निसर्गाच्या सान्निध्यात मनाला शांती मिळावी यासाठी आपण पर्यटनाला जातो. पण काहीजणांना मात्र पर्यटनाबरोबरच साहसाची हौसही पूर्ण करायची असते. निसर्ग सहवास आणि साहसी पर्यटन याचं परफेक्ट पॅकेज म्हणजे न्यूझीलंडमधलं फिऑर्डलॅन्ड नॅशनल पार्क… बर्फाच्छादीत गिरीशिखरं, मोठमोठे तलाव, दर्या आणि याबरोबरच निळ्याशार समुद्राचा सहवास अशा नानाविध गोष्टींनी सजलेलं फिऑर्डलॅन्ड नॅशनल पार्क म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच.

न्यूझीलंडच्या नैऋत्य भागात १९५२ साली हे नॅशनल पार्क वसवण्यात आलं. या परिसरात अनेक ठिकाणी समुद्राचं पाणी चिंचोळ्या घळ्यांमध्ये शिरलेलं दिसतं, यालाच फिऑर्ड असं म्हणतात आणि त्यामुळेच याला ‘फिऑर्डलॅन्ड नॅशनल पार्क’ असं नाव पडलं. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ‘ते वाहिपोउनामू’ याचाच हे नॅशनल पार्क एक भाग आहे. १,२६०,७४० हेक्टर्स एवढ्या मोठ्या परिसरात हे पार्क वसलं आहे. या परिसरात अनेक उंच डोंगर असून या डोंगरांवरून परिसराचं अतिशय विहंगम दृश्य दिसतं. बर्फाच्छादीत दर्या आणि जंगलातून वाहणार्या नद्या पर्यटकांना आकर्षित करतात. इथल्या तलावांवरही बर्फाची चादर पसरल्याचा भास होतो. इथल्या साउण्ड मायफिऑर्ड घळीतला ‘मायट्रे पीक’ हा १६९२ मीटर्स उंच पॉईंट आहे. इथूनही हा नयनरम्य परिसर न्याहाळता येतो.

[restrict userlevel=”subscriber”]

केवळ निसर्ग सौंदर्यासाठीच हे पार्क प्रसिद्ध नसून साहसी पर्यटन हे देखील पर्यटकांना आकर्षित करतं. यामध्ये कॅम्पिंग, वॉकिंग, ट्रॅम्पिंग, बोटिंग, क्लायम्बिंग, फिशिंग, कायाकिंग असे अनेक साहसी प्रकार या पार्कमध्ये अनुभवायला मिळतात. जंगलातून चालण्याचा आनंद ज्यांना घ्यायचा असेल त्यांच्यासाठी तर इथे खास तीन मार्ग बनवण्यात आले आहेत. ग्रेट वॉक्स म्हणून प्रसिद्ध असणार्या या मार्गांमध्ये केपलर ट्रॅक, मिलफोर्ड ट्रॅक आणि रूटबम ट्रॅक असे ट्रॅक पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेत २-४ दिवस या वॉकमध्ये पर्यटकांना घालवता येतात. तसंच फिशिंग आणि बोटिंगसाठीही विशेष सोय करण्यात आली आहे.

जैवविविधतेने नटलेल्या फिऑर्डलॅन्ड नॅशनल पार्कमध्ये केवळ याच परिसरात आढळणार्या काकापो या आगळ्यावेगळ्या पोपटाचं दर्शन घडतं. तसंच खास करून न्यूझीलंडमध्ये आढळणारा कीवीदेखील इथे आढळतो. हरिणं, ससे, उंदीर असे प्राणीही आहेतच. याबरोबरच सागरी जीवनाचं सौंदर्यही अनुभवता येतं. किनार्याजवळ उथळ पाणी असल्यामुळे ब्लॅक कोरल्स बरोबरच सिल, डॉल्फिन असे मासेही सागरात विहार करताना दिसतात. त्याचप्रमाणे वनस्पतींच्या विविध जातीही इथे आढळतात. एकूणच निसर्गाचं वरदान लाभलेलं फिऑर्डलॅन्ड नॅशनल पार्क हे पर्यटकांसाठी एक परिपूर्ण पॅकेजच आहे.

[/restrict]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *