‘डॉक्टर, मला काहीही खाल्लं तरी दहा-पंधरा मिनिटांनी पित्ताचा त्रास होतो.’ मिसेस मालपाणी डॉक्टरांना सांगत होत्या. त्यांनी डॉक्टरांना दाखवण्यासाठी सर्व जुने रिपोर्टस् आणले होते. ५५ वर्षांच्या मालपाणी सुखवस्तू कुटुंबातल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांचे सर्व रिपोर्टस् काळजीपूर्वक तपासले. मालपाणींचं ब्लडप्रेशर चेक केलं. त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि आपल्या दवाखान्यातील काही गोळ्या दिल्या. तसंच मिसेस मालपाणींना नियमित आणि दर दोन तासांनी थोडं-थोडं खाण्याचा सल्ला दिला. तीन दिवसांनी परत येण्याचा सल्ला दिला. मिसेस मालपाणींनी डॉक्टरांना त्यांची फी दिली आणि त्या निघाल्या.

त्या गेल्यावर डॉक्टरांशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलं, ‘या बाईंना खरंतर काहीही होत नाहीये. पण त्यांना ‘एन्झायटी’ आहे, (सतत चिंता वाटत असते.) आपल्याला पित्ताचा त्रास आहे. त्यातून काहीतरी गंभीर रोग उद्भवणार आहे. होत असेल थोडाफार त्रास पण सर्व रिपोर्टस् प्रमाणे फारसं गंभीर काहीही नाही.’ ‘मग डॉक्टर, त्यांना औषध काय दिलंत?’ डॉक्टर म्हणाले, ‘काही विशेष नाही, व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या,’ याला ‘प्लासिबो’ ट्रीटमेंट म्हणतात.

तर ‘प्लासिबो’ उपचार हे एक उपचाराचं तंत्र आहे. बरेचवेळा असं होतं की दीर्घकालीन चिवट आजार/ रोगावर वर्षानुवर्षं उपचार करूनही रुग्णाला पूर्ण बरं वाटत नाही. उदाहरणार्थ, संधीवात हा काही रोग नाही. तो एक शारीरिक विकार आहे. शरीरातील हाडांच्या सांध्यांमध्ये निर्माण झालेला दोष आहे. या दोषावर एका मर्यादेपर्यंत औषधोपचारांचा परिणाम होतो. विशिष्ट मर्यादेबाहेर हा आजार (दोष) वाढला की औषधं देऊनही त्यांचा परिणाम होत नाही. रुग्णाला आराम पडत नाही. खरंतर अशा रुग्णांना अखेरपर्यंत हा त्रास, वेदना सहन कराव्या लागतात. अशा परिस्थितीत डॉक्टर रुग्णाचं मनोबल टिकावं, त्याला बरं वाटावं म्हणून, साध्याशा निरुपद्रवी गोळ्या देतात. कधी एखादा ‘एक्स रे’ किंवा रक्त चाचणी करायला सांगतात. खरंतर डॉक्टरांना हे माहीत असतं की या औषधांमुळे फारसा काही परिणाम होणार नाही. केवळ रुग्णाला बरं वाटावं, तात्पुरता आराम वाटावा इतकाच त्यामागे उद्देश असतो. अशा उपचारांसाठी वापरलेल्या औषधांना ‘प्लासिबो’ औषधं म्हणतात. ‘प्लासिबो’ औषधं अशी काही विशिष्ट औषधं नाहीत. अनेकदा डॉक्टर्स रुग्णाची चिंता दूर व्हावी, त्याला मानसिक उभारी वाटावी म्हणून अशी निरुपद्रवी औषधं, गोळ्या देतात, यात कधी साध्या साखरेच्या गोळ्या असतात किंवा एखादं सौम्य वेदनाशामक असतं. कधीकधी, या औषधांमुळे रुग्णाला काही काळ चक्क आराम पडतो. यात औषधाच्या परिणामापेक्षा, मानसिक परिणाम असतो. काहीकाळ रुग्णाला बरं वाटतं, याला ‘प्लासिबो इफेक्ट’ असंही म्हणतात. अनेक डॉक्टरांचा तसा अनुभव आहे.

इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ संधीवातच नव्हे तर तीव्र वेदनादायक दीर्घकालीन आजारातही अशी औषधं डॉक्टर्स देतात. तसंच सतत आपल्याला काहीतरी होत आहे अशा चिंतातूर रुग्णांसाठीही प्लासिबो औषधं डॉक्टर्स वापरतात.

मात्र महत्त्वाचा मुद्दा असा की, आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘प्लासिबो’ उपचारांना अधिकृत मान्यता नाही. उलट ‘प्लासिबो’ औषधं रुग्णांना द्यावीत अथवा नाही याबाबत वैद्यकक्षेत्रात कायमच वाद आहे.

गेल्याच महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेरिमी हॉविक आणि अन्य संशोधकांनी ‘प्लासिबो’ औषधांविषयी एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे ‘प्लासिबो’ औषधांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काहीसे धक्कादायक आहेत. या सर्वेक्षणात असं पुढे आलं आहे की, इंग्लंडमधील सुमारे ९७ टक्के जनरल प्रॅक्टिशनर्स आपल्या रुग्णांना ‘प्लासिबो’ औषधं देतात. या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, बरेचदा रुग्णांच्या आग्रहामुळे अशी औषधं देणं भाग पडतं. या डॉक्टरांना प्रश्न विचारला होता की, तुम्ही ‘प्लासिबो’ औषधं म्हणून साखरेच्या गोळ्या किंवा अन्य खोटी औषधं रुग्णांना कधी देता का? किंवा गरज नसताना रक्त चाचणी किंवा एक्स रे करण्यास रुग्णास सांगितलं आहे का? या प्रश्नावर ९७ टक्के फॅमिली फिजिशिअन्सनी असं सांगितलं की त्यांनी किमान एकदा तरी अशा पद्धतींचा किंवा उपचारांचा वापर केला आहे. तर ७७ टक्के डॉक्टरांनी स्पष्टपणे कबूलच केलं आहे की ते आठवड्यात किमान एकदा असे ‘प्लासिबो’ उपचार करतातच. या सर्वांना ‘प्लासिबो’ उपचार पूर्णपणे नैतिक वाटतात. यासाठी हे डॉक्टर्स अनावश्यक चाचण्या, जॉइन्ट इंजेक्शन्स, पेपरमिंटच्या गोळ्या काही परिणामहिन प्रतिजैविकांच्या गोळ्या यांचा वापर करतात. काही औषध कंपन्या यासाठी ‘प्लासिबो’ – अपरिणामकारक, खोट्या  गोळ्या पुरवतात असंही पुढे आलं आहे.

ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या एथिक्स कमिटीचे अध्यक्ष डॉ. टोनी कॅलांड यांनी या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमुळे आपली तीव्र निराशा झाल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात की, ‘तुम्हाला माहीत असतं की या औषधाचा रुग्णासाठी काही उपयोग नाही तरी ते रुग्णाला देणं हे नैतिक कसं असू शकेल? ते अनैतिकच आहे.’

या पूर्वी अमेरिका, जर्मनी आदी देशांतही या ‘प्लासिबो’ इफेक्ट आणि औषधोपचारांविषयी संशोधन आणि सर्वेक्षण झालं आहे. सगळ्यात हेच सिद्ध झालं आहे की ५० टक्क्यांपेक्षा अधिक डॉक्टर्स ‘प्लासिबो’ औषधं रुग्णांना देतात. अतिशय अल्प प्रमाणात काही रुग्णांना त्याचा फायदा होतो.

शेवटी कोणत्याही उपचारांचा उद्देश रुग्णाला बरं वाटावं हाच असतो. कधीकधी सर्व उपचार थकल्यावर, क्वचित डॉक्टरांनी अशी औषधं वापरणं समजू शकतं. (जेव्हा रुग्ण आणि डॉक्टर दोघंही अगतिक असतात!) पण ७०-८० टक्के डॉक्टर्स ‘प्लासिबो’ औषधांचा वापर करत असतील तर निश्चितच संशयाला जागा आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनची याबाबत काय भूमिका आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *