भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेली शेवटची मालिका ही अगदीच एकतर्फी झाली होती. ऑस्ट्रेलियन भूमीवर झालेल्या त्या मालिकेविषयी भारतीय म्हणून आपण जितकं कमी बोलू तितकं बरं. पण आता ऑस्ट्रेलियाचा संघ पाहुणा म्हणून आपल्याकडे आला आहे आणि मागच्या वेळेच्या पराभवाचा वचपा काढण्याचा भारतीय संघाचा मानस असेल तर त्यात नवल काहीच नाही.

२२ फेब्रुवारीला पहिला कसोटी सामना सुरू झालाय. पण ऑस्ट्रेलियामध्ये ज्या संघाला ४-० अशी धूळ चारली होती त्यापेक्षा आता मैदानात उतरणारा भारतीय संघ बराच वेगळा आहे. फलंदाजीविषयी बोलायचं तर, गंभीरला डच्चू दिला गेलाय. द्रविड आणि लक्ष्मण निवृत्त झाले आहेत. आणि गोलंदाजांमध्ये झहीर खान आणि उमेश यादव मैदानात दिसणार नाहीयेत. एका परीने भारतीय संघाच्या दृष्टीने पाहिलं तर ही गोष्ट आपल्या पथ्यावरच पडणार आहे. कारण संघातल्या ६ ते ७ खेळाडूंवर ‘बदला’ घेण्याचं दडपण असणार नाही. त्याऐवजी हे खेळाडू आपली कामगिरी जास्तीत जास्त चांगली कशी होईल यावर लक्ष केंद्रित करतील.

[restrict userlevel=”subscriber”]

मात्र, फासे पलटवण्यासाठी मैदानावर उतरायला एक माणूस आतुर झालेला असणार तो म्हणजे सचिन तेंडुलकर. गेला काही काळ या लिटल मास्टरचा फॉर्म गेलेला आहे. २३ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीमध्ये अनेकदा त्याने आपल्या टीकाकारांची तोंडं गप्प केलेली आहेत. पण स्वतःला नव्याने सिद्ध करण्यासाठी ही मालिका म्हणजे त्याची शेवटची संधी असू शकते. इथेही तो अपयशी ठरला तर या महान फलंदाजाची ही अखेरची कसोटी मालिका गणली जाण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना साथ देतील यात शंकाच नाही, पण तरीही २० विकेट्स घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची मदार आपल्या जलदगती गोलंदाजांवरच राहील. त्यांच्याकडे सध्या असलेली जलदगती गोलंदाजांची फळी लक्ष वेधून घेणारी आहे. इंग्लंडबरोबर नुकत्याच झालेल्या मालिकेमध्ये जेम्स अँडरसनने ज्या प्रकारे गोलंदाजी केली ते पाहून ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. फिरकीच्या बाबतीत मात्र ऑस्ट्रेलियाला काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. नेथन लिऑन हा त्यांचा पहिल्या क्रमांकाचा फिरकी गोलंदाज. त्याची गोलंदाजी अचूक असली तरी तो काही इंग्लंडचा ग्रॅम स्वॉन किंवा पाकिस्तानचा सईद अजमल यांच्याएवढा मोठा नक्कीच नाही. त्यातून भारतीय फलंदाज फिरकीसमोर करत असलेला पायाचा सहज सुंदर वापर पाहता लिऑनपासून आपल्या खेळाडूंना धोका आहे असं वाटत नाही.

भारतीय फिरकीच्या बाबतीत बोलायचं तर हरभजन सिंगने संघात पुनरागमन केलंय आणि आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा आहेतच. हरभजनची निवड त्याच्या अलीकडच्या कामगिरीमुळे झालीये की आपण ऑस्ट्रेलियाबरोबर खेळणार आहोत म्हणून झालीये याविषयी माझ्या मनात शंका आहे. आपल्या कारकिर्दीमधला सर्वोत्तम खेळ त्याने आपल्या भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलाय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंएवढंच स्लेजिंग करण्यात तो माहीर आहे.

मंकीगेट आठवतंय?

भारतीय फिरकी गोलंदाजांकडून चांगली कामगिरी होईल असा विश्वास संघाला असेल. किंबहुना, भारतीय संघाचं व्यवस्थापन फिरकीवर अवलंबून राहील कारण सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघातल्या फलंदाजांची फिरकीसमोर भंबेरी उडताना दिसतेय.

रिकी पाँटिंग आणि माईक हसी निवृत्त झाल्यानंतर मायकेल क्लार्क हा ऑस्ट्रेलियाचा कप्तानच त्यांचा सर्वोत्तम फलंदाज आहे. मात्र त्याच्याबरोबरच शेन वॉटसन हा असा एक खेळाडू आहे ज्याला लवकर बाद करण्यासाठी भारतीय संघ खास योजना आखत असेल. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या क्रमवारीविषयीही बरीच चर्चा सुरू आहे. क्लार्कला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायची नाहीये, पण तो ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता त्याने ४ नंबरपेक्षा जास्त खाली फलंदाजी करता कामा नये. भराभर विकेट्स गेल्यानंतर खालच्या क्रमांकावर फलंदाजी करून बाजू सावरण्यापेक्षा लवकर फलंदाजीला येऊन बाजू भक्कम करणं केव्हाही अधिक चांगलं.

भारतीय फलंदाजी मात्र आता स्थिरावल्यासारखी दिसतेय. अपवाद फक्त एका प्रश्नाचा – सेहवागबरोबर सलामीला कोण येणार? आपल्यासमोर पर्याय आहे तो मुरली विजय, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांचा. ज्या क्रमवारीने या खेळाडूंची निवड केली गेली आहे ते पाहता रहाणेला इतर दोघांच्या आधी संधी मिळणं न्याय्य ठरेल. पाणी देण्यासाठी मैदानात जाणं त्याने बराच काळ केलंय आणि आता त्याला कसोटीमधली त्याची पहिली कॅप देण्याची वेळ आलीये. चेतेश्वर पुजारा, तेंडुलकर, कोहली, धोणी आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांच्यामुळे मधली फळी कागदावर पक्की दिसतेय खरी, पण यातला पुजारा वगळता बाकीच्यांनी गेल्या काही काळात सातत्य दाखवलेलं नाही.

दोन्ही बाजू कसा संघ निवडतात ते मोठ्या प्रमाणात खेळपट्टी कशी आहे त्यावर ठरेल. फिरणार्या खेळपट्ट्या असतील असं सांगण्याचीही गरज नाही. इंग्लंडविरुद्ध खेळताना ही युक्ती आपल्यावरच उलटली होती हे खरं, पण तरीही या वेळीसुद्धा तशाच विकेट्स असतील. कारण सरळ आहे. ऑस्ट्रेलियाकडे माँटी पानेसार किंवा ग्रॅम स्वॉनएवढे चांगले फिरकी गोलंदाजच नाहीत त्यामुळे इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी जसा आपल्या खेळपट्ट्यांचा उपयोग करून घेतला तसा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांना जमणार नाही. शिवाय आपण जर जलद विकेट बनवली तर ऑस्ट्रेलियाच्या ताकदीलाच आपण खतपाणी घालू. तेव्हा तसं होण्याची अजिबात शक्यता नाही.

भारतामध्ये ऑस्ट्रेलियाचा आधीचा रेकॉर्ड पाहिला तर तो काही फार चांगला नाही. अर्थात, क्लार्कसाठी भारतातल्या आठवणी रम्य आहेत कारण त्याने आपलं कसोटी पदार्पण करताना अप्रतिम अशी १५१ धावांची खेळी केली होती. पण यावेळी धावा करण्याची सर्वाधिक जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे आधीसारखा मोकळा खेळ तो करू शकेलच असं सांगता येत नाही. तेव्हा तो एक उत्साहाने ओथंबणारा तरुण खेळाडू होता, संघात मोठमोठे अनेक स्टार्स होते. आज तो आपल्या संघातला सगळ्यात मोठा स्टार आहे. जबाबदारीमुळे भले भले खेळाडू वाकून जातात. पण क्लार्कच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही. त्यामुळे आपला उत्तम फॉर्म कायम राखण्यावर त्याचा भर असेल.

मानसिक दबावाचा खेळ केव्हाच सुरू झालाय. गंभीर नसल्यामुळे आमचे गोलंदाज खूश आहेत असं म्हणून क्लार्कने गंभीरला वगळण्याची चूक भारतीय निवड समितीने केल्याचं सुचवलंय. भारताकडूनही काही वक्तव्यं होऊ लागलीयेत. पण शेवटी महत्त्वाचं आहे ते त्या २२ यार्डावर जे घडणार आहे तेच.

गेल्या अनेक वर्षांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान काही उत्कंठावर्धक आणि अविस्मरणीय सामने झालेले आहेत. पण ज्या खेळाडूंनी हे सामने गाजवले त्यातले बहुतेक जण आज कॉमेंट्री बॉक्समध्ये विराजमान झाले आहेत. त्यांचा वारसा आता आपले तरुण खेळाडू कसा पुढे नेतात हे बघायचंय.

– पार्थ मीना निखिल

[/restrict]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *