जाहिरातींच्या संकलनात कुठच्या गोष्टी महत्त्वाच्या असतात?

जाहिरातींचा कालावधी काही सेकंदांचा असतो. त्यामुळे प्रत्येक सेकंदाचा कसा वापर करावा, कुठलं दृश्य कुठे आणि कसं कापावं, ध्वनीचा आणि संगीताचा कसा नेमका वापर करावा यांसारख्या तांत्रिक बाबी तर महत्त्वाच्या असतातच, परंतु ती जाहिरात ग्राहकाला काय सांगतेय याकडेही लक्ष ठेवावं लागतं. विक्स व्हेपोरबच्या एका जाहिरातीत वंदना गुप्तेंच्या एका हावभावाचे ८९ टेक्स चित्रीत केले गेले होते. कलाकारांचे अविर्भाव वेगवेगळे असले तरी कोणता अविर्भाव उत्पादनाच्या दृष्टीने योग्य आहे याची निवड संकलकाला करावी लागते. हिरो होंडाच्या एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान घसरलेली बाईक तिच्या चालकाने मोठ्या शिताफीने सांभाळली होती. शॉट पाहताना मी त्याच्या कौशल्याला दाद दिली. ती माझी पसंती समजून दिग्दर्शकाने शेवटच्या एडिटमध्ये तो शॉट तसाच ठेवला. पण मी तो बदलायला लावला. मी त्याला म्हणालो, ‘मी दाद दिली त्याच्या बाईक सांभाळण्याला, पण बाईकचं घसरणं जाहिरातीत दाखवणं हे केव्हाही चुकीचंच आहे.’ दृश्यातील करामतींपेक्षा जाहिरातीचा संदेश अधिक महत्त्वाचा.

[restrict userlevel=”subscriber”]

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे संकलन क्षेत्रात काय बदल घडले आहेत आणि ते योग्य आहेत का?

कॉम्प्युटरच्या साहाय्याने आज संकलन निश्चितच वेगवान होत आहे. पण संकलन म्हणजे दृश्यांची नुसती जुळवाजुळव नाही. संकलकाचं कार्य जाहिरातीतील गोष्ट उलगडून दाखवण्याचं असतं. ते काही बदललं आहे असं मला वाटत नाही. व्हिडीओ इफेक्ट्स नवीन होते त्या काळात प्रल्हाद कक्करने Maggi च्या एका जाहिरातीच्या शेवटच्या दृश्यात एक हात Maggi ची बाटली जमिनीवर ठेवतो आणि अख्खी जमीन हादरते असा इफेक्ट वापरला होता. पण  Maggi केचअप ‘different’ आहे, असं जाहिरातदार म्हणतो आहे. “Heavy” किंवा “Strong”आहे असं म्हणत नाही! मी तो इफेक्ट जबरदस्तीने काढायला लावला. तंत्रज्ञान अनेक गोष्टी शक्य करतं, पण त्या कुठे कशा वापरायच्या, याचं भान ठेवायलाच हवं. आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे ‘कॉम्प्युटर हाताळता आला म्हणजे मी संकलक झालो’ असा अनेकांचा गैरसमज होतो आहे. आज जागोजागी संकलन घडू शकतं, त्यामुळेच आज अनेकांच्या लेखी या कामाला पूर्वीसारखी किंमत राहिलेली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे.

photo_3हल्लीच्या जाहिरातींपैकी तुमची आवडती जाहिरात कुठली?

खरं सांगायचं तर गेल्या अनेक वर्षांत एकही जाहिरात मला आवडलेली नाही. तांत्रिक करामतींचा अकारण वापर झालेला दिसतो. शिवाय आजकालच्या जाहिराती कुठे संपतात आणि कुठे सुरू होतात तेच कळत नाही. प्रत्येक जाहिरातीच्या शेवटी एक क्षण रिकामा सोडायचा असतो. आपण ग्राहकाला जे सांगितलं ते त्याच्या मनात बिंबवण्यासाठी त्या क्षणाची गरज असते. आजकाल अशा गोष्टींचं तारतम्य बाळगलं जात नाही. सगळ्या जाहिराती कल्पना, कथानक, अभिनय यांचा जराही विचार न करता संकलित केल्यासारख्या वाटतात.

जाहिरातींशिवाय आपण इतर कुठल्या माध्यमांमध्ये काम केलं आहे?

‘क्षितीज’, ‘दोराहा’, ‘फरेब’, ‘सपने सुहाने’ यांसारखे काही हिंदी चित्रपट, अनेक गुजराती चित्रपट तसंच व्हिक्टर बॅनर्जी यांचा An August Requiem हा इंग्रजी चित्रपट मी संकलित केला. झी टीव्हीची सुरुवात ज्या दोन तासांच्या उद्घाटन समारंभाच्या प्रोग्रामने झाली त्याचं संकलन मी केलं होतं. याशिवाय ‘महायज्ञ’, ‘अभयचरण’, ‘किंतु-परंतु’ सारख्या मालिका देखील मी संकलित केल्या. १९८३ सालापासून मी प्रामुख्याने जाहिरातींच्या संकलनावर लक्ष केंद्रित केलं.

तुमच्या दीर्घ कारकिर्दीत कुणाकुणाबरोबर काम करण्याचा योग आला?

मी प्रल्हाद कक्कर या प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शकाबरोबर सुमारे १५ ते २० वर्षं काम केलं. त्याशिवाय श्याम बेनेगल, विकास देसाई, नोमिता-शुबीर, राकेश मेहरा, विक्रम ओबेरॉय, जगदीश बॅनर्जी, ओमी अरोरा, मृत्युंजय सरकार, प्रसिद्ध लघुपटकार चिदानंद दासगुप्ता, नंदू घाणेकर, गिरीश घाणेकर, रमेश कलवानी यांसारख्या दिग्गजांसाठी मी संकलन करू शकलो.

या क्षेत्रात येऊ पाहणार्या तसंच सध्या काम करत असलेल्या युवा पिढीला तुम्ही काय सांगाल?

जाहिरात संकलनाचं हे काम अतिशय कष्टाचं पण कौशल्याचं आणि बुद्धीला आव्हान देणारं आहे. या क्षेत्रात पुढे जायचं असेल तर प्रयोगशीलता आणि बारीक निरीक्षण हवं. तरुण संकलकांनी सतत काहीतरी नवीन करत राहावं. परंतु तंत्रज्ञानाला अवास्तव महत्त्व देऊ नये एवढंच मी सांगेन.

[/restrict]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *