आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या खासदारांनी संसद परिसरातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनं केलं. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी असून सरकाराने अतिरिक्त मदत करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. याच मुद्यावर शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला आहे. राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत पुरेशी नाही. शेतकऱ्यांना २५ हजार रूपये मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं.

 

लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार आहेत. आणि राज्यसभेत शिवसेनेचे ३ खासदार आहेत. भाजपविरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका मांडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आज संसदेत शिवसेनेचं दोन्ही सभागृहांमध्ये वेगळं अस्तित्व पाहायला मिळालं. भाजपच्या निर्णयानंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेनेच्या खासदारांची विरोधी बाकांवर व्यवस्था केली जाणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *