आपण काळ बदलला हे मानतो परंतु पूर्वापार चालत आलेल्या काही रूढी किंवा पद्धती, त्यामागची शास्त्रोक्त कारणं कदाचित न पटणारी असली तरीदेखील तशाच अंमलात आणल्या जातात. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्याबाबतीतदेखील तेच करण्यात येतं. त्यामागे आईचा किंवा सासुबाईंचा आग्रह असतो, ‘आम्ही नाही का तुम्हाला वाढवलं?’ आणि खरंच पहिल्या बाळाच्या जन्माआधी कुठे कुणाला अनुभव असतो! एकत्र कुटुंबपद्धतीत कुणीना कुणी लहानगं असतंच पण Nuclear Family मध्ये केवळ आईवडीलच, मुलांनी लाड करून घेतलेले असतात. पण भाची, पुतणी यांना संभाळण्याचा अनुभव मात्र मिळत नाही.

बाळ झाल्यावर ‘अभिनंदन! बाळ ३ किलो वजनाचं आहे हे घ्या,’ असं म्हणत परिचारिका दुपट्यात लपेटलेल्या बाळाला हातात आणून देतात तेव्हा नाहीतर त्यानंतर थोड्या काळाने लक्षात येतं आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे ते? वजन २.५ किलोपेक्षा जास्त असेल तर उत्तम पण २ किलो किंवा क्वचित त्याहून कमी म्हणजे Low Birth Weight असेल तर अधिक काळजी घेण्याची गरज असते. पूर्वी अशा बाळांना Incubator मध्ये ठेवलं जाई परंतु बाकी सर्व काही ठीक असेल आणि केवळ वजन कमी असेल तर मात्र आईच्या जवळ म्हणजे कांगारुची जशी पोटाजवळ पिशवी असते तसं आईच्या जवळ ठेवलं जातं. अशा तर्हेने काळजी घेण्याच्या पद्धतीला Kangaroo Mother Care असं संबोधलं आहे. कालपर्यंत आईच्या गर्भात असलेल्या बाळाला आईच्या हृदयाच्या ठोक्यांचा नाद जास्त जवळचा ठरतो आणि आंतरिक सुरक्षा देऊ करतो तसंच लागेल तेव्हा लगेच आईचं लक्ष बाळावर रहातं आणि अर्थातच बाळाची तहानभूक – क्षुधाशांती आई लगेच करू शकते. अंघोळ कशी घालावी याकरता विविध पद्धती सांगितल्या आहेत पण ‘नाळ’ पडून जाईपर्यंत योग्य काळजी घेणं आवश्यक. पारंपरिक ‘पोटबाधणी’ ही शास्त्रीय निकषात बसत नाही परंतु किमान ‘ती’ स्वच्छ जंतुविरहीत असावी याची काळजी घेतली जावी, नाहीतर Infection होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंघोळीनंतर काजळ-तीट लावावी का? असाही प्रश्न विचारला जातो. ‘काजळ निश्चित नाही!’ असं सांगितल्यावर, ‘शुद्ध तुपातलं चालेल का?,’ असंही विचारलं जातं. पण त्याची गरज वाटत नाही. तसंच योग्य तर्हेने मालिश खचितच चांगली पण नंतरची धुरी निश्चित नको. दगडी कोळशाचा वापर करून खास शुद्धीकरणाकरता धुरी द्यावी असा समज होता. परंतु कोळशातून निघालेल्या धुरातून वातावरण शुद्धी न होता हवेतील तरंगत्या धुलीकणांचं प्रमाण वाढतं आणि श्वसनविकार बळावतात. शिवाय बाळाला Passive Smoking पासून जपावं. बाळाची आई किंवा वडील अथवा कोणतेही नातेवाईक घरातच धुम्रपान करत असतील तर त्याचा त्रास अर्भकाला निश्चित होतो. नाकात आणि कानात तेल घालण्याची गरज नाही. नाकात घातलेल्या तेलाचा थेंब फुप्फुसात जाऊन Lipoid Pneumonia ची शक्यता संभवते. टाळूला तेल न जिरवता जपावं कारण तिथला भाग टणक झालेला नसतो. तसंच बाळाची त्वचा कोरडी राखणं गरजेचं असल्याने Diaper वापरताना विशेष काळजी घ्यावी. उन्हाळ्यात विशिष्ट काळाने Diaper बदलायला हवा आणि जांघेत ओलसरपणा राहिल्याने Diaper rash येतो तेव्हा उष्ण आणि दमट हवामानात जास्त काळजी घ्यायला हवी.

बाळासाठी आणली गेलेली खेळणी योग्य तर्हेची असावीत. Stuff Toys मध्ये धूळ साठून रहाते आणि खेळणी घेताना घशात अडकू शकतील असे सुटे भाग नाहीत ना याची खात्री करणं आवश्यक आहे. आणि बाळाच्याच नव्हे तर मुलांच्या संगोपनात आई इतकाच वडिलांचा वाटाही महत्त्वाचा असून Paternity Leave चा उपयोग खचितच सुजाण पालक आपल्या तान्ह्यासाठी करतील अशी मला खात्री वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *