निसर्गाच्या आविष्काराला मानवी कल्पनाशक्तीची जोड मिळाल्यामुळे जगात अनेक आश्चर्यांची निर्मिती झाली. जगातली सात आश्चर्य तर सर्वांनाच माहीत आहेत. पण इंटरनेटवर घेतलेल्या एका पोलद्वारे नवीन सात आश्चर्य निवडण्यात आली. त्यामधलंच एक आहे पेरू देशातलं माचू पिचू हे ठिकाण. या ठिकाणाचं नाव जसं आगळंवेगळं आहे तसंच हे ठिकाणही खूप वेगळं आहे.

दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशाच्या कुस्को प्रांतातल्या उरुंबंबा नदीजवळ अॅन्डीन पर्वतरांगांमध्ये २४३० मीटर्स उंचीवर माचू पिचू हे ठिकाण आहे. पंधराव्या शतकात इंका साम्राज्याच्या पाचाकुटी राजाने हा परिसर वसवून आपल्या साम्राज्याची निर्मिती केली.

माचू पिचूचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या उंच पर्वतरांगांवर मोठ्या दगडांना कोरून इंका साम्राज्य वसवण्यात आलं होतं. ते एक मोठं शहरच समजलं जायचं. आणि त्याची विभागणी प्रामुख्याने शेती विभाग, शहरी विभाग आणि धार्मिक विभाग अशी करण्यात आली होती. परिसरातल्याच दगडांना कोरून विविध इमारतींचं बांधकाम करण्यात आलं होतं. त्यामध्ये मोठमोठ्या भिंती, ओटे, पायर्या नसलेली उतरण याची निर्मिती अधिकाधिक करण्यात आल्याचं लक्षात येतं. इंका साम्राज्यातील लोक धार्मिक वृत्तीचे होते. त्यामुळे इथे काही धार्मिक स्थळांची निर्मितीही त्या लोकांनी केली आहे. इथल्या सेक्रेड डिस्ट्रीक्ट या पवित्र जागेजवळ इंटिहूटाना, टेम्पल ऑफ सन आणि रूम ऑफ थ्री विंडोज या तीन जागा पवित्र ठिकाणं म्हणून ओळखल्या जातात. अनेक वर्षं परिसरातील लोकांव्यतिरिक्त हे ठिकाण जगाला माहीत नव्हतं. पण १९११ मध्ये अमेरिकेन इतिहासतज्ज्ञ हिरॅम बिंगहॅम याने याचा शोध लावला. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या माचू पिचूला प्रथम १९८१ मध्ये पेरूव्हिएन हिस्टॉरिकल सॅन्च्युअरी म्हणून घोषित करण्यात आलं तर १९८३ मध्ये माचू पिचूला जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला.

गेली अनेक वर्षं ऊन, वारा, पाऊस यांचा मारा आणि भूकंप यामुळे माचू पिचू येथील इमारतींचं नुकसान झालं होतं. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या इमारतींची पुनर्बांधणी करण्यात आली आहे आणि हे काम अजूनही सुरू आहे. माचू पिचूला भेट देणं ही तर पर्यटकांसाठी साहसाची आणि आनंदाची पर्वणीच असते. कारण ऐतिहासिक वारशाला भेट देण्याबरोबरच पर्यटकांना इथे हायकिंग, ट्रेकिंग अशा साहसी पर्यटनाचा आनंदही घेता येतो. इथली इंका ट्रेलदेखील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक या हायकिंगचा अनुभव घेतात. ४५ किमीचा असलेला हा ट्रेक पूर्ण करायला साधारण पाच दिवस लागतात. इथे बांधण्यात आलेल्या फ्युनररी रॉक, रॉयल टोंब, सेंट्रल प्लाझा, सेक्रेड रॉक, सेक्रेड प्लाझा, कॉन्डॉर टेम्पल या ठिकाणांची निर्मिती पाहून मानवाच्या कल्पनाशक्तिची आणि मेहनतीची कल्पना येते. तसंच उरुंबंबा नदीवरच्या इंका रोप ब्रिजवरून चालणंही पर्यटक पसंत करतात. या परिसरात फिरताना आजूबाजूच्या निसर्गाच्या अर्वणनीय सौंदर्याचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. उन्हाळा आणि पावसाळा हे इथले प्रमुख ऋतू आहेत. माचू पिचूचा परिसर पावसाळ्यानंतर हिरव्या वृक्षराजींनी बहरलेला असतो. समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेल्या या परिसरात जैवविविधता असली तरी इथे आढळणारा अलपाका हा लोकर असलेला प्राणी मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो. याच्या लोकरीमध्ये साधारण २२ विविध रंग असतात आणि ती अतिशय चांगल्या दर्जाची असते. तसंच साधारणतः ४२० प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती या परिसरात राहणं पसंत करतात. पर्यटनाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी माचू पिचू हे एक चांगलं डेस्टिनेशन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *