महाराष्ट्रात जातीच्या राजकारणाचा विचार केला तर, कोणताही जनाधार नसतानाही ब्राह्मण समाजाच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोपवण्यात आल्यामुळे अनेकांना ‘आश्चर्याचा धक्का’ बसला असला तरी, त्यामागचं ‘अन्वयार्थ’ही तितकंच बोलकं आहे. महाराष्ट्रातील राजकारण ‘मराठा-मराठेतर’ असं विभागलं जात असताना तसंच मराठा राजकारणाला पुन्हा नव्याने धुमारे फुटत असताना, विद्वान, अभ्यासू आणि आक्रमक असले तरी फडणवीस महाराष्ट्रात चालतील काय? असा प्रश्न विचारला जातो आहे. विशेषतः फडणवीसांची संघाची पार्श्वभूमी आणि ‘आडनाव’ हे विरोधकांचं ‘सॉफ्ट टार्गेट’ असेल, अशावेळी फडणवीसांकडे भाजपाची गुढी देऊन पक्षाने काय साधलं असा विचार केला तर, त्यामागचे कंगोरे लक्षात येतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्षपदी नकोत, ते सोडून कोणीही चालतील, अशी भूमिका ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरुवातीपासूनच घेतली होती. मुंडेंचा सुरुवातीला रावसाहेब दानवेंच्या नावाला पाठिंबा होता मात्र दानवेंच्या नावावर संघाने फुली मारल्यानंतर, या पदासाठी मुंडेंनी स्वतःसाठीही प्रयत्न करून पाहिला मात्र तो गडकरींनी उधळून लावला. त्याचवेळी गडकरींनी मुनगंटीवारांसाठी आपली सगळी ताकद पणाला लावली. मुनगंटीवार हेच पुन्हा प्रदेशाध्यक्ष होतील, असं वातावरण असताना, राजनाथसिंगांच्या घरी पाडव्याच्या आदल्यादिवशी झालेल्या बैठकीचा नूर मात्र वेगळाच ठरला. काही वर्षांपूर्वी मधू चव्हाण यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने संतापलेल्या मुंडेंनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. मुनगंटीवार यांना संधी दिल्यास पुन्हा मुंडेंनी बंडाचा इशारा दिल्याने तसंच काँग्रेस नेत्यांशी चर्चेच्या फेर्या वाढवल्याने भाजपाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचाही ‘रक्तदाब’ वाढला. त्यामुळे अखेर भाजपा श्रेष्ठींचा नाईलाज झाला आणि गडकरींची ‘समजूत’ काढून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करावं लागलं.

फडणवीसांच्या नियुक्तीमुळे गडकरींचं दिल्लीतलं वजन घटल्याचंही सप्रमाण सिद्ध झालं आहे. मुंडेंनी तर ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारण्याची किमया फडणवीसांच्या नियुक्तीमधून केली आहे. नागपुरमध्ये जातीने ब्राह्मण असलेल्या गडकरींना त्यांच्याच जातीतून तितकाच समर्थ पर्याय उभा करण्यात मुंडे यशस्वी ठरले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये तोडपाणी न करता प्रामाणिकपणे भूमिका लावून धरणारे नेते म्हणून फडणवीसांचा नावलौकिक आहे. आपल्या अभ्यासू आणि आक्रमक आवेशाने त्यांनी अजितदादा पवारांसारख्या नेत्याच्याही तोंडाला फेस आणला आहे. पूर्ती तसंच इतर अनेक प्रकरणांमधून नितिन गडकरी-अजित पवार ही छुपी राजकीय आणि व्यावसायिक युती आता उघड झाली आहे. फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाल्यास ते या युतीचा पर्दाफाश करतील, अशी भीती राष्ट्रवादीच्या आणि भाजपातील एका गटातही सातत्याने दिसून येत होती. त्यामुळेच फडणवीसांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी सर्व थरांतून प्रयत्न झाले होते. आता ही भीती साधार ठरण्याची चिन्हं दिसत आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या बीडमधील ‘राजकीय पानिपता’ची ‘सूत्रं’ बारामतीमधून हलली असली तरी त्याचं ‘दिशादर्शन’ नागपुरातून झाल्याचं बोललं जातंय. आता नागपुरातूनच नागपुरच्या ‘गडकरी वाड्या’ला तसंच बारामतीच्या ‘दादांना’ ‘त्राही भगवान’ करण्यासाठी ‘भगवानगढा’वर नितांत श्रद्धा असलेले मुंडे बीडमधून यापुढचं ‘दिशादर्शन’ करतील, असं मानलं जातंय. फडणवीसांच्या बाबतीत जातीयवादी प्रचारविरोधकांनी केला तरी, मध्यमवर्गीय मतं भाजपाला मिळतील तसंच मराठेतर बहुजनांची एकत्रित मोट बांधून मुख्यमंत्रीपदाचं तोरण लावता येईल, असा मुंडेंचा कयास आहे. त्यामुळे गेली सात वर्षं जात्यात असलेले आणि आता सुपात आलेले मुंडे त्यात यशस्वी होतात का, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *