मुंबईतील वेगवेगळ्या विभागात २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार अस्थमा अथवा ‘दमा’ या आजाराचं प्रमाण तीन ते पाच टक्के एवढं असल्याचं आढळलं. त्याचबरोबर ‘गोराई’ डम्पिंग ग्राऊंड परिसरातील अॅलर्जिक सर्दी आणि दम्याचं प्रमाण २००३ साली मिळालेल्या आकडेवारीपेक्षा सरासरीने कितीतरी कमी झालं आहे. याला कारण डॉक्टरांनी दिलेली औषधं नसून बृहन्मुंबई महानगरपालिकेने डम्पिंग ग्राऊंडचं केलेलं Scientific Closure हे आहे.

तिथल्या लोकांची फुप्फुसक्षमता चाचणी केली असता ती निश्चितपणे वाढल्याचं दिसून आलं आहे. परंतु अजूनही काही प्रमाणात त्रास जाणवतोय आणि याचं कारण म्हणजे अजूनही काही वेळा इथे कचरा वाहून आणला जातो. पण जर तेही थांबवता आलं तर लोकांच्या आरोग्यासंदर्भातील तक्रारी कमी व्हायला निश्चितच मदत होईल.

[restrict userlevel=”subscriber”]

‘अस्थमा’ सारख्या आजारामुळे काही वेळा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची वेळ येते. कामावर जाता येत नाही. काही वेळा कामाच्या ठिकाणी असलेल्या धूर, धुळीमुळे त्रास जाणवू शकतो. तसंच कचर्याचे ढीग साठले असता आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये अॅलर्जिक सर्दी आणि अस्थमाचं प्रमाण पाच ते सहा पटीने वाढलेलं दिसून आलंय. तरंगत्या धुलिकणातून बुरशीचे कणही अॅलर्जी आणि श्वसनदाह निर्माण करतात. याला Bronchitis pulmonary aspergillosis असं म्हणतात. अस्थमा सोबत चिकट स्त्राव श्वसनमार्गाला भरून टाकतो आणि नेहमीची उपाययोजना पुरेशी पडत नाही. या कारणाने आजाराची तीव्रता वाढते. आजारामागच्या खर्चाचाच विचार करायचा झाल्यास केवळ औषधांवरचा खर्चच नव्हे तर हॉस्पिटलला जाण्यायेण्याचा खर्च, कामाचे चुकवलेले तास आणि त्यामुळे कापलं जाणारं वेतन, पेशंटबरोबर आणखी एका नातेवाईकाला बरोबर रहायला लागल्याने गेलेला वेळ इत्यादी गोष्टींचाही विचार करावा लागेल. यासंदर्भात अमेरिकेतील पाहणीनुसार तिथल्या शहरातही दम्यामुळे १२ million missed किंवा फुकट गेलेल्या कामाच्या दिवसांबरोबरच औषधोपचार आणि इतर खर्च मिळून ३२ अब्ज डॉलर्स इतका खर्च झाला असल्याचे निष्कर्ष निघाले. यातील काही टक्के त्रास पर्यावरण सुधारण्याकरता केलेल्या उपायांनी निश्चितच टाळता आला असता आणि जवळजवळ पाच अब्ज डॉलर्स निश्चित वाचले असते आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अनमोल असे जीवही जगले असते.

या सार्याचा परामर्श घेण्याचं कारण म्हणजे बदलत्या वातावरणामुळे आणि पर्यावरण र्हासामुळे झालेल्या आजारांना आळा घालण्याकरता Public Health Interventionला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रुग्ण शिक्षणाने स्वतःच्या आजारावर काबू मिळवण्यासाठीची उपचार पद्धती समजली असता अर्ध्या अधिक वेळेला त्रास बळावण्याचा धोका टाळता येतो.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत अस्थमासारख्या आजारांचा समावेश होणं गरजेचं आहे. कारण लोकशिक्षण आणि गावागावातही दम्यावरील अद्ययावत उपाययोजना राबवणं गरजेचं आहे.

परिचारिकादेखील प्रशिक्षण घेऊन २५ ते ४० टक्के रुग्णांची हॉस्पिटलची खेप टाळू शकतात आणि उपाय वेळच्या वेळी मिळाल्याने आजार कंट्रोलमध्ये राहू शकतो. मुंबई शहरात तर हा उपक्रम निश्चित लाभदायक ठरेल प्रकृतीमान सुधारण्याकरता!

( लेखिका केईएम रुग्णालयाच्या चेस्ट मेडिसिन विभाग आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या प्रमुख आहेत.) दूरध्वनी ०२२— २४१३२२९६

[/restrict]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *