पीएमसी बँकेवर आरबीआय (RBI) नी निर्बंध लावले. आता राजकीयदृष्ट्या ही बँक कोणी बुडवली यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यात मला पडायचं नाहीये. मात्र एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, पीएमसी बँकेच्या या अवस्थेसाठी मुंबईतील एक बडी आणि तितकीच बोगस बांधकाम कंपनी जबाबदार आहे. स्पष्टपणे नाव घ्यायचं झालं तर HDIL हे त्या कंपनीचं नाव आहे. काही वर्षांपूर्वी HDIL या कंपनीला राजाश्रय होता. तत्कालीन सरकारमधील काही बड्या नेत्यांची HDIL वर मेहेरनजर होती. HDIL आणि पीएमसी वेगळे नाहीत हे तेव्हा सांगितलं जायचं. याच HDIL ला पीएमसी बँकेतून वारेमाप कर्ज दिल्याची बाब आता समोर येतेय. सरकार मधील काही मोठी नावं सोबत असल्यामुळे HDIL अनिर्बंध काम करत होती. पीएमसी चा हवा तसा वापर केला गेला आणि आता डोक्यावरचा हात उठला कारण सरकार बदललं. मग बँकेतील अनियमितता बाहेर पडली. या केसमध्ये HDILच्या संचालकांवर कारवाई झाली पाहिजे. कारण अनेक ठिकाणी HDIL पुनर्विकासाच्या नावाखाली हजारो मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळली आहे. पत्राचाळीतील हजारो रहिवाशांना या HDIL नी सध्या रस्त्यावर आणलं आहे. आणि आता पीएमसी बँकेलापण देशोधडीला लावून मोकळे झाले आहेत. आपण जर सर्व संदर्भ तपासले तर HDIL च्या कर्मचाऱ्यांचा पगार हा पीएमसी बँकेतून वर्ग होत होता. HDIL पुनर्विकास करत असलेल्या वसाहतीतील लोकांना दिले जाणारे चेक हे पीएमसी बँकेचे असायचे. याचे पुरावे आहेत माझ्याकडे.  HDIL म्हणजे दिवाण पितापुत्रांनी पीएमसी बँकेला दावणीला (दिवाणीला) बांधून ठेवले होते. अर्थात सध्या अनेकांना बेघर करून बुडीत खात्यात गेलेली HDIL आणि पीएमसी वेगळे नव्हते. देवेंद्रजी यात लक्ष देतील आणि ठेवीदारांना न्याय देतील अशी निव्वळ अपेक्षा आहे. या दिवणगिरीतून मुंबईकरांना मुक्त करणं गरजेचं आहे. RBI योग्य ती कारवाई करेलच मात्र भीती फक्त एकच वाटते HDIL ला राजाश्रय देणाऱ्या एका बडा नेता कमळ हाती घेण्याच्या तयारीत आहे. याची पूर्ण निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी आणि पीएमसी च्या खातेदारांसह अनेक मुंबईकरांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या HDIL च्या दिवाण पितापुत्रांवर कारवाई व्हावी हिच इच्छा.

 

@पंकज दळवी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *