या लेखात आपण स्वातंत्र्योत्तर काळातील भारत आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक या दोन घटकांची माहिती घेऊया. आयोगाने स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्त्वाच्या घडामोडींचा नव्या अभ्यासक्रमात जाणिवपूर्वक समावेश केला आहे. यात १९५४ ते १९८५ हा कालखंड अधोरेखित केलेला आहे. अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचं व्हावं म्हणून हा कालखंड विविध पद्धतीने विभागता येतो. त्यातील एक पद्धत म्हणजे अभ्यासक्रमाचे कालखंडानुसार आपण १९४७-१९५०, १९५०-१९६४ आणि १९६४ ते १९७७ आणि १९७७ पासून पुढे असे वर्गीकरण करून अभ्यासाची दिशा ठरवणं होय. या संदर्भातील दुसरी पद्धत म्हणजे घटक-उपघटकांच्या आशयाच्या आधारे स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय घडामोडी आणि प्रश्न; स्वातंत्र्योत्तर भारताची उभारणी – ज्यात नियोजन, शेती, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान या घटकांचा समावेश होतो; आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारत अशी विभागणी करता येते. यातील दुसर्या पद्धतीला अनुसरून प्रस्तुत घटकांच्या अभ्यास धोरणाची पुढीलप्रमाणे चर्चा करता येते.

[restrict userlevel=”subscriber”]

स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये भारताची फाळणी, संस्थानांचं विलिनीकरण, भाषावार प्रांतरचना, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, नक्षलवाद, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली पुढे आलेली विद्यार्थी चळवळ, बांग्लादेशप्रश्न, आणीबाणी, पंजाब, आसाम प्रश्न, या महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करावा लागेल. या घडामोडी आणि संबंधित प्रश्नांचा अभ्यास करताना तिचा उदय, उदयाची कारणं, संबंधित व्यक्ती, संघटना, सामाजिक पाया, उपस्थित केलेले प्रश्न, अशा घडामोडीस शासनाने दिलेला प्रतिसाद, त्या घडामोडीचा एकंदर राजकीय-सामाजिक-आर्थिक जीवनावर पडलेला प्रभाव आणि सद्यस्थिती इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करावं लागेल. अशारीतीने एकूण राजकीय-सामाजिक प्रक्रिया समजूनच अशा घडामोडींचा अभ्यास करता येतो. एकीकडे अशा घडामोडींविषयीची तांत्रिक माहिती आणि दुसर्या बाजूला तिचं विश्लेषण या दोन्ही अंगांना स्पर्श करणं अत्यावश्यक ठरतं.  स्वतंत्र भारताची विभिन्न क्षेत्रात झालेली प्रगती आणि उभारणी लक्षात घेण्यासाठी शेती, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान या प्रमुख क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीवेळी प्रत्येक क्षेत्रातील स्थिती, समस्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या-त्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शासनाद्वारे योजलेले उपाय यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने भारतीय नियोजन; त्याद्वारे शेती आणि उद्योगाच्या विकासासाठी स्वीकारण्यात आलेली धोरणं; त्याबाबतचे कायदे; शिक्षण आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकास साधण्यासाठी स्वीकारलेलं धोरण, स्थापन केलेल्या संस्था (एनसीईआरटी, विद्यापीठ अनुदान आयोग, आय.आय.टी., इस्रो, अणुऊर्जा आयोग इत्यादी) यांचा अभ्यास अपेक्षित आहे. हा घटक समकालीन जीवन आणि त्यातील विविध प्रश्नांशी निगडित असल्यामुळे चालू घडामोडींचं संकलन अत्यावश्यक ठरतं. त्यासाठी वर्तमानपत्रं, नियतकालिकंआणि वार्षिक सारख्या संदर्भसाहित्याचा नियमित वापर उपयुक्त ठरतो.

आंतरराष्ट्रीय राजकरण आणि भारत या घटकात भारताचं परराष्ट्र धोरण, अलिप्तराष्ट्र धोरण, धोरण निश्चिततेतील महत्त्वाचे टप्पे, यासाठी झालेल्या महत्त्वाच्या बैठका वा परिषदा, त्यांची ठिकाणं, परिषदातील महत्त्वाचे निर्णय विचारात घ्यावेत. भारताचे पाकिस्तान, चीन, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार, अफगाणिस्तान या शेजारी राष्ट्रांशी असणारे संबंध महत्त्वपूर्ण ठरतात. भारताच्या इतर देशांशी असणार्या संबंधांचा अभ्यास करताना दोन्ही राष्ट्रातील संबंधांची पार्श्वभूमी, वादाचे मुद्दे, सहकार्याचे झालेले प्रयत्न, अलीकडील महत्त्वाची घडामोड आणि प्रलंबित असलेली एखादी वादाची बाब इत्यादी आयामांवर लक्ष केंद्रित करावं. त्यासाठी दोन्ही देशात झालेल्या महत्त्वाच्या बैठका, त्यात सहभागी झालेल्या व्यक्ती, त्यातील निर्णय, करार या बाबींच्या सविस्तर नोंदी ठेवाव्यात.

महाराष्ट्रातील समाजसुधारक, त्यांचे विचार आणि कार्य या घटकांतर्गत १६ महत्त्वाच्या समाजसुधारकांच्या कार्याचा आढावा घ्यायचा आहे. या घटकातील आठ समाजसुधारकांचा अभ्यास पूर्वपरीक्षेसाठी करावा लागतोच. नव्या अभ्यासक्रमात काही समाजसुधारकांचा नव्यानेच समावेश केला आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे, वि. दा. सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील या समाजसुधारकांचा सखोल अभ्यास अत्यावश्यक आहे. आयोगाने अभ्यासक्रमामध्ये या समाजसुधारकांचे विचार आणि कार्य हे सूत्र दिलं आहे. पूर्वपरीक्षेप्रमाणेच आता मुख्यपरीक्षेतही समाजसुधारकांचे जन्म, मृत्यू-दिनांक, वर्षं; त्यांच्यावर प्रभाव टाकणार्या व्यक्ती, विचार; त्यांनी सुरू केलेल्या विविध संस्था, त्यांची वर्षं; हाती घेतलेल्या समाजसुधारणा, आपल्या विचाराचा प्रसार करण्यासाठी सुरू केलेली नियतकालिकं, वृत्तपत्रं; समाजसुधारकांबाबत विविध व्यक्तींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया; त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग इत्यादी बाबींची तपशिलवार माहिती संकलित करावी. एकूण कार्याचा विचार करताना या समाजसुधारकांनी मांडलेले विचार विश्लेषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत याचं भान ठेवावं. त्यांच्या कार्यातील माहितीप्रधान भाग आणि त्यातून पुढे आलेला विचारप्रवाह या दोन्हींचा संयोग करूनच अभ्यास करावा.

स्वातंत्र्यानंतरचा भारत या घटकावर बरीच संदर्भसाधनं उपलब्ध आहेत. मात्र त्यातील बिपनचंद्र यांनी लिहिलेल्या ‘इंडिया सिन्स् इंडिपेंडंस’ या ग्रंथाचा प्रामुख्याने आधार घ्यावा. रामचंद्र गुहा यांचा ‘गांधी नंतरचा भारत’ हा ग्रंथही उपयुक्त आहे. यातील अभ्यासक्रमाशी निगडित प्रकरणांचा बारकाईने अभ्यास करावा.

महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांचं कार्य यासाठी ‘भिडे-पाटील’ यांच्या ‘महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास’ या ग्रंथाचा काही प्रमाणात उपयोग होईल. त्याचप्रमाणे विविध प्रकाशन संस्थांनी काही समाजसुधारकांची प्रकाशित केलेली चरित्रं देखील पहावीत. ‘महाराष्ट्र वार्षिकी’तील महाराष्ट्राचे शिल्पकार या विभागात दिलेल्या समाजसुधारकांचा बारकाईने अभ्यास करावा. अर्थात अशा विविध संदर्भ साहित्याचं वाचन करताना परीक्षाभिमुखता आणि वेळेचं भान असणं महत्त्वपूर्ण ठरतं.

लेखक ‘द युनिक अॅकॅडमी’, पुणे इथे प्राध्यापक आहेत.

[/restrict]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *