अवजड वाहनांची निर्मिती करणारी हिंदुजा ग्रुपची अशोक लेलँड कंपनी एका महिन्यासाठी काम बंद ठेवणार आहे. सद्यस्थितीत कंपनीच्या नफ्यात ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. देशभरातील वाहन क्षेत्रातील वाढत्या मंदीमुळे हा निर्णय कंपनीने घेतला आहे. याआधीच मारुती, टोयोटासह इतर मोठ्या कार आणि बाईक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी कामगार कपात आणि कामाचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशोक लेलँड या अवजड वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे देशभरात पाच प्लांट आहेत. या सर्व प्लांटमध्ये या महिन्यासाठी नॉन वर्किंग डे जाहीर करण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पंतनगरमध्ये कंपनीचा सर्वांत मोठा प्लांट आहे. या प्लांटमध्ये महिन्याभरात १८ दिवस काम बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, महाराष्ट्रातील भंडारा, राजस्थानमधील अलवर आणि तामिळनाडूतील एन्नोर, होसुरमधील प्रकल्पांमध्ये नॉन वर्किंग डे जाहीर करण्यात आला आहे.

मागणीत घट झाल्याने नफा घटला

 कंपनीच्या अवजड वाहनांच्या देशातील मागणीत ५० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी देशात ऑगस्टमध्ये १६ हजार ६२८ वाहनांची विक्री झाली होती. यंदा मात्र ऑगस्टमधील विक्री ८ हजार २९६ वर आली आहे. यामुळे सद्यस्थितीत कंपनीच्या नफ्यात ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्षांत जूनपर्यंत ४२१.६३ कोटींचा नफा झाला होता. मात्र, यावर्षी केवळ २३० कोटींचा नफा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *