जाहिरात संकलन म्हणजे नक्की काय आणि ते॒ चित्रपट संकलनापेक्षा कसं वेगळं असतं?

– ३० सेकंदाच्या जाहिरातीचं चित्रीकरण काही तासांचं असतं. प्रत्येक प्रसंग, हावभाव, अनेकदा चित्रफितीवर टिपले जातात. त्या चित्रफितीचे नेमके हवे ते भाग एकत्र करणं जिकीरीचं असतं. चित्रपटाचं संकलन करताना दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेलं कथानक उलगडून दाखवायला काही तास मिळतात. परंतु॒जाहिरातीचं कथानक, त्यातील संदेश॒प्रत्येक सेकंदाचा अचूक॒वापर करून प्रेक्षकांसमोर सादर करावा लागतो. कधीकधी संवाद नसतात, मग केवळ चित्रणाच्या माध्यमातूनच जे काय सांगायचं ते साधावं लागतं. एका सेकंदात (फिल्म माध्यमात) २४ फ्रेम्स् असतात, प्रत्येक शॉटमधील किती फ्रेम्स कुठे कशा कापायच्या ते ठरवावं लागतं. चित्रपट निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि संगीत दिग्दर्शकांना हे माध्यम बुचकळ्यात पाडतं, ते या सेकंदांच्या बंधनामुळे.॒

संकलन क्षेत्रात, तेही जाहिरात संकलन क्षेत्रात, कसे आलात?

– माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड मधला. बालपण गरिबीत गेलं. मॅट्रिकपर्यंत शिकू शकलो. त्यानंतर नोकरी, व्यवसाय करावा यासाठी मुंबईला भावाकडे आलो. कर्मधर्मसंयोगाने एके दिवशी॒फिल्म डिव्हिजन मधील॒एक अधिकारी, बांदेकर आमच्या घरी आले होते. मला त्यांनी बॉम्बे फिल्म लॅबमध्ये बाबुराव वाघधरे (राजन वाघधरे यांचे वडील) यांना भेटायला सांगितलं. बाबुरावांनी मला फिल्मचे दोन तुकडे कसे चिकटवायचे इथपासून शिकवलं. नोकरी मात्र मी अननुभवी असल्याने॒नाकारली.॒पण नोकरी नाही तर अनुभव कसा येणार? पुढचे सहा महिने॒लॅबच्या व्हरांड्यात अक्षरशः बसून काढले. ओळखी होतील, काम मिळेल या आशेने. खिशात पैसे नव्हते. नातेवाईक फार फार तर महिन्याचा २ रुपयांचा रेल्वे पास काढून देत. लॅबमधल्या॒संकलकांचं पडेल ते काम कर, चहा-नाश्ता मागव असं करत राहिलो. पण अनेक स्नेही जमवले. एके दिवशी॒‘इमेज इंडिया’ या जाहिरात निर्मिती संस्थेला साहाय्यक संकलक हवे आहेत अशी बातमी लागली. पण॒त्यांचं ऑफिस होतं फोर्ट मार्केटला. बसचं तिकीट काढायला पैसे नव्हते. शेवटी महाडिक नावाच्या वरिष्ठ संकलकाने खिशातून॒एक रुपया काढून दिला. आजही ती मोलाची॒मदत मी विसरू शकत नाही. ‘इमेज इंडिया’मध्ये दरमहा १०० रुपयांची नोकरी मिळाली. जाहिराती संकलित करायची कला तिथल्या कामाच्या अनुभवातून, निरीक्षणातून हळूहळू आत्मसात करून घेतली.

आतापर्यंत प्रामुख्याने॒तुम्ही कोणत्या उत्पादनाच्या जाहिराती॒केल्या आहेत?

– आपल्या घरामध्ये आणि रोजच्या वापरामध्ये असलेली अशी कोणतीही वस्तू राहिलेली नाही ज्याची जाहिरात मी केली नसेल. शीतपेयं, डीटरजंट, सायकल, स्कूटर, गाड्या, केचअप, आईस्क्रीम, साबण, मिक्सर, पंखे, गोळ्या-चॉकलेट्स, मलमं, औषधं, तेल, स्वयंपाक-साधनं, सौंदर्यप्रसाधनं सर्वांच्या कुठल्या न कुठल्या ब्रँडची जाहिरात मी संकलित केली आहे. मॅगी न्यूडल्स आणि॒मॅगी॒केचअपच्या २००१ पर्यंतच्या सर्व जाहिराती प्रल्हाद कक्कर (प्रसिद्ध जाहिरात निर्माता-दिग्दर्शक) याने मला दिल्या. तसंच॒सर्फच्या अनेक जाहिराती मी संकलित केल्या आहेत.

आतापर्यंत॒कुठली॒जाहिरात तुम्हाला॒सर्वात जास्त आव्हानात्मक वाटली?

– प्रत्येक जाहिरात स्वतःचं असं वेगळं आव्हान घेऊन समोर येते. बुद्धीला चालना देते. डोलोप्स नावाच्या आईस्क्रीमची ४० सेकंदाची॒जाहिरात व्हाईट लाईट या निर्मिती संस्थेने केली होती. नोमिता-शुबीर या दिग्दर्शक जोडगोळीने अर्ध्या तासाच्या॒सुमारे २७ टेप भरून चित्रीकरण केलं होतं.॒आणि त्यानंतर १३ वेगवेगळ्या प्रकारे त्याचं संकलन केलं होतं. पण कोणतंच संकलन त्यांच्या पसंतीस येईना. शेवटी त्यांनी मला एका संध्याकाळी॒बोलावलं. दुसर्या दिवशी सकाळी फिल्म पुरी करून जाहिरातदाराला दाखवायची होती. मी त्या १३ फिल्म्स पहिल्या. कुठल्या प्रकारचे शॉट कुठे॒हवेत याचा अंदाज बांधला. पण साडे तेरा तासांचं चित्रीकरण पाहायला वेळ नव्हता. शेवटी त्यांनी केलेल्या संकलनाचा अंदाज घेत ‘अमुक प्रकारचा शॉट आहे का?’ ‘अमुक बाजूने आईस्क्रीम शूट केलं आहे का?’ असे प्रश्न विचारत गेलो. मी सांगितले तसे शॉट त्यांच्या तंत्रज्ञानाला सापडू लागले आणि॒फिल्म तयार झाली. दिग्दर्शकांना आवडली. जाहिरातदारालाही पसंत पडली. तरीही॒मी त्यांच्याकडे आणखी॒एक दिवस॒मागून घेतला. साडे तेरा तासांचं चित्रीकरण बारकाईने पाहिलं आणि अधिक चांगली जाहिरात तयार केली.॒

(क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *