@दिवाकर शेजवळ 

divakarshejwal1@gmail.com 

राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार हे वयाच्या 80 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ‘इमानदार’ आयपीएस ही आपली ओळख पोलीस सेवेत अखेरपर्यंत जपलेले इनामदार हे सचोटीचे आणि कडव्या शिस्तीचे उच्चपदस्थ पोलीस अधिकारी होते.

मुंबईतील गँगवार मोडून काढणाऱ्या आणि ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट‘ म्हणून गाजलेल्या उमद्या तरुण पोलीस अधिकाऱयांची फौंज ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षित झालेली होती. मात्र त्यातील काही पोलीस अधिकारी नंतरच्या काळात ‘नासले’ याचे शल्य इनामदार यांना अखेरपर्यंत बोचत होते. निवृत्तीनंतर लेखक आणि व्याख्याते म्हणून दोन दशके ते कार्यरत होते. पोलीस दलात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर ते सतत आसूड ओढत राहिले. ‘पोलीस ठाण्यात जायला हल्ली भीती वाटते’ अशा शब्दात इनामदार यांनी सध्याची जनभावनाच जाहीररीत्या व्यक्त केली होती.

देशाची राजधानी भलेही दिल्ली असेल, पण आर्थिक राजधानी म्हणून जगभरात मुंबईलाच ओळखले जाते. त्यामुळे या महानगराचे पोलीस आयुक्तपद भूषवण्याची संधी आपणास मिळावी, अशी आयपीएस होणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱयांची प्रारंभीपासून इच्छा- महत्वाकांक्षा असते. अरविंद इनामदार हेसुद्धा त्याला अपवाद नव्हते. पण त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या त्या इच्छेचा तत्कालीन राज्यकर्त्यांनी साफ चुराडा करून टाकला होता. त्यावेळी सह पोलीस आयुक्त(गुन्हे) या पदावर असलेल्या इमानदार यांना पोलीस आयुक्त पदासाठी डावलून सरळ पोलीस महासंचालक पदावर बढती देण्यात आली होती. हा अवमान त्यांच्या जिव्हारी लागला होता. अखेर त्यांनी महासंचालक पदाचा कार्यकाल पूर्ण न करता राजीनामा भिरकावून पोलीस दलाला रामराम ठोकला होता. त्यानंतर सामान्य पोलीस कॉन्स्टेबलपासून अधिकाऱयांच्या समस्या आणि पोलीस दलात सुधारणा घडवून आणण्यासाठी ते झटत राहिले. पोलिसांच्या मागण्यांसाठी आग्रह धरत पाठपुरावा करत राहिले.

इनामदार यांच्यानंतर पोलीस आयुक्तपद कार्यकाल संपण्याआधी अकाली सोडावे लागण्याची अवमानकारक वेळ अनेक पोलीस आयुक्तांवर आणली गेली. राज्यकर्त्यांच्या अशा मनमानीमुळे उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱयांना क्षमता आणि कल्पकता असूनही मुंबईसारख्या शहरासाठी अभिनव योजना आखता,राबवता येत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी पोलीस आयुक्ताला ठराविक कार्यकाल निश्चित करण्यात यावा, अशी अरविंद इनामदार यांची आग्रही मागणी कायम होती.

मी ‘महानगर’ या सांज दैनिकात असल्यापासून अरविंद इनामदार, अमरजितसिंग सामरा, एम एन सिंग, राकेश मारिया, अरुप पटनायक, अशा अनेक आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध आणि सततचा संपर्क होता. त्यांच्यात पत्रकारांसाठीच नव्हे तर अन्यायाची दाद मागण्यांसाठी धाव घेणाऱ्या सामान्य माणसाला वेळ देण्याची आणि सर्वतोपरी मदत करण्याची भावना होती. त्यामुळेच ‘ आजच्या काळात पोलीस ठाण्यात न्यायासाठी जाणाऱ्या सामान्य माणसांवर पोलीस खेकसतात’ हे चित्र पाहून अरविंद इनामदार हे दुःखी व्हायचे.

मी 2003 गांधीजींवर ‘ वृत्तदर्शन’ चा एक विशेष अंक काढला होता. त्यात गांधी हत्त्येनंतर घराची जाळपोळ झालेल्या अरविंद इनामदार यांनी खास लेख लिहिला होता. त्यातून त्यांनी ‘ गांधीजी हे सच्चे हिंदू होते!’ असे आजच्या धार्मिक विद्वेषाच्या काळात ठणकावून सांगितले होते. तर, मी साप्ताहिक ‘चित्रलेखा’ मध्ये असताना वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर, एकूणच देशाच्या गल्ली बोळापासून सीमेवरच्या सुरक्षा व्यवस्थेवर तपशीलवार माहितीपर ‘कव्हर स्टोरी’ केली होती. माझ्या गाजलेल्या त्या स्टोरीसाठी अरविंद इनामदार आणि राकेश मारिया यांनी मला मोलाची मदत केली होती.

अरविंद इनामदार यांना
भावपूर्ण आदरांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *