भारताच्या आर्थिक मंदीसाठी नोटबंदी आणि नंतर घाईत लागू केलेला जीएसटी जबाबदार असल्याचं राजन यांनी सांगितलं. खरतर हे दोन निर्णय झाले नसते तर भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत राहिली असती. महत्त्वाचं म्हणजे, सरकारने कोणाच्याही सल्ल्याशिवाय नोटबंदी लागू केली. लोकांचं नोटबंदीमुळे नुकसान झालंच, यासोबत या निर्णयातून फारसं काही हातीही लागलं नाही.

भारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर संकटाकडे वाटचाल

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था वाढत्या वित्तीय तुटीमुळे अत्यंत चिंताजनक स्थितीकडे जात असल्याचा इशारा त्यांनी दिला. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन ब्राउन विद्यापीठातील ओपी जिंदाल व्याख्यानमालेमध्ये बोलत होते.

मागील अनेक वर्ष अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत होती

गेली अनेक वर्षे उत्तम कामगिरी करून भारतीय अर्थव्यवस्थेने लक्षणीय पातळी गाठली, असं राजन म्हणाले. यासह भारतीय अर्थव्यवस्थेच्या गंभीर संकटाचे कारण देखील त्यांनी सांगितलं. अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात असणारी अनिश्चितता हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या गंभीर संकटाचे कारण आहे. २०१६ च्या पहिल्या तिमाहीत विकास दर ९% होता, असं राजन यांनी सांगितलं.

विकासाच्या दृष्टीने नवीन स्रोत शोधण्यात अपयश

विकासाचे नवीन स्रोत शोधण्यात भारत अपयशी ठरला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढीचा दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ५ टक्क्यांवर पोहोचला असून दुसऱ्या तिमाहित तो ५.३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.

गुंतवणूक, खप आणि निर्यातीत वाढ होणे आवश्यक

 भारतासमोरील आर्थिक संकट एक लक्षण म्हणून पाहिलं गेलं पाहिजे मूळ कारण म्हणून नव्हे, असं राजन यांनी सांगितलं. विकास दरातील घसरणीसाठी त्यांनी गुंतवणूक, खप आणि निर्यातीतील सुस्ती तसेच एनबीएफसी क्षेत्रातील संकटाला जबाबदार धरलं.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *