नुकताच गुढीपाडवा झाला. लहानपणी गुढी उभारल्यानंतर आजीने कडुनिंबाची चटणी थेंबभर तरी खाल्ल्याशिवाय श्रीखंड पुरी मिळायची नाही. कडुनिंबाची चटणी प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता तर उपयोगी आहेच पण कटुता विसरून केलेल्या कष्टांची सांगता आणि नवीन पर्वाचा आरंभ करायचा संदेशही आपल्याला यातून मिळतो. तसंच उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याची चाहूलही गुढीपाडव्याला लागते. त्यामुळे मनाला आणि शरीराला थंडावा देण्याकरता कैरीचं वेलची घातलेलं पन्हं, आवळ्याचं सरबत, कोकम सरबत आरोग्यदायी ठरतं. तर कधीतरी आंब्याची डाळही खायला हरकत नाही. या सार्याचा संबंध थेट आरोग्याशी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. उन्हाळ्याचा त्रास टाळण्याचा हा एक उपाय! मला Goodness आणि गुढी हे जवळचे शब्द वाटतात. त्यामुळे एकप्रकारे वर्षभरासाठीच्या चांगल्या आरोग्याची गुढी या निमित्ताने आपण उभारू शकतो.

काही दिवसांपूर्वी बहुचर्चित Congenital Heart Disease म्हणजेच जन्मजात हृदयाचे व्यंग असलेली मुलं आणि त्यावर उपलब्ध उपचारपद्घती याबद्दल चर्चा वाचनात आली. अनेक प्रथितयश व्यक्तिंनी त्यावर आपली मतं व्यक्त केली आणि कदाचित पुढे प्रयत्नांनी या सुविधा वाढवण्यात यश येईलही अशी आशा करायला हरकत नाही. परंतु होणार्या भावी मातांकरता आपल्या मुलांना हे ‘व्यंग’ होऊच नये याची काळजी घेण्याची गरज वाढते की ज्यायोगे आरोग्याची गुढी गर्भातच बांधली जावी.

सुदृढ बालक जन्माला येण्यासाठी होणार्या मातेच्या आहारातील संतुलन निश्चित महत्त्वाचं ठरतं. विशेषतः Folic Acid  हे जीवनसत्त्व तसंच लोहाचं (Iron) योग्य प्रमाणही गरजेचं असतं. तर Vitamin D आणि Calcium सुद्धा हवंच. कैरीच्या पन्ह्यातून, आवळ्याच्या सरबतातून मिळणारं क जीवनसत्त्व म्हणजेच Vitamin C

प्रतिकारशक्तीवर्धक ठरतं. तर E Vitamin आवश्यक असलं तरी त्याहून गर्भावस्थेत Hepatitis E

विषाणूपासून संरक्षण जास्त गरजेचं असतं. माशा बसलेल्या खाण्यातून किंवा दूषित पाण्यातून जाणार्या या विषाणूचा संसर्ग गर्भावस्थेत टाळणं अतिशय महत्त्वाचं!

आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात जन्माला येणारं बाळ निर्व्यंग जन्मण्याकरता घेण्याची ‘काळजी’ याबाबत माहिती करून घेणं आवश्यक आहे. आजची जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. आता करिअरला अधिक प्राधान्य देण्यात येतं. परिणामी, आईचं वाढलेलं वय, आपण वापरत असलेली अनेक तर्हेची उपकरणं याचा परिणाम होणार्या बाळावर होऊ शकतो. त्यासाठी गर्भधारणेच्या वेळी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं ठरतं. गर्भधारणेआधीच्या आणि गर्भधारणेनंतर पहिल्या तीन महिन्यांत म्हणजेच जेव्हा बाळाचे विविध अवयव घडत असतात Organogenesis च्या काळात महत्त्वाच्या ठरणार्या औषधांची माहिती आता सहज उपलब्ध आहे. Folic Acid आणि Iron च्या गोळ्या महापालिकेत मोफत मिळतात. तसंच आहारात नेहमी वापरात येणार्या नेमक्या कोणत्या घटकात ती उपलब्ध असतात त्याचीही माहिती उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहिती आपण पुढील भागात घेऊया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *