सेहवागला डच्चू… हे दोन शब्द खरं तर माझ्या पचनी पडत नव्हते. पण या दोन शब्दांनी मला १२ वर्षं मागे भूतकाळात नेलं. दिवस कसे बदलतात ना! एक काळ असा होता की याच सेहवागसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय अवघ्या क्रिकेट जगताशी युद्ध करायला तयार होतं. बरोबर १२ वर्षांपूर्वीचा म्हणजेच २००१चा भारताचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आठवतोय का? याच दौर्यातील दुसर्या टेस्टमध्ये मॅच रेफ्री माईक डेनिस यांनी सेहवागसह सहा भारतीय क्रिकेटर्सवर अवाजवी अपील केल्याचा ठपका ठेवत एक सामन्यासाठी बंदी ठोठावली होती. क्रिकेटमधील महासत्ता असणार्या बीसीसीआयने मग हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवत आपले दंड ठोठावले होते. डेनिस यांना मॅच रेफ्री पदावरून हटवल्याशिवाय न खेळण्याचा पवित्रा बीसीसीआयने घेतला होता. मग काय दक्षिण आफ्रिकेनेही झुकतं माप घेत डेनिस यांची हकालपट्टी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सेहवागला टीममध्ये तिसर्या टेस्टमध्ये खेळवल्यामुळे मग त्या टेस्टचा दर्जा काढून घेतला होता. त्या मॅचला मैत्रीपूर्ण असा करार देण्यात आला. आणि दक्षिण आफ्रिकेला तीन टेस्टच्या त्या सीरिजमध्ये पहिल्या टेस्टच्या विजयाच्या जोरावर १-० असं विजयी घोषित करण्यात आलं. आणि ज्या ज्या टेस्टमध्ये सेहवागला खेळवलं जाईल त्या टेस्टचा दर्जा काढून घेण्याचा इशारा आयसीसीने दिल्यामुळे इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट धोक्यात आली होती. अखेर क्रिकेटच्या भल्यासाठी सेहवागला विश्रांती देण्यात आली. सेहवाग टीममध्ये नसणं म्हणजे त्यावेळी राष्ट्रीय आपत्तीचा विषय ठरला होता. आणि अशा सेहवागला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन टेस्टसाठी डच्चू दिला गेलाय. निवड समितीने सेहवागच्या नावावर फुल्ली मारलीय, विशेष म्हणजे त्याच्याऐवजी कुणी दुसरा बदली खेळाडू न निवडता. सेहवागच्या चाहत्यांना म्हणूनच हा निर्णय जिव्हारी लागणारच. खरं तर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट दिमाखात जिंकल्यात. चार टेस्टच्या या सीरिजमध्ये भारताकडे अपराजित आघाडी आहे. भारतासाठी येथून फक्त विजय आणि विजयच आहे. साधारणतः विजयी चमूत बदल केला जात नाही असा क्रिकेटमध्ये दंडक आहे आणि सीरिज सुरू असताना तर नाहीच नाही. तरीही सेहवागवर कुर्हाड कोसळली.

खराब कामगिरीसाठी जर सेहवागला डच्चू दिला गेला तर मग तोच न्याय धोणी आणि सचिनचा खराब फॉर्म सुरू असताना का झाला नाही? असा साधा सवाल आहे.

अर्थात पुस्तकी कायद्याप्रमाणेच बोलायचं झालं तर शेंबडं पोरसुद्धा सेहवागला वगळण्याचं समर्थन करेल कारण त्याची कामगिरी खरोखरच खराब होती. टेस्टचा विचार करायचा झाला तर नोव्हेंबर २०१० मध्ये त्याने न्युझीलंडविरुद्ध १७३ रन्सची सेंच्युरी इनिंग पेश केली होती. पण त्यानंतर टेस्ट सेंच्युरी ठोकण्यासाठी त्याला दोन वर्षं वाट पहावी लागली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये नोव्हेंबर २०१२ला अहमदाबाद येथील पाटा खेळपट्टीवर सेहवागने सेंच्युरी ठोकली होती. पण त्याचा त्यानंतरच्या पाच टेस्टमध्ये स्कोर होता… २५, ३०, ९, २३, ४९, ०, २, १९ आणि ६… सेहवागच्या एकूणच टेस्ट करियरवर नजर टाकली तर गेल्या काही वर्षांत सेहवाग आशियाई खेळपट्ट्या सोडल्या तर विदेशातील उसळत्या खेळपट्ट्यांवर अपयशी ठरत होता. दुखापतीनंतर २००७-०८च्या हंगामातील अॅडलेड टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकत सेहवागने यशस्वी पुनरागमन केलं होतं. पण ती त्याची आशियाबाहेरील देशातील शेवटची टेस्ट ठरली होती. एकीकडे आशियाबाहेरील देशात १२ टेस्टमध्ये २२च्या सरासरीने अवघ्या ५२७ रन्स करणारा सेहवाग आशियाई देशात मात्र ५७च्या सरासरीने ३६२२ रन्स करत होता. पण गेल्या वर्षभरात आशियाई देशांतील खेळपट्ट्यांवरही सेहवागचा धावांचा ओघ आटला होता. त्यात ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर वर्षअखेरीस भारत दक्षिण आफ्रिकेचा आणि त्यानंतर सलग तीन विदेश दौरे करणार आहे. बरं त्यात गौतम गंभीरही खराब खेळामुळे टीममधील आपली जागा गमावून बसलाय. त्यालाही गेल्या तीन वर्षांत टेस्ट सेंच्युरी ठोकता आलेली नाही. त्यामुळे येत्या फॉरेन टूरचा विचार करता निवड समितीला नव्याने ओपनिंग जोडी शोधावी लागणार आहे. सध्या तरी शिखर धवन हा या जागेसाठी पहिली पसंत आहे. आणि त्यानंतर मुंबईकर अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. पण यंदा रणजीमध्ये मुंबईकडून वसीम जाफरने धावांचा पाऊस पाडलाय आणि तो रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरलाय. त्याने मुंबईच्याच अमोल मुझुमदारचा ९१०५ रन्सचा विक्रम तर मागे टाकलाच पण सर्वाधिक ३२ सेंच्युरी ठोकून अजय शर्माचा (३१ सेंच्युरी) विक्रमही आपल्या नावावर केलाय. या कामगिरीच्या जोरावर भारताच्या टेस्ट टीममध्ये ओपनर म्हणून त्याने आपला दावा सिद्ध केलाय. साधं उदाहरण सांगतो. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटचा दौरा सुरूकरून भारताला तब्बल २२ वर्षं झालीत. या २२ वर्षांत दक्षिण आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर सेंच्युरी ठोकणारा वसीम जाफर हा भारताचा आजवरचा एकमेव ओपनिंग बॅट्समन आहे. सौराष्ट्रविरुद्धच्या फायनलमध्येही त्याने मुंबईकडून शानदार सेंच्युरी ठोकत १३२ रन्सची खेळी पेश केली. लक्षात घ्या ज्या खेळपट्टीवर सौराष्ट्रचा दुसरा डाव अवघ्या ८२ रन्समध्ये कोसळला त्या खेळपट्टीवर जाफरच्या १३२ रन्स म्हणूनच उठून दिसतात. पण त्या निवड समितीला का दिसू नये? विशेषतः निवड समितीचा अध्यक्ष मुंबईकर संदीप पाटील असताना हे का व्हावं?

या सर्व समीकरणांच्या जुळवाजुळवीत एक प्रश्न मनाला सतावतोय सेहवाग संपलाय का? माझ्यापुरतं तरी त्याचं उत्तर सेहवाग संपूच शकत नाही! तो येईल. अधिक जोमाने उसळी मारून परत येईल. जसा अॅडलेडला सेंच्युरी ठोकत आला होता. भारतीय क्रिकेटमधील तो दबंग आहे. त्याच्यासाठी कोणतेही कायदेकानून नसतात. तो बोलतो तो कायदा होता आणि तो ठोकतो तो सिक्सर… ट्रीपल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर जो सिक्सर ठोकू शकतो तो सेहवाग काही करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *