संजय दत्त जेलमध्ये जाणार हा सध्या देशभर चिंतेचा विषय बनलेला आहे. दुष्काळ वगैरे संकटं येतात आणि जातात. त्यामुळे त्यावर कोणी काही बोलत नाहीये, पण बिचारा संजूबाबा जेलमध्ये जाणार म्हटल्यावर केवळ बॉलिवूडच नाही तर अगदी मार्कंडेय काटजूसुद्धा व्यथित झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिलीय. पण ही मुदत संजय दत्तला वाचवण्यासाठी दिलीय की काय असंच वाटायला लागलं आहे. बॉलिवूडने तर या चार आठवड्यात संजय दत्त काम करत असलेल्या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण करता येईल का यावर विचार सुरू केलाय. संजूबाबाला आपली पूर्ण सहानुभूती देताना प्रत्येक निर्माता हेच म्हणतोय आमच्या चित्रपटांची आम्हाला काळजी नाही, काळजी वाटतेय ती संजयची… तो आता ज्या कठीण प्रसंगातून जातोय त्या काळात आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, हेच सांगायला आम्ही त्याची भेट घेतोय… संजय दत्तच्या एन्ट्रीला टाळ्या आणि शिट्ट्यांनी थिएटर दणाणून सोडणार्या पब्लिकलासुद्धा या निर्मात्यांच्या मनात काय आहे हे माहीत आहे. संजय दत्त कमीत कमी तीन वर्षं जेलमध्ये जाणार, त्यामुळे होणार्या नुकसानाचे आकडे फुगवून सांगितले जाताहेत. १०० कोटींपासून ते २५० कोटींपर्यंत नुकसान होईल असे अंदाज वर्तवले जाताहेत. संजय दत्त काम करत असलेले कोणते सिनेमे आहेत ते आधी लक्षात घेऊयात.

  • पोलिसगिरी (४० कोटी रुपये)

‘सॅमी’ या २००३ साली गाजलेल्या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटात संजय दत्तची नायिका आहे प्राची देसाई… के. एस. रविकुमार दिग्दर्शित करत असलेला हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित व्हायचा होता. विचित्र योगायोग म्हणजे यात संजूबाबा पोलिसाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचं ९० टक्के शूटिंग पूर्ण झाल्याचा दावा निर्माते टी.पी. अग्रवाल यांनी केलेला आहे.

  • पी के (१०० कोटी रुपये)

राजकुमार हिरानी यांच्यासोबत संजय दत्तचा हा तिसरा चित्रपट आणि आमिर खानसोबत पहिलाच. आमिर खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत असला तरी संजय दत्तची भूमिकाही महत्त्वाची आहे. शूटिंगचं राजस्थानमधील केवळ एक शेड्युल पूर्ण झालेलं आहे.

  • उंगली (५० कोटी रुपये)

‘गुमराह’ आणि ‘अग्निपथ’नंतर धर्मा प्रॉडक्शन्ससोबत संजय दत्तचा हा तिसरा चित्रपट. या चित्रपटासाठी संजय दत्तचा भाग चित्रित झालेला आहे.

  • जंजीर (४५ कोटी रुपये)

मूळ ‘जंजीर’मध्ये अभिनेते प्राण यांनी अजरामर केलेला शेरखान नवीन चित्रपटात संजय दत्त साकारतोय. चित्रपटाचे निर्माते अमित मेहरा आणि मूळ जंजीरचे लेखक सलीम-जावेद यांच्यामध्ये कॉपीराईटवरून वाद सुरू आहेतच. पण शेरखानचं शूटिंग मात्र पूर्ण झालेलं आहे.

  • शेर (३५ कोटी रुपये)

‘शेर’मध्ये संजय दत्तसोबत आहे विवेक ओबेरॉय. या चित्रपटाचं ६० टक्केच शूटिंग पूर्ण झालेलं आहे.

  • घनचक्कर

विद्या बालनची इच्छा म्हणून संजय दत्त या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून चमकणार होता. पण आता ती शक्यता मावळली असंच म्हणावं लागेल.

  • मुन्नाभाई (१०० कोटी रुपये)

मुन्नाभाई सिरीज मधल्या या पुढच्या चित्रपटाचं शूटिंग या वर्षअखेर सुरू होणार होतं, आता त्याचं भवितव्य अधांतरी आहे.

याचाच अर्थ केवळ ‘पी के’ आणि ‘शेर’ हे दोन सिनेमेच असे आहेत ज्यांचं शूटिंग संजय दत्तशिवाय रखडणार आहे. बाकी चित्रपटांचं शूटिंग एकतर पूर्ण झालेलं आहे किंवा सुरू व्हायचं आहे. बाकी डबिंग वगैरे गोष्टी संजय दत्त नसला तरी पूर्ण होऊ शकतात. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी प्रमोशनसाठी संजय दत्त उपलब्ध नसेल, याबद्दलही बॉलिवूडमध्ये चिंता व्यक्त होतेय. प्रत्यक्षात संजय दत्तचं जेलमध्ये असणं याचा आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कसा वापर करता येईल याचा अभ्यास बॉलिवूडमधील मार्केटिंग पंडितांनी सुरू केलेला आहे. संजय दत्त जेलमध्ये असताना ‘खलनायक’ कसा यशस्वी ठरला हे तर सगळ्यांना आठवत असेलच. मुन्नाभाई नंतर संजय दत्तची ब्रँड व्हॅल्यूसुद्धा वाढलेली आहे. मान्यताबरोबर लग्न झाल्यानंतर गीतांजली या ज्वेलरी ब्रँडसाठी दोघांचं मानधन होतं दीड कोटी रुपये… गेल्याच वर्षी ज्या चित्रपटांनी १०० कोटींचा बिझनेस केला त्यात संजय दत्तचे दोन चित्रपट होते (‘अग्निपथ’ आणि ‘सन ऑफ सरदार’) यावरून संजय दत्तला सध्या बॉलिवूडमध्ये किती वलय आहे हे लक्षात येईल. आता एवढ्या बड्या सुपरस्टारवर करोडो रुपये लावणार्या निर्मात्याला त्याच्यावरील खटल्याची कल्पना नसेल हे जरा पचायला जडच जातंय. सध्या हेच निर्माते संजय दत्तला सहानुभूती दाखवत असले तरी प्रत्यक्षात ज्यांचं शूटिंग पूर्ण झालंय ते निर्माते मनातून नक्कीच खूश झाले असणार. जेलमध्ये असलेल्या आपल्या संजूबाबाचा चित्रपट बघायला जरूर या, असंच आवाहन या निर्मात्यांकडून केलं जाणार आहे. गीतांजलीसारखा ब्रँडसुद्धा आता मान्यताला घेऊन एखादी जाहिरात बनवू शकतो. मान्यता एकटीच दागिने घालून बसलीये आणि जेलमध्ये असलेल्या संजूची वाट बघतेय अशी जाहिरात येणार्या काळात बघायला मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि म्हणूनच संजय दत्तचं जेलमध्ये जाणं ही बॉलिवूडसाठी तरी चिंतेची गोष्ट नाही उलट एक मोठा इव्हेंटच आहे.

संजय दत्त जेव्हा प्रत्यक्षात पोलिसांच्या गाडीत बसून तुरुंगात जाईल तेव्हा टीआरपी वाढवण्यासाठी त्या गाडीचा पाठलाग करणारा मीडिया, तुरुंगात असताना त्याच्या चित्रपटांवर करोडो रुपये कमावणारे निर्माते आणि भयंकर गुन्हा करून तुरुंगवास भोगत असलेल्या आपल्या लाडक्या स्टारचे चित्रपट हाऊसफुल्ल करणारे प्रेक्षक… तुम्हीच ठरवा यात दोष कुणाला देणार?

– अमोल परचुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *