तुम्हारी याद सताएगी!

मुलायम आवाजाची मलिका शमशाद बेगम यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालंय. वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं.

शमशाद बेगम हे नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आपल्या डोळ्यांसमोर तो स्वातंत्र्यपूर्व भारतीय सिनेमाचा काळ उभा राहतो. या काळातच शमशादजींनी आपल्या गायकीला सुरुवात केली होती. लाहोरच्या पेशावर रेडिओवर त्यांनी आपल्या कारकिर्दीचं पहिलं गाणं गायलं. पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्माला आलेल्या या महान गायिकेने आपल्या पहिल्याच गाण्याने श्रोत्यांना जिंकलं होतं. इथून शमशादजींची गायनाची कारकीर्द अविरत पुढे सुरू राहिली. शमशाद बेगम यांनी नौशाद अली, राम गांगुली, एस.डी बर्मन, सी. रामचंद्र, खेमचंद प्रकाश आणि ओ.पी.नय्यर अशा एकापेक्षा एक दिग्गज संगीतकारांसोबत काम केलंय. मेरे पिया गये रंगून, किया है वहाँ से टेलीफून… हे शमशादजींचं गाणं आजची पिढीही तितक्याच आवडीने गातेय. हीच खरी शमशाद बेगम नावाच्या या जादुई आवाजाची करामत आहे. सी.आय.डी. सिनेमातलं लेके पहला पहला प्यार हे गाणं असो किंवा आर पार मधलं कभी आर कभी पार असो किंवा मग आशा भोसले यांच्यासोबत गायलेलं कजरा मोहब्बतवाला आँखियोमे ऐसा डाला… हे सदाबहार गीत असो, रसिकांना या गाण्यांची आजही भुरळ पडते. शमशाद बेगम यांना २००९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. हा त्यांच्या गायकीचा सन्मान होता. शमशाद बेगम यांनी केवळ हिंदी चित्रपटसृष्टीच आपल्या आवाजाने गाजवली नाही तर मराठी चित्रपटसृष्टीलाही त्यांनी आपल्या आवाजाने बहार आणली. १९५२ साली सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘नरवीर तानाजी’ या चित्रपटात शमशाद बेगम यांनी गाणं गायलं होतं. या चित्रपटात शमशादजींसोबत वसंतराव देशपांडे, शाहीर अमर शेख आणि आशा भोसले यांनीही गाणी गायली होती. असा हा बहारदार आवाज आता आपल्याला कायम आठवत राहणार आहे. शमशादजींच्याच सुरात सांगायचं तर शमशाद बेगम आता अखेरपर्यंत रसिकांना, ‘… तुम्हारी याद सताएगी!’

 

मराठी कलावंतांच्या खांद्यावर मनसेचा ‘झेंडा’

मराठी चित्रपटसृष्टी सध्या अनंत अडचणींना सामोरी जात आहे. या अडचणी केवळ मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षच समजू शकतो. तेच आमच्या अडचणी दूर करू शकतात, असं सांगत तब्बल नऊ दिग्गज मराठी कलावंतांनी मनसे प्रवेश केलाय. एकाच दिवशी इतके कलाकार पक्षात आणि पर्यायाने चित्रपट सेनेत दाखल झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेला प्रचंड बळकटी मिळालीय.

पुरुषोत्तम बेर्डे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, रिमा लागू, सुहास जोशी, आसावरी जोशी, राहुल रानडे, पुष्कर श्रोत्री आणि श्रीरंग गोडबोले या कलाकारांनी राजगड या मनसेच्या पक्षकार्यालयात जाऊन संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलंय. इतक्या मोठ्या संख्येने कलावंत मनसेच्या चित्रपट सेनेत दाखल झाल्यामुळे अर्थातच शिवसेनेच्या चित्रपट सेनेत खळबळ माजलीय. यामुळे आता त्या गोटात किती आणि कोणते कलावंत प्रवेश करतात, ते पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *