राज्यातील दुष्काळ आणि त्यामागोमाग वाढीला लागलेली कुपोषणाची समस्या यात जेव्हा दुष्काळी भागातील नवजात अर्भकांचा विचार केला जाईल तेव्हा एक वर्षाच्या आतील बालकांकरता (Infant) ‘आईचा पान्हा’ हा कुपोषणावरचा महत्त्वाचा उपाय ठरेल. थोडक्यात आईने दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक सर्वात प्रतिकारशक्तिवर्धक अशी देणगी म्हणजे आईचं दूध. बाळ जन्मल्यानंतर अगदी तासाभरात बाळाला केलेलं स्तनपान हे बाळाच्या आणि आईच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं.

जिथे एकत्र कुटुंबपद्धती आहे तिथे आई, आजी, सासूबाई नव्याने ‘आई’ झालेल्या आपल्या मुली, नाती किंवा सुनेला बाळाला कसं घ्यायचं हे सहज शिकवतात. पण मुंबईसारख्या शहरात नव्याने रहायला आलेली आणि नुकत्याच आई झालेल्या प्रत्येक मुलीला स्तनपानाचं महत्त्व माहीत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात स्तनपान हे एक वर्षाखालच्या बाळाला कुपोषणग्रस्त न ठरता सुदृढ रहायला मदत करेल.

श्वसनविकारतज्ज्ञ म्हणून अॅलर्जी आणि अस्थमाचा विचार करायचा झाला तर Breast Feeding  केलेल्या मुलांमध्ये अॅलर्जी आणि दम्याचं प्रमाण निश्चित कमी दिसून येतं. पण काम करणार्या आईने काय करावं? शासकीय सेवा आणि महानगरपालिकेतील कर्मचार्यांना त्यासाठी खास रजा मंजूर करण्यात येते. मला वाटतं शासनाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयातील हा एक आरोग्यदायी खरंतर जीवनदायी निर्णय मानला जावा.

डॉक्टर असल्याने मी स्वतः एक-दीड महिन्यात लगेच कामाला जाणार असं मनोमन ठरवलं होतं आणि त्याची तयारी म्हणूनच लेक महिन्याची झाल्यावर चमचा-वाटीने ४ चमचे गाईचं

पाश्चराईज्ड दूध देऊन पाहिलं. रात्री बाळ शांत झोपलं पण सकाळी उलट्या सुरू झाल्या इतक्या की तिच्या निओनेटॉलॉजिस्ट घरी पहायला आल्या. तपासून झाल्यावर मला विचारत्या झाल्या ‘काय काय दिलं बाळाला?’ History ऐकून उलटी थांबायचं एक औषध आणि मला रजा वाढवण्याची ताकीद देऊन गेल्या. त्यानंतर पुन्हा ती चार महिन्यांची झाल्यावर सोयाचं, म्हशीचं इत्यादी सगळे प्रकार देऊन पाहिलं. परंतु अनुभव तोच ‘Milk Intolerance’! गाई, म्हशीच्या दुधातील प्रथिनांना बाळाच्या आतड्यातील पांढर्या रक्तपेशी ओळखत नाहीत आणि उलटीच्या स्वरूपात ती बाहेर फेकली जातात. त्यानंतर मात्र ती अगदी दोन वर्षांची होईपर्यंत बाहेरचं कोणतंच दूध अथवा दुधाचे पदार्थ दिले नाहीत आणि आज मात्र तिचा Milk Intolerance नाहीसा झाला आहे. Intolerance नाहीसा होऊ शकतो पण अॅलर्जी क्वचितच नाहीशी होते आणि अॅलर्जी असल्यास डॉक्टरी सल्ल्यानुसारच ज्या पदार्थांची अॅलर्जी आहे ते देण्याचा विचार करावा. पुष्कळदा पेशंट्स सांगतात,‘डॉक्टर मला दूध आलंच नाही.’ याबाबत खरोखरच मोजकी कारणं असतात, की जिथे पान्हा आटतो नाहीतर आईने बाळाला घेतल्याबरोबर पान्हा येतो. सुरुवातीस जे ‘Colostrum’ येतं त्याचं महत्त्व तर प्रतिकारशक्तिच्या दृष्टीने मोठं आहे. आईसाठी बाळ जन्मल्यानंतर त्याला दूध पाजायला लागल्यानंतर गर्भाशयाची पिशवी भराभर लहान होत जाते आणि बांधा परत सुडौल व्हायला मदत होते.

स्तनपान केलेल्या स्त्रियांच्यात कर्करोगाचं विशेषतः Breast Cancer चं प्रमाण कमी दिसतं.

स्तनपान करताना आपला आहार सकस असणं आवश्यक. कारण आई जे खाते ते बहुतांश पदार्थ तिच्या दुधातून पाझरतात, अगदी औषधंसुद्धा. तेव्हा मुंबईत दुधाची किंमत जरी वाढणार असेल तरी आईच्या दुधाची किंमत अनमोल आहे आपल्या छोट्या बाळाकरता!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *