वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना रुग्णसेवा अर्थात Patient Care म्हणजे रोगाचं निदान आणि उपचार याबरोबरच रुग्णशिक्षण म्हणजे रुग्णांना त्यांच्या आजाराबद्दलची माहिती, कारणमीमांसा आणि उपचारपद्धती समजवावी लागते. त्याचवेळेस होतकरू मेडिकल डॉक्टर्सना एम.बी.बी.एस. आणि पदव्युत्तर एम. डी. विषयाचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडत असतानाच मनुष्यस्वभावाचे अनेक पैलूदेखील पहायला मिळतात. Medicine is an Art And Science  असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे योग्यपद्धतीने रुग्णांकडून आवश्यक माहिती मिळवणं हे अचूक निदानाकरता आवश्यक ठरतं आणि ती माहिती थोडक्या वेळात काढून घेण्याची कला म्हणजेच आर्ट हे आत्मसात करत असताना विद्यार्थ्यांचा विषयाचा अभ्यास किती खोल आहे हे जाणवतं.

Sir William Osler यांनी एक महत्त्वाचं तत्त्व डॉक्टरांकरता सांगितलं आहे, ते म्हणजे It is not enough to know what kind of disease patient has but it is also important to know what kind of patient has the disease. थोडक्यात आपण सुचवलेली उपचारपद्धती पेशंटच्या आवाक्याबाहेरची असेल केवळ पैशांकरता नव्हे तर त्याला रुचणारी नसेल तर ती तो कधीच पूर्णतः घेणार नाही. आणि अर्धवट घेतलेली औषधपद्धती औषधाला न जुमानणारे म्हणजेच  Drug Resistant जंतू निर्माण करायला कारणीभूत ठरते. पण जर का ते पेशंटला रुचेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगितलं तर पेशंट व्यवस्थित वेळेत औषध घेण्याचं प्रमाण वाढतं आणि मग आम्हाला सांगितलं जातं या डॉक्टरांच्या हाताला ‘गुण’ आहे.

प्राध्यापक म्हणून नेमकी आर्ट आणि सायन्सची सांगड घालताना द्वितीय वर्षात एम.बी.बी.एसला शिकणार्या होतकरू डॉक्टरांकरता के.ई.एम. रुग्णालयात रोजच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध संवादकौशल्यं, मेडिकल एथिक्स इत्यादी गोष्टी शिकवण्याकरता ‘शिदोरी’ हा एक कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यात मेडिकल एथिक्सवर डॉक्टरांची ‘Cut Practice’ बद्दल विद्यार्थ्यांची मतं आजमावताना दहापैकी नऊ जणांनी Cut Practice कशी चुकीची आहे हे सांगितलं. पण एकाने मात्र मी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मला मोठं व्हायचं असल्याने मी Cut Practice निश्चित करणार असं सांगितलं.

Cut Practice म्हणजेच एका डॉक्टरने दुसर्या डॉक्टरांकडे पाठवताना त्यांना देण्यात आलेलं कमिशन. मग ते १० ते ५० टक्क्यांपर्यंत कितीही असेल. या पुढची पायरी म्हणजे गरज नसताना केलेल्या चाचण्या आणि उपचार. त्या विद्यार्थ्याचं उत्तर ऐकून क्षणभर मी अवाक झाले. तो विद्यार्थी मला विचारत होता, ‘मला पैसा मिळवायचा अधिकार नाही काय? मला माझी अद्ययावत उपकरणं घ्यायला पैसा लागेल तो मी तिप्पट व्याजाने उभा करताना मला कोण मदत करणार?’ मी उत्तर द्यायच्या आत एक आवाज सांगता झाला… ‘तुझ्या स्वतःच्या नातेवाईकांच्या ऑपरेशनकरता चांगला डॉक्टर न शोधता चांगलं कमिशन देणारे डॉक्टर शोधणार काय?’ जास्तीत जास्त गुण मिळवून स्पर्धात्मक परीक्षा घेताना डॉक्टरीकरता Social Quotient चा निकष महत्त्वाचा ठरावा का? की चालतय तसंच चालू द्यावं सारं विधात्यावर सोडून… कारण शेवटी I treat He Cures!

आपणच ठरवा क्रीडा की मनोरंजन हवं ते! त्याचप्रमाणे मेडिकलमध्ये निकष कोणते असावेत ते केवळ स्पर्धापरीक्षांनी ठरवावं की आणखी काही हवं? व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत पण खरी महत्त्वाची ठरते ती आपली ‘प्रवृत्ती!’ भूकंपात आणि बॉम्बस्फोटात जखमींची आमच्याबरोबरीने काळजी घेणारे, मदतकार्याला वाहून घेणारे आणि जीवाला जीव देणारे विद्यार्थीही पहायला मिळतात. मात्र योग्य वृत्ती जोपासण्याची जबाबदारी आमची ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *