मुंबईच्या बायकांची बातच काही और आहे. दिल्लीमधील हिंसाचाराच्या घटनांच्या संदर्भात मुंबई कशी स्त्रियांसाठी सुरक्षित आहे याचे उल्लेख येतात, पण ते तितकेसे खरे नाहीत. मुंबईत आणि महाराष्ट्रात स्त्रीविरोधी हिंसाचार (खास प्रकारचे) आढळतात; भररस्त्यात मुलींचे, स्त्रियांचे भोसकून खून होतात. २० वेळा सूरा शरीरात घुसतो तरी कोणी मध्ये पडत नाही. अॅसिड फेकून चेहरे वितळतात, डोळे जातात आणि याला ‘एकतर्फी प्रेम’ म्हणतात. बायकांची नग्न धिंड गावातून फिरते, शरीरं छिन्न विच्छिन्न होतात पण त्याला ‘दलित अत्याचार’ म्हणत नाहीत आणि शिक्षा मुळीच होत नाही कोणाला. वर आता बार बंद, नाचणं बंद, दुकानं बंद असं काहीसं मुंबई बंदचं वातावण पोलीस तयार करतात. हसतं खेळतं शहर रात्रीचं तंग करतात आणि त्याला ‘बायकांची सुरक्षितता’ म्हणतात. इतकं सारं असून मुंबईच्या बायांची बात और आहे.

पहिलं म्हणजे त्या भरघोस संख्येने घराबाहेर फिरत असतात. ट्रेनमध्ये, बसमध्ये गर्दी करतात. रस्त्यांवर बिनधोक भटकतात. जिथे बघावं तिथे आपल्या बायका दिसतात, भारताच्या कुठल्या दुसर्या शहरात हे दृष्य दिसतं? सगळ्या ‘भाऊ’ गर्दीत एखादी बहीण बिचारी हरवून जाते, लगबगीने आपल्या ठिकाणी पोचण्यासाठी धडपडत असते. मुंबईच्या बायकांसारखी रेंगाळत, मजेत रस्त्याने चालत नाही, सिग्नलला उभी राहून गप्पा मारत नाही. दुसरं म्हणजे मुंबईत सर्व प्रकारच्या कामधंद्यांमध्ये, उद्योगात बायका कार्यरत असतात. बँकांच्या चेअरमनपदी ही आहेत आणि विमानांच्या पायलटही. मंत्रालयात कारकून, दुकानांत विक्रेत्या, भाजीवाल्या, कोळीणी. मुंबई हे एकमेव शहर होतं जिथे औद्योगिक क्रांतीनंतर गिरण्या उघडल्या आणि पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही कामगार म्हणून भरती झाल्या. संघटीत कामगार क्षेत्रात काम करण्याचा दिडशे वर्षांचा अनुभव इथल्या बायका गाठीस बांधून आहेत. त्यामुळे पुरुषांच्या जगात वावरत आहोत अशी भावना त्यांच्यात अभावाने आढळते. ऑफिसमध्ये काम करणार्या मध्यमवर्गीय कारकून स्त्रिया अत्यंत आत्मविश्वासाने आपल्याशी बोलतात, माहिती देतात. चेन्नई किंवा कोलकात्यामध्येही या स्तरातल्या स्त्रिया भेटतात पण त्यांच्यात मुंबईच्या बायकांचा आत्मविश्वास दिसत नाही. दिल्लीत आणि बर्याच ठिकाणी एकतर गाडीतून पोचवल्या जाणार्या उच्चपदस्थ स्त्रिया आढळतात अथवा घरकाम इ. निम्नस्तरीय कामं करणार्या. म्हणून कदाचित या शहरांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टची वानवा आणि त्याबद्दल सरकारची अनास्था दिसते. मध्यमवर्गीय स्त्रियांचा लोंढा ही मुंबईची खासियत आहे.

आणि म्हणूनच मुंबईच्या बायका aggressive वाटतात. ट्रेनमध्ये शिरताना मारामार्या करतात, पुरुष शरमतील अशी अर्वाच्य शिवीगाळ करतात. छेड काढणार्या पुरुषांना चप्पलेने हाणतात. ‘स्त्रीसुलभ’ म्हणून बायकांवर लादलेली लज्जा, शरम मुंबईच्या मुली फारशा लावून घेत नाहीत. gender roles मधील अंतर त्यामुळे मुंबईत कमी जाणवतं. पुरुष आणि स्त्रिया यांच्या आकांक्षा, इर्षा, चालणं, बोलणं, कपडे यातलं अंतर विशेषतः नव्या पिढीत कमी होत गेलं आहे.

म्हणूनच मुंबईच्या मुलींची ‘बिनधास्त’ प्रतिमा भारतभर पसरली आहे. पुरुष काही तरी विशेष वेगळी, घाबरण्यासारखी अथवा लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे असं मनात नसल्यामुळे त्या पुरुषांशी सहज मैत्री करू शकतात. गप्पा मारतात, हसतात, टाळ्या देतात. त्यामुळे त्याना ‘फास्ट’ ‘चालू’ वगैरेही मानलं जातं. भारतात इतर ठिकाणी, विशेषतः दिल्ली आणि उत्तर भारतात स्त्री पुरुषांमधील अंतर सर्वमान्य आहे. त्यामुळे तिथल्या स्त्रिया ना पुरुषांशी सहज हसत बोलत ना सरळ सरळ थप्पड लगावत. त्या बायकांची खास मानली गेलली हत्यारं वापरतात, गोड बोलून कामं करवून घेतात. मुंबईच्या बायकांसारख्या सरळ जाऊन भिडत नाहीत.

मुंबईच्या बायकांचं खास कौशल्य म्हणजे रस्त्यावर लोकांशी मारामारी करणं. विशेष उपयोगी ट्रेनिंग मुंबईत मुलींना लहानपणापासूनच मिळतं. मी स्वतः तेरा वर्षांची असताना, शाळेतून परत येताना माझा पहिला प्रयोग केला होता; कोणा माणसाने गर्दीत लगट केली तर त्याला हातातल्या स्टीलच्या डब्याने मारून. मुंबईत हा स्पोर्ट चांगला आहे. रस्त्यावर लोक जमा होऊन त्या पुरुषाला घेरतात. निदान वीस वर्षांपूर्वी तरी अशी परिस्थिती होती – आणि वर घरी येऊन शाबासकी मिळते. ‘बॉम्बे गर्ल’ असण्याचं हे ट्रेनिंग मी नंतर जगाच्या इतर भागातही उपयोगात आणलं. लंडनमध्ये अगदी इस्तंबूलमध्ये यशस्वी प्रयोग करून आणि मुंबईची छाप तिथल्या पुरुषांच्या गालांवर सोडून. खरं तर भारताबाहेर पुरुष बर्यापैकी शिस्तशीर भेटतात. ‘दिसली बाई की लावला हात’ असला प्रघात नसतो, पण सापडलंच कोणी, तर मुंबईची बाई सहज अशांना शिस्त लावू शकते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *