दक्षिण कोरियात पार पडलेल्या ISSF World Cup मध्ये राही सरनोबतने महिलांच्या २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तुल प्रकारात जागतिक विजेतेपद मिळवलं. महिलांच्या पिस्तुल क्रीडा प्रकारात जगज्जेतेपद पटकावणारी राही सरनोबत पहिली महिला शूटर ठरली. इतकंच नाही तर या जगज्जेतेपदासहित तिने अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, तेजस्विनी सावंत यांच्या पंक्तितही स्थान पटकावलंय. पण इतका इतिहास घडवूनही राही अद्याप पुरेशी देशाला माहीत झालेली नाहीय. प्रसारमाध्यमांपासून सर्वांचंच तिच्या या पराक्रमाकडे दुर्लक्ष झालंय. याला कारण अर्थातच देशात सध्या सुरू असलेली आयपीएल क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. केवळ पैसे कमावण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेला सर्वांनीच डोक्यावर घेतलंय. पण त्याचवेळी राहीसारख्या सच्चा खेळाडूची मात्र योग्य ती दखल घेतली जात नाहीय. अजूनही सरकारकडून तिच्या योग्य त्या सन्मानाची घोषणा होत नाहीय.

 

राहीचा योग्य तो सन्मान व्हायलाच हवा

क्रिकेटला फाजील महत्त्व देणं आणि त्यावर अफाट पैसा खर्च करणं यात काय नवीन आहे? राही सरनोबतने मिळवलेलं यश हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपल्या भारताचा झेंडा पुन्हा एकदा सातासमुद्रापार रोवला गेलाय तो राहीमुळेच. म्हणूनच तिचा योग्य तो सन्मान होणं आवश्यक आहे.

– अनुजा अंबवले, विद्यार्थिनी

 

pankaj thitarआयपीएलने कोणालाच सोडलं नाहीय

राही सरनोबतवर आयपीएलमुळे अन्याय झालाय ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. पण या आयपीएलने किंवा एकूणच क्रिकेट या खेळाने कोणालाच सोडलेलं नाहीये. सगळ्यांवरच या खेळाने अन्याय केलाय. आपल्या राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी या खेळावरदेखील यामुळे अन्याय होतोय.

– पंकज पितर, विद्यार्थी

होय होतोयच…

क्रिकेट खूप ग्लॅमर असलेला खेळ आहे. त्याला प्रचंड टीआरपी आहे. आणि त्यामुळे इतर खेळांकडे भारतीय जनतेचं दुर्लक्ष होतंय. आणि याच दुर्लक्षामुळे राही सरनोबतवर अन्याय झालाय.

– विद्या कांबळे, विद्यार्थिनी

 

याला लोक जबाबदार

क्रिकेट हा आता खेळ राहिलेला नसून शंभर टक्के प्रॉफिट असलेला व्यवसाय बनला आहे. म्हणून त्याला इतकी प्रसिद्धी मिळते. राही सरनोबत किंवा इतर खेळाडू ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही ते व्यवसाय करत नाहीत. आणि व्यवसाय करत नाहीत म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. खेळांच्या बाबतीत ही अशी वाईट भूमिका आपल्या देशात आहे. यामुळे राहीवरच्या अन्यायाला इथले लोक जबाबदार आहेत, असं मला वाटतं.

– मुबील सोलिया, विद्यार्थी

 

सरकार फक्त विचार करतंय!

क्रिकेटमध्ये असणार्या खेळाडूंनी जर काही नवीन विक्रम केला असता तर विदिन अ मिनिट सरकारकडून करोडो रुपयांचं बक्षीस जाहीर झालं असतं. पण राही सरनोबत विजयी होऊन भारतात परतून आता इतके दिवस उलटले, मात्र तरीही अजून सरकार विचारच करतंय. हे चूक आहे.

– शर्मिला कदम, विद्यार्थिनी

 

आपणच याला कारणीभूत

क्रिकेट या खेळाचं व्यसन आपल्या देशातील अनेक तरुणांना लागलंय. कामाला सुट्ट्या टाकून, दांड्या मारून क्रिकेट पाहणारा वर्गही खूप मोठा आहे. अशी ओढ बाकी खेळांबाबत भारतीयांना नसल्यामुळेच राही सरनोबतसारख्या होतकरू खेळाडूंवर अन्याय होतो.

– दिलीप तिवारी, विद्यार्थी

– संकलनः प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *