बालाजी मंदिरातील आपल्या पत्नीचं विश्वस्त पद कायम रहावं यासाठी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार ऑगस्ट महिन्यात उघडकीस आला. मागील दीड-दोन वर्षांपासून आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थान समितीच्या ट्रस्टी पदावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार कार्यरत होत्या. मात्र आंध्र प्रदेशात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी देवस्थानवरील समिती बरखास्त करून नव्यानं समिती स्थापन करण्याचं जाहीर केलं.  त्यामुळे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांना समितीवर पुन्हा एकदा विश्वस्त म्हणून बसवण्यासाठी मुंबईत जमीन उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं.

तिरुपती देवस्थानने विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन विनामूल्य देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरकारकडे केली होती. तिरुपती देवस्थानच्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने वांद्रे येथील ६४८ चौमी शासकीय जमीन तीस वर्षांसाठी एक रुपया इतक्या नाममात्र दराने वार्षिक भुईभाडे आकारून भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी दिली.

काही महिन्यांपूर्वी देवस्थानने मुंबईतील जागेसाठी पालघर आणि वसई विरारमधील जागेची पाहणी केली होती. मात्र देवस्थानसाठी या ठिकाणच्या जागा गैरसोयीच्या ठरत होत्या. अखेर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत वांद्रे येथील सरकारी वसाहत आणि बिकेसीजवळ असलेल्या ६४८ चौमीचा भूखंड देवस्थानाला देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच जागा देण्या विषयीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने महसूल विभागाकडून सर्वात आधी मंजूर करून घेतला. यामध्ये महसूल विभागाचे प्रधान सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांच्याकडे अर्थमंत्री स्वतः जातीने पाठपुरावा करत होते. अखेर  त्याद महसूल विभागाने मंजुरी दिल्यानंतर राज्य मंत्री मंडळात मंजूर करून घेतला.

विशेष म्हणजे मुंबईतील घरांचा प्रश्न लक्षात घेऊन सदरचा भूखंड घरांच्या निर्मितीसाठी मिळावा यासाठी जळवापस अकरा गृहनिर्माण संस्था सरकार दरबारी प्रयत्न करत होत्या. मात्र अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या आग्रहापूढे कोणाचंही चाललं नाही.

या भूखंडाची किंमत रेडी रेकनरच्या दरानुसार ८० कोटी रुपये होत असून बाजार भावानुसार २०० कोटींच्या आसपास किंमत ठरत आहे.  एवढ्या मोठ्या किमतीचा भूखंड केवळ मुनगंटीवारांच्या पुढाकाराने केवळ एक रुपया या नाममात्र दराने तीस वर्षांकरीत अब्जाधीश तिरुपती देवस्थानाला देण्यात आला.

एकीकडे तीन एकर भूकंड खरेदी करण्याचं प्रकरण खडसे यांना भोवलं होतं. यामुळे खडसे यांची मंत्री मंडळातून गच्छंती झाली होती. मात्र तिरुपती देवस्थान प्रकरणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सत्कार पाठीशी घालत असल्याचं म्हटलं जात आहे. यावर खडसे समर्थक नाराज आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *