जगात असे अनेक प्रदेश आहेत जे ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाले आहेत. असाच एक प्रदेश आहे पोर्तुगालमध्ये… पण या प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आहे नऊ बेटांचा समूह जो ‘अझोर्स’ या नावाने ओळखला जातो. अटलांटिक महासागराच्या उत्तरेला असलेला ‘अझोर्स’ हा द्विपसमूह लिस्बनच्या पश्चिमेला १५०० किमी तर न्यूफाऊंडलँडच्या नैऋत्य दिशेला १९०० किमी एवढ्या अंतरावर वसलेला आहे.

अझोर्सची नऊ बेटं ही तीन भागात विभागली गेली आहेत. यामध्ये पश्चिमेला फ्लॉरेस आणि कार्व्हो, पूर्वेला सँटा मारिआ आणि साओ मिग्युअल तर मध्य भागात टेर्सेरिया, ग्रेसिओसा, साओ जॉर्ग आणि पिको ही बेटं आहेत आणि त्या प्रत्येक बेटाचं एक खास वैशिष्ट्य आहे. यातील पिको बेटावर पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेला २, ३५१ मीटर्स उंचीचा माऊंट पिको नावाचा पर्वत आहे. एका बाजूला उंच पर्वत आणि पायथ्याशी समुद्र असं अनोखं चित्र इथे पर्यटकांना बघायला मिळतं.

जैवविविधतेने नटलेला हा द्विपसमूह ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाल्यामुळे या परिसराला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालं आहे. इथल्या सँटा मारिआ या बेटावर काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे आढळतात तर खोल तलावही पर्यटकांना आकर्षित करतात. तसंच ज्वालामुखीमुळे समुद्राच्या किनार्यावर मोठमोठे खडक तयार झाले आहेत. या खडकांमुळे बेटांचं रक्षण तर होतंच पण त्याला वेगळं रूप आलंय. आणि अनेक पक्ष्यांसाठी आसरा घेण्यासाठी जागा तयार झाली आहे.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इथली माती वेगळ्याप्रकारची आहे. त्यामुळे इथे हिरव्यागार झाडांवर विविध रंगी फुलं मन मोहून टाकतात. यामध्ये इंग्लिश होली, शीपबेरी अशी अनेक फुलझाडं इथे आढळतात. तसंच बीड ट्री, बलाडोना आणि इतर अनेक वृक्ष या परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. फुलांच्या ताटव्यातून, हिरव्या वृक्षराजींच्या छोट्या गावांतून फिरणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. या परिसरातले लोक खास करून शेती आणि पशुपालनवर आधारित व्यवसाय करतात. इथे साओ डि फिला म्हणून ओळखली जाणारी वैशिष्ट्यपूर्ण कुत्र्याची एक जात आढळते. शेतकर्यांना त्यांच्या शेताचं आणि जनावरांचं रक्षण करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

या परिसरातलं सागरी जीवनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या समुद्रात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मत्स्यालयाचा अनुभव पर्यटकांसाठी खूपच रोमांचक असतो. रंगीबेरंगी सागरीजीव आणि पाणवनस्पती इथे आढळून येतात. परंतु यासर्वांमध्ये आकर्षणाचा क्रेंद्रबिंदू आहेत ते म्हणजे इथे दिसणारे व्हेल्स आणि डॉलफिन्स. समुद्रसफरीत व्हेल्सना पोहताना पाहणं म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते. तसंच याचिंग, सर्फिंग, रोविंग, स्विमिंग अशा सागरी खेळांचाही आनंद लुटता येतो. तर अझोर्स द्विपसमूहांवर सपाट परिसरही असल्यामुळे इथे गोल्फ हा खेळही लोकप्रिय आहे. तर अझोरिअन इंटरनॅशनल पॅराग्लायडिंग एन्काऊंटर ही स्पर्धाही जगप्रसिद्ध आहे.

उंच पर्वत, हिरवीगार वृक्षराजी, विविधरंगी फुलं याबरोबरच अनोखं सागरीजीवन या सर्व गोष्टींचा आनंद पर्यटकांना अझोर्स द्विपसमूहावर लुटायला मिळतो. निसर्गाच्या विविध रूपांचा अनुभव घेण्यासाठी एक चांगलं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून अझोर्स एक चांगला पर्याय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *