IMPOSSIBLE…छे छे सचिनने त्याच्या ४० वर्षांत आमच्या आयुष्यातील IMPOSSIBLE या शब्दाची ओळखच बदलून टाकलीय… माझ्या पिढीचा प्रत्येकजण आताशा हा शब्द I… M… POSSIBLE असा वाचू लागलाय. जगात अशक्य असं काहीच नसतं. कारण अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करून दाखवता येतात हा विश्वास सचिनने आमच्या पिढीला दिलाय. सचिनच्या चाळिसाव्या वाढदिवसाची बातमी करताना मनात असे अनेक विचार सुरू होते…

फार पूर्वी टीव्हीवर एक कोकाकोलाची जाहिरात यायची. अझरचं टीममधलं अबाधित स्थान जागवण्यासाठी भारतीय टीमचं खुर्चीवर बसलेलं छायाचित्र दाखवलं जायचं. त्यात अझर खुर्चीत कायम बसलेला दाखवला जायचा आणि त्याच्या सभोवतालची टीम बदललेली दाखवली जायची. अझरनंतर त्याची ही जागा सचिनने घेतली. गेली २० वर्षं सचिनशिवाय भारतीय टीमचा विचारच होऊ शकलेला नाही. गेल्या २० वर्षांत कोणत्याही राजकीय नेत्याला, सिने अभिनेत्याला एवढी लोकप्रियता मिळू शकलेली नाही.भारतीय क्रिकेटमध्ये आलेली आर्थिक सुबत्ता आणि सचिनचा क्रिकेटमधला उदय या दोन समांतर गोष्टी आहेत. किंबहुना क्रिकेटमध्ये पैशांचा ओघ सुरूहोण्यास सचिनची लोकप्रियता कारणीभूत होती असं म्हटलं तर वावगं ठरू नये. जगमोहन दालमियांना गंमतीने डॉलरमियाँ म्हटलं जायचं. क्रिकेटचं मार्केटिंग त्यांच्या इतकं जगात कुणालाच जमलं नाही. आज जे क्रिकेटपटूंना लाखांनी निवृत्त वेतन मिळतं ही त्यांचीच कृपा. पण या डॉलरमियाँना क्रिकेटचं हे मार्केटिंग करण्यासाठी सचिनची लोकप्रियता कारणीभूत ठरली हे नाकारून चालणार नाही.

मार्क मास्करहेन्स या कल्पक व्यक्तिने सचिनची ही गुणवत्ता हेरली. वर्ल्डटेलकरवी त्याने सचिनची गुणवत्ता तब्बल शंभर कोटी रुपये मोजून करारबद्ध केली. सचिन रातोरात अब्जोपती झाला. तोवर गावस्करपासून अझरपर्यंत आणि अजित वाडेकरपासून कपिल देवपर्यंत कुणालाच हे जमलं नव्हतं. किंवा त्यांच्या वाट्याला पैशांचा हा पाऊस आला नव्हता. सचिनने कुबेराचं हे दालन क्रिकेटर्ससाठी उघडलं आणि पुढली पिढी मग लखपतीच जन्माला येऊ लागली. आता काय आयपीएलचा एक हंगाम खेळलात तरी करोडपती होता येतं.

सचिनने केवळ क्रिकेटच श्रीमंत केलं नाही, तर आमचं अनुभवविश्वही समृद्ध केलं. आमच्या पिढीला आत्मविश्वास दिला. पाकिस्तानच्या भूमीवर पहिल्याच बॉलवर कपाळमोक्ष झाल्यानंतरही ज्या जिद्दीने तो उभा राहीला ती जिगर कौतुकास्पद होती. पाकिस्तानच्या अब्दुल कादिरला सांगून सहा बॉलवर सहा सिक्स ठोकणारा सचिन आमच्या पिढीसाठी आयकॉन होता आणि सदैव राहिल. मी सारखा आमची पिढी म्हणतोय याचा अर्थ सचिनचे समवयस्क बरं का? कारण सध्या सचिनच्या खेळावर त्याच्या वयाचा परिणाम जाणवू लागलाय. त्याचे रिफ्लेक्सेस पूर्वीसारखेराहिलेले नाहीत. पूर्वी मला आठवतं आम्ही फक्त सचिनसाठी मॅच पहायचो. तो आऊट झाल्यावर टीव्ही बंद व्हायचा. त्यावेळेचं जग सचिनमय होतं. त्याकाळात तीन गोष्टींमुळे भारत बंद व्हायचा, एक सचिनची बॅटिंग, दुसरं रामायण आणि तिसरं महाभारत.

सचिनने ७५ सेंच्युरी पूर्ण केल्यावेळची गोष्ट. आमचे क्रीडा पत्रकार मित्र द्वारकानाथ संझगिरी यांच्या डोक्यात आयडिया आली की आपण मराठी क्रीडा पत्रकारांनी सचिनची अमृतमहोत्सवी सेंच्युरी सेलिब्रेट करायची. स्थळ ठरवण्यात आलं शिवाजीपार्कचा जिमखाना. या कार्यक्रमात सचिनला पुष्पगुच्छ द्यायचं ठरलं आणि पटकन मी बोलून गेलो च्यायला सचिनला पुष्पगुच्छ कसला द्यायचा, आपण त्याला सोन्याची बॅट देऊ तीही ७५ ग्रॅमची. विश्वास ठेवा एकतर आम्ही मराठी क्रिडा पत्रकार. त्या प्रोग्रॅम ठरवण्याच्या बैठकीला आम्ही मोजून पाच-सहा पत्रकार. आम्हा पाच-सहा पत्रकारांच्या संपूर्ण अंगावरचं सोनं मोजलं असतं तरी ते ३० गॅ्रमच्या पलीकडे गेलं नसतं. सर्वांनी मला मी जणू काही येरवड्यातून नुकताच आलोय अशा संशयी नजरेने बघितलं होतं. आजही मला तो सीन जशाच्यातसा आठवतोय. पण जगात अशक्य असं काहीचं नसतं हे सचिननेच आम्हाला शिकवलंय की? मग काय मी माझ्या मतावर ठाम. संघटनेचा सचिव या नात्याने मी पैसे उभारण्याचा विडा उचलला. मला आजही आठवतं त्यावेळी फक्त दोनच व्यक्ती होत्या एक स्वतः संझगिरी आणि दुसरा माझा जिवाभावाचा सहकारी पत्रकार मित्र मंगेश वरवडेकर ज्यांनी माझ्यावर सर्वात आधी विश्वास ठेवला. मग काय टार्गेट ठरलं, सोन्याची बॅट द्यायची. तुम्ही विश्वास ठेवा सचिन नावाचा बॅँ्रड काय आहे हे आम्हाला त्यावेळी समजलं. केवळ सचिनच्या गौरवासाठी स्पॉन्सर आमच्यापर्यंत चालत आले. इंडियन ऑईल, स्टेट बँक, एडस् नियंत्रण जिल्हा संस्था आणि असे कितीतरी… आमचे पत्रकार मित्र सुभाष हरचेकर यांच्या पुढाकाराने पेडणेकर ज्वेलर्सने सोन्याची बॅट बनवून देण्याची तयारी तीही एकही छदाम न घेता दाखवली. आता प्रश्न राहिला की सचिनचा सत्कार कुणी करायचा, मग त्यासाठी संझगिरींनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. आणि दिदी तयार झाल्या. मग विचार आला की एकट्या सचिनचा का सत्कार करायचा त्याला घडवणार्या अवघ्या कुटुंबाचं अवघं क्रीडा विश्व ऋणी आहे. मग ती जबाबदारी संझगिरींकडे सोपवण्यात आली. या व्यक्तित काय जादू आहे कोणास ठाऊक. सचिनचं अवघं कुटुंब एकाच व्यासपीठावर उपस्थित होतं. त्यात सचिनची आई होती. त्याची बहिण सविता होती. सचिनचे भाऊ अजित आणि नितिन तेंडुलकर उपस्थित होते. सचिनचं अवघं कुटुंब तेव्हा पहिल्यांदाच आणि शेवटचं एकाच व्यासपीठावर होतं. त्या अविस्मरणीय सोहळ्याचे आयोजक होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं हा आम्ही आमचा सन्मान मानतो. भारतरत्न लतादिदींच्या हस्ते भावी भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या सत्काराचं दृश्य दुर्मीळ असंच होतं. बीबीसी, सीएनएन सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमापासून भारतातील सगळ्याच मीडियाने सचिनच्या गौरवाची ती बातमी पहिल्या पानावर ठळकपणे छापली होती. सात वर्षं झाली त्या घटनेला, सचिनच्या ४०व्या वाढदिवसाला आऊटलुकने त्याच्यावर एक स्पेशल विशेषांक काढलाय. त्यात लता दिदी सचिनला सोन्याची बॅट देतानाचा तो अजरामर क्षण ठळकपणे छापलाय. तो फोटो पाहिला आणि पुन्हा एकदा मी मनाशी पुटपुटलो, होय अशक्य खरंच शक्य करून दाखवता येतं. सचिननेच तर हे आम्हाला शिकवलंय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *