चार एप्रिलच्या बिझिनेस स्टॅण्डर्डमधील अजित बालकृष्णन् यांच्या लेखाने शिक्षण आणि नोकर्या यांच्यातील बदलाने नव्याच समस्या उभ्या रहात आहेत हे प्रकर्षाने पुढे आलं आहे.

गेल्या तीन वर्षांत अमेरिकेतील जवळपास तीन लाख पदवीधरांना वेटर्स, कॅशियर्स, सुरक्षा रक्षक म्हणून काम करावं लागत आहे. त्याच्यापैकी ३७ हजार तरुणांनी उच्च शिक्षण घेतलं आहे.

चीनमधील पदवीधर कारखान्यातील नोकर्यांना नकार देत आहेत. त्याऐवजी शॉपिंग मॉलच्या सुरक्षा रक्षकाचं, हॉटेलमधील वेटरचं, बांधकामाच्या जागी सुरक्षा रक्षकाचं काम करणं ते पसंत करत आहेत. कारखान्यात कामगारांची मागणी असताना त्यासाठी अर्ज न करता कमी वेतनाच्या नोकर्या करत, कार्यालयातील व्हाईटकॉलर जॉबच्या शोधात ते असतात. कारखान्यातील नोकरी आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही असं पदवीधरांना वाटतं.

– इजिप्तमध्ये होस्नी मुबारकची ३० वर्षांची राजवट जनउठावाने संपुष्टात आणली. या उठावात तरुणांचा मोठा सहभाग होता. वास्तविक होस्नी मुबारकच्या कालखंडात इजिप्तने साडेचार पट प्रगती केली आणि जागतिक मंदीच्या काळात ती ७.२ टक्क्यांवरून ४.५ टक्के वाढीपर्यंत घसरली. जगातील इतर राष्ट्रांत काय झालं हे पहाता ४.५ टक्क्यांची वाढही समाधानकारक होती असं दिसतं. म्हणजे होस्नी मुबारकच्या सत्ता काळात इजिप्तने समाधानकारक आर्थिक प्रगती केली असूनही तरुणवर्ग त्याच्या विरोधात का उभा राहिला? हा केवळ हुकूमशाही विरोधी लढा होता की आणखी काही? इजिप्तमध्ये बालमृत्युचं प्रमाण घटल्याने ७० आणि ८०च्या दशकात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. २०१० मध्ये २० ते २५ वयोगटांतील तरुणांची संख्या २५ लाखांवर गेली. पैकी निम्मे तरुण पदवीधर होते. पण पर्यटन क्षेत्रापलीकडे नोकर्या उपलब्ध नव्हत्या. त्यातूनच तरुणवर्गात असंतोषाची ठिणगी पडली आणि होस्नी मुबारकला सत्ता सोडावी लागली.

अमेरिकेतील एका पाहणीनुसार २००० सालानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेत ज्ञानाधारित आणि कौशल्याच्या कामाची मागणी कमी होत आहे. याचाच अर्थ विश्वविद्यालयीन पदवीधरांची मागणी कमी होत आहे. त्याचवेळी दुसरीकडे पदवीधरांची संख्या प्रचंड वाढत आहे. ज्ञानाधारित आणि कौशल्याच्या नोकर्या उपलब्ध नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांना कमी कौशल्याच्या नोकर्यांकडे वळावं लागत आहे. त्यातून वेटर, कॅशिअर, मोटर मेकॅनिक असली कामं स्वीकारावी लागत आहेत. ८० आणि ९० च्या दशकात संगणक क्रांतीने माहितीयुग अवतरलं. परिणामी संगणक क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. त्यातून पदवीधरांची मागणी वाढली. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॉलेज शिक्षणाचा विस्तार होऊन पदवीधरांचा पुरवठा वाढला. पण संगणक क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर २००० सालानंतर या क्षेत्रातील नवा रोजगार मंदावला. आता नव्याने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज राहिली नाही तर असलेल्या सुविधांची देखरेख करणं, देखभाल करणं हे काम उरलं आणि त्यासाठी ज्ञानाधारित कौशल्य असलेल्यांची गरज पूर्वीपेक्षा कमी झाली.

भारतातही शिक्षण आणि रोजगारातील विसंवाद पुढे येत आहे. महाराष्ट्रात उसाच्या पिकासारखं इंजिनिअरिंग कॉलेजचं प्रचंड पीक आलं. देणग्यांनी चालकांचे खिसे फुगले. पण आता दरवर्षी इंजिनिअरिंगच्या जागा विद्यार्थी मिळत नसल्याने तशाच रिकाम्या रहात आहेत. एके काळी बारावीला ८०-८५ टक्के गुण मिळवून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नव्हता. मोठमोठ्या देणग्या द्याव्या लागत होत्या. आता ४५ टक्केवाल्यालाही प्रवेश मिळतो अशी स्थिती आहे. तसंच काहीसं मॅनेजमेंट अभ्यासक्रमात होत आहे. लक्षावधी पदवीधारकांतील फक्त प्रसिद्ध संस्थेतील विद्यार्थ्यांनाच आज मागणी आहे.

अर्थव्यवस्थेतील बदल, तंत्रज्ञानातील बदल, आर्थिक धोरणं आणि शिक्षणाचा व्यापार करण्याची स्पर्धा यातून तरुणवर्गापुढे प्रश्न निर्माण होत आहेत. जगभरच्या मंदीनंतर सर्वच क्षेत्रातील ज्ञानाधारित कौशल्यांची मागणी कमी झाली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि अन्य पाश्चात्य देशातील उच्चशिक्षितांची गरज कमी झाली आहे. दुसरीकडे त्या देशातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे आणि त्यातून स्वदेशी-परदेशीचा पेच उभा रहात आहे. भारतालाही मंदीचा फटका बसला आहे. आज विकास वेग पाच टक्क्यांवर आला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यातही सेवा क्षेत्राचा वेग जास्त घसरला आहे. आणि औद्योगिकीकरणाचा वेग वाढत नाहीये. मग उच्च शिक्षितांना नोकर्या मिळणार कुठून?

उच्च तंत्रज्ञानाबद्दल देशाचं काही धोरणच नाही. परिणामी गरजा, श्रमशक्ती आणि रोजगार यांचं गणित न करता डोळे झाकून उच्च तंत्रज्ञान स्वीकारलं जात आहे. त्यामुळे रोजगारांची संधी वेगाने कमी होत आहे. हे उद्योगात घडत आहे, हे आता सेवा क्षेत्रातही घडत आहे, विशेष म्हणजे शेतीतही उत्पन्न वाढून रोजगार घटत आहे. पण या वस्तुस्थितीची दखल राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष घेताना दिसत नाहीत.

देशापुढील प्रश्नांचा विचार आपण सुटा सुटा करतो. शिक्षणाचा प्रश्न वेगळा, बेकारीचा वेगळा, स्थलांतराचा वेगळा, वास्तविक हे सगळे प्रश्न एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणूनच विकासाचा समग्रतेने विचार करावा लागतो. अन्यथा एक प्रश्न सोडवता सोडवता त्यातून नवे प्रश्न उभे राहतात. त्या प्रश्नांचं आपल्याला भानही नसतं. अरब देशातील उठाव असोत की पाश्चिमात्य देशातील तरुणांचा असंतोष असो, चीनमधील वाढती अस्वस्थता असो, की भारतातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि निर्भया प्रश्नावरील तरुणांच्या प्रतिक्रिया असोत, समाजातील वाढत्या विसंवादाला फुटत असलेले ते नवे धुमारे तर नाहीत?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *