बाळ जन्माला येण्याआधी त्याला काही शारीरिक व्यंग आहे का? हे सोनोग्राफीने ओळखतायेतं. गेल्या चार दशकांत या चाचणीत खूप प्रगती झाली. आता यामध्ये थ्रीडीवरून फोर Image दिसणंही शक्य झालं. अगदी बाळाचा चेहरा, त्याची हालचाल, हाता-पायाची बोटं ‘सारं काही’. आणि या ‘सारं काही’ अंतर्गत सर्वसामान्यांना माहिती असलेला नेमका उपयोग म्हणजे होणारं ‘लेकरू’ वंशाचा दिवा आहे का? हे सहा महिने आधीच कळण्याचं साधन! २०११च्या जनगणनेचे आकडे महाराष्ट्रातील नवजात अर्भकांमध्ये मुलींच्या प्रमाणात अधिक घट झालेली दाखवत होते. त्यानंतर काही डॉक्टरांनाही पकडण्यात आलं! सोनोग्राफीवर निदान करून मुलगा की मुलगी असा निर्वाळा देताना ‘भ्रूणहत्येला’ मदत केली म्हणून PNDT Act लागू केला गेला. राज्यकर्त्यांतर्फे भ्रूणहत्या रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले. याच सुमारास ज्या काही योजना राबवल्या गेल्या, त्यात स्त्रियांच्या ‘सक्षमीकरणा’बरोबरच इतर काही मुद्दे महत्त्वाचे वाटले. त्यातला एक म्हणजे सर्व कुटुंबीयांची मानसिकता बदलणं कृती आणि उक्तीनेही! उक्तीने अशाकरता की मराठी संस्कृतीत मोठ्यांना अथवा वडीलधार्या माणसांना वाकून नमस्कार करताच हमखास लेकी-सुनांना आशीर्वाद मिळतो, ‘अष्टपुत्र सौभाग्यवती भव!’ पण त्याऐवजी ‘एकमेवाद्वितीय किंवा अष्टावधानी लेक होवो!’ असा आशीर्वाद दिला गेला तर, मग ती मुलगी असू दे की मुलगा! मुलींवरचे अत्याचार रोखायला बदलायला हवी आपली मानसिकता. ‘कृती बदलताना’ उदाहरणं मात्र असामान्य कर्तृत्व करणार्या स्त्रियांची दिली जातात. आणि मग ‘स्त्री’ म्हणून स्वागत व्हायला हवं असेल तर असामान्य कर्तृत्वच दाखवायला हवं का? असं दडपण निर्माण होतं की काय याचा विचार स्त्री सक्षमीकरणातील आराखड्यात केला गेला आहे. त्यातही जेव्हा मुलगाच हवा या मानसिकतेचा विचार झाला तेव्हा महाराष्ट्रातील सर्वेक्षणात कटू सत्य समोर आलं ते म्हणजे पहिल्या मुलीनंतर दुसर्या बाळाच्यावेळी भ्रूणहत्येचं प्रमाण अधिक आहे, तेही सधन, सुशिक्षित वर्गात. त्यात नमूद केलेल्या अनेक कारणांमध्ये एक महत्त्वाचं कारण सांगितलं गेलं ते म्हणजे मुलगा नाही म्हणून केलेली स्त्रियांची ‘मानसिक अवहेलना’. तेव्हा लेकींनो आणि लेकरांच्या आयांनो ही मानसिक अवहेलना असमतोलास कारणीभूत ठरू नये याकरता आपली मानसिकता थोडी बदलण्याची गरज आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आज ‘कलमनामा’साठी हाती घेतलेलं कलम खाली ठेवता ठेवता, मला शाळेत चित्रकला शिकवणार्या, आता सत्तरीच्या पुढे असलेल्या बाई माझ्याकडे आल्या आणि सांगत्या झाल्या, ‘मला पटकन बरं होऊन लेकीकडे जायचंय. नातींना सांभाळताना मला मिळालेला आनंद वेगळाच पण आज मला माझ्या ‘आईवर’ पुस्तक लिहायचंय. आज मी तिने दिलेल्या घरात आनंदाने रहाते आहे. माझ्या दोघी लेकी त्यांच्या लेकींना मोठं करण्यात दंग आहेत. मीही त्यांना जमेल तितका हातभार लावतेय. तुझ्या दोघी लेकींना घेऊन कधी येशील माझ्याकडे?’ मनाने मी केव्हाच त्यांच्याकडे पोचले होते, त्यांच्या ‘आईची गोष्ट’ ऐकायला. तीन पिढ्यांतील लेकींची काळजी घेत आपल्या आईच्या असामान्य व्यावहारिक ज्ञानाची गोष्ट लिहायला आमच्या बाई उत्सुक होत्या. वरवर सामान्य वाटणार्या माणसांच्या कृतीतून समाज परिवर्तनाची पहाट कधीतरी उगवेल असा आशावादी विचार करत नातींची काळजी घेणार्या त्या आजीची काळजी घेण्याचा वसाच आम्ही त्यावेळी घेतला.

( लेखिका केईएम रुग्णालयाच्या चेस्ट मेडिसिन विभाग आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या प्रमुख आहेत.) दूरध्वनी ०२२— २४१३२२९६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *