक्चर्स आयोजित केले जातात.

या क्षेत्राकडे राज्यातील आणि देशातील अधिकाधिक मुलींनीही वळावं यासाठी मुलींकरता खास सवलत देण्यात आली आहे. ब्ल्यू रे एव्हिएशन या कंपनीने इच्छुक मुलींसाठी प्रशिक्षणाच्या मूळ शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षण केंद्रात प्रवेश करू इच्छिणार्या मुलींच्या सध्चच्या आर्थिक स्थितीप्रमाणे ही सवलत देण्यात येते, असं वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे कॅप्टन नंदिन रझा यांनी सांगितलं.

अशा विद्यार्थ्यांना मिळेल प्रवेश

वैमानिक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार विज्ञान शाखेचा १२वी पर्यंतचा उत्तीर्ण विद्यार्थी असावा, असा नियम आहे. हे संपूर्ण प्रशिक्षण दीड वर्षांत पूर्ण होतं. या प्रशिक्षण काळात एकूण कोर्सच्या २०० तास विमान चालवावं लागतं आणि ५ परीक्षा घेतल्या जातात.

प्रशिक्षण केंद्रातील विमानाचं वैशिष्ट्यं

या केंद्रातील विमान ताशी २०० कि.मी. वेगाने उडतं. यासाठी त्यांना २०० लीटर इंधनाची आवश्यकता भासते. हे इंधन ६ तास पुरतं. तसंच ही विमानं समुद्रसपाटीपासून १० हजार फुट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतात. या विमानांची ४ आसनांची क्षमता आहे. या वैमानिक प्रशिक्षण केंद्रात तब्बल ४० कर्मचारी आहेत. त्यांच्या पैकी १५ कर्मचारी हे स्थानिक म्हणजे उस्मानाबादचेच आहेत. पुढील काळात अभियांत्रिकी शाखेतील कर्मचारीदेखील इथे भारती करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मुला, मुलींनी या संधीचं सोनं करावं असे आमदार राणा जगजितसिंह यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलंय. आजघडीला मराठवाड्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पुष्पवृष्टी करायची असेल तर त्यासाठीही या प्रशिक्षण केंद्रातील विमानांचा वापर केला जातोय. अतिशय अल्प दरात ही विमानं भाडेतत्वावर देण्यात येत आहेत. तसंच कौटुंबिक सफरीसाठीदेखील या विमानांचा वापर करण्यात येतोय, अशी माहिती केंद्राचे मुख्य फ्लाईंग इन्स्ट्रक्टर के.टी. राजेंद्र यांनी दिली. उस्मानाबादच्या या वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे या जिल्ह्याचं नाव देशभर पसरलंय. तसंच या प्रशिक्षण केंद्रामुळे इथल्या उद्योग व्यवसायावरही सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा व्यक्त केली जातेय. एक गोष्ट मात्र निश्चितच आहे ती म्हणजे मराठवाड्यातील तरुणांना आता करिअरच्या दृष्टीने या प्रशिक्षण केंद्रामुळे आणखी एक दालन उघडं झालंय.

 – अविशांत कुमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *