सृष्टीचा आधारस्तंभ म्हणा किंवा मुलारंभी स्त्रोत म्हणा, सृष्टीच्या जडणघडणीत पाणी हे निर्णायक भूमिका बजावत असतं. मग ती सृष्टी वैश्विक असू देत किंवा ऐहिक असू देत. असं म्हणतात की, सृष्टीचा शोध घ्यायचा असेल तर मनुष्याने स्वतःच्या शरीराकडे बघावं. पण त्याचवेळी असंही म्हटलं जातं की, माणसाला स्वतःच्या शरीराचं विज्ञान समजून घ्यायचं असेल तर त्याने सृष्टी अर्थात निसर्गाचा आधार घ्यावा. म्हणजेच पृथ्वीवर जे प्रमाण झाडांचं आहे तेच शरीरावर केसांचं. शरीरातल्या नसा, शिरा यांची तुलना भूमीवरील नदीनाले यांच्याशी केली जाते. निसर्ग नियमांविरोधात गेलं की निसर्गावरील गंभीर परिणाम पण दिसून येतात. थोडक्यात काय तर या सृष्टीचा आणि त्यावरील जीवमात्रांचा सारा पसारा हा एकमेकांत गुंतलेला आहे.

मानवी शरीराचा चौथा भाग पाण्याने व्यापलेला आहे. माणसाच्या शरीरात ६० टक्के रक्त, रक्तात ८० टक्के आणि मेंदूत ७० टक्के पाणी असतं. शरीरातलं पाणी कमी झालं की शरीर कोरडं पडतं. पांढर पडतं, मग बाहेरून सलाईन लावा, इंजेक्शन द्या असले प्रकार करावे लागतात. निसर्गाच्या बाबतीत काय? भूमीवरील पाणीपातळी कमी झाली तर काय? शरीराला पुन्हा बळकटी देण्यासाठी, रोगमुक्त करण्यासाठी पथ्य पाळावी लागतात. तशीच गरज आहे (वेळ तर कधीच आली आहे) निसर्गाला वाचवण्याची, कमी होत जाणारी पाणीपातळी पुन्हा भरून आणण्याची. पाणी हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं ही समजूत काहीशी चुकीची आहे. पूर्वापार पाणी आहे तेवढंच आहे आणि तेवढंच राहणार आहे. सततच्या वाढणार्या लोकसंख्येमुळे वाटेकरी वाढलेत आणि त्यातही उद्योगधंदे आणि जास्त उत्पन्न देतात म्हणून जास्त पाणी लागणारी शेती उत्पादनं काढणार्या उत्पादकांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पाण्याचं संकट हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. समुद्राचं पाणी विचारात घेतल्यास पाणी भरपूर दिसतं पण उपलब्ध पाण्यापैकी फक्त अडीच टक्के पाणी गोड्या पाण्यात मोडतं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यातही या पाण्याच्या एक टक्क्यापेक्षा कमी पाण्यापर्यंत आपण पोहचू शकलो आहोत.

साधारणतः पावसाचं पडणारं पाणी हाच आपल्याला पाणी मिळायचा मार्ग आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे पावसाचे दिवस कमी होत चाललेत. पूर्वी १२ महिन्यांतून ४ महिने सतत पाऊस पडायचा. आता तो २७ ते ५० दिवस किंवा ७० ते १०० तास एवढाच पडतो. (आणि हा १०० तास पडणारा पाऊस ९५०० तास पुरवावा लागतो.) यातला कालावधी नीट समजावून घेतला तर आपल्या लक्षात येईल की समजा पूर्वी रोज १० मिमी पाणी पावसापासून एका दिवसात मिळायचं.

ज्यामुळे पाण्याचा प्रवाह संथ असायचा वा पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरायचं. तिथेच आज पावसाचे दिवस कमी झाल्याने तीन दिवस पाऊस नसतो आणि चौथ्या दिवशी ४० मिमी पाऊस पडतो.

ज्याचा वेग प्रचंड असल्याने जास्तीत जास्त पाणी हे वाहून समुद्राला किंवा तत्सम जलप्रवाहांना जाऊन मिळतं. जमिनीत न मुरता आणि परिणामी भूजलाची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. नद्या कोरड्या पडत चालल्या आहेत. या अगोदर ही भूजल पातळी नदीच्या जल पातळीपेक्षा वर असायची. त्याचमुळे या भूजलाचा संथ पाझर सतत नद्यांना मिळायचा आणि नद्या बारमाही असायच्या. ही भूजल पातळी घसरल्यानेच पावसाळा संपतानाच नद्या कोरड्या पडायला सुरुवात होते. नद्याच प्रवाही नसल्याने देशभरात सतत कुठे न कुठे टंचाई, दुष्काळ ही परिस्थिती निर्माण होते आहे. भारतातील ७० टक्के भागात मध्यम स्वरूपाचा म्हणजे ५०० ते १५०० मिमी पाऊस पडतो. आपल्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस सरासरी ७०० मिमी असेल तर प्रत्येक एकरात २० लाख लिटर पाणी पडते. पाच एकर शेती क्षेत्रात १ कोटी ४० लाख लिटर पाणी पावसामार्फत मिळत असतं. एवढं असूनही आपण कोरडवाहू शेतकरी हे बिरूद लावून घेत असतो. धुळे, सांगली, कोल्हापूर यातील काही भागात ४०० मिमी पेक्षाही कमी पाऊस पडतो. तिथेही शेतीची दैना आहे. कोकणात ३००० मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडतो, तिथेही पाण्याचं दुर्भिक्ष? विदर्भात जवळपास सर्वच जिल्हे हे शाश्वत पावसाच्या प्रदेशात मोडतात. याही परिसरात १००० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणजे एकरी ४० लाख लिटर. पण इथेही शेतकर्यांना आत्महत्या करावी लागते. पाण्याचा व्यवस्थापनाचा, वापराचा हिशेब न ठेवल्याने भारतीय कृषी उत्पादन स्वयंपूर्ण बनलेलं (?) दिसत असलं, तरी या क्षेत्रात एक घन मीटर पाण्यात किती उत्पादन झालं पाहिजे, असलं पाहिजे. कारण आता हा हिशेब मांडणं गरजेचं बनलं आहे. आयुष्य जगताना आपण त्याचा हिशेब वेळेत मांडतो. कुठल्या वर्षी काय करायचं, कुठे पोचायचं, प्रतिष्ठेचा हिशेब पैशात, संपत्तीत आणि पत(गुडविल) मध्ये मांडतो. पण हे आयुष्य प्रवाही करणार्या पाण्याच्या वापराचा हिशेब मांडणं मात्र सोईस्कररित्या टाळतो.

आज भारताची लोकसंख्या १३५ कोटींच्या आसपास पोहचली आहे. २०३० पर्यंत हा आकडा २०० कोटीत जाईल. आजच पाण्यासाठी रक्ताने उत्तर देण्याची भाषा होऊ लागली आहे. २०३० पर्यंत या २०० कोटी माणसांची तहान भागवण्याकरता आपण काय उपाययोजना राबवणार आहोत. हजारो कोटींचा विकास आरखडा मांडणारे आणि त्याचं राजकारण करणारे कधी पाण्याच्या आराखड्याविषयी गांभीर्याने विचार करणार आहेत का? २०३० साली पुरवठा आणि मागणी यात ३० टक्क्यांपेक्षा जास्तची तफावत असणार आहे. पाण्याचा वापर येणार्या पिढीची जाण ठेवून जाणीवपूर्वक करायचा आहे. आपापल्या गावात गावाची गरज भागेल एवढा पाऊस पडतोच. गरज आहे ती त्याला अडवण्याची, जिरवण्याची आणि योग्य वापर करण्याची. काही तांत्रिक बाबी आणि पाणी बचतीऌच्या सोप्या पद्धती घेऊन पुढील अंकात आपण भेटणार आहोत. तोवर पाणी जपून वापरा.

– सहलेखक – योगेश चिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *