महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेकांवर आज केंद्र सरकारच्या ‘ईडी’ ने गुन्हे दाखल केले. ज्या प्रकरणात हे गुन्हे दाखल झालेत, त्यात कारवाईवेळी करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य किती, हे तपास आणि निकालांनंतरच आता स्पष्ट होईल. पण ही कारवाई निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली असल्याने तिला राजकीय अर्थ चिकटणे स्वाभाविक आहे.
शिवाय, कारवाई करणारी यंत्रणा/ तपास संस्था ईडी असली तरी तिची सूत्रे ही केंद्र सरकारच्या हाती आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपने ही ही खेळी पराभूत मनोवृत्तीतून केली, असेच मानले जाण्याचा संभव आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांदेश यात्रेतून राज्यभर फिरून पुन्हा सत्तेवर येण्याचा जो आत्मविश्वास व्यक्त केला, त्यावर या कारवाईने प्रश्नचिन्ह उमटणार आहे. मात्र शरद पवार हे ईडीच्या अशा कारवाईमुळे खचून जातील काय, अवसान गळून घरात स्वस्थ बसतील काय, मोदी सरकार आणि भाजपपुढे नमतील काय? पवार यांचा राजकीय पिंड आणि इतिहास पाहता या प्रश्नांचे उत्तर नकारार्थीच मिळेल.
पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र आणि शिष्य असले तरी त्या दोघांच्याही राजकीय शैलीत जमीन अस्मानचे अंतर आहे. यशवंतराव यांना गौरवाने ‘प्रतिशिवाजी’ म्हटले गेले होते. पण यशवंतराव यांनी ती उपमा स्पष्ट शब्दात नाकारली होती. त्यांची राजकीय अखेर ज्या अवहेलनेने झाली, ते पाहता त्यांनी त्या उपमेला दिलेला नकार चुकीचा नव्हता, हे पटते.

काय म्हणाले होते यशवंतराव?
काही लोक मला ‘प्रतिशिवाजी’ अशी उपमा देतात. पण मला ते मुळीच मान्य नाही. नंबर वनचे स्थान प्राप्त करण्यासाठी पराकोटीचे धाडस लागते. कारण ते स्थान प्राप्त करण्याच्या संघर्षात दोनच शक्यता असतात. यशस्वी झालात तर हिरो, अन्यथा झिरो. माझ्यात मुळात त्या धाडसाचाच अभाव आहे, असे यशवंतराव चव्हाण यांनी लिहून ठेवलेले आहे.
पवार आणि यशवंतराव चव्हाण यांची तुलना करता पराकोटीचे धाडस आणि त्यासाठी जोखीम पत्करण्याची तयारी हे पवार यांचे लक्षणीय वैशिष्टय म्हणावे लागेल. त्यांनी यशवंतराव हे स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतत असताना त्यांच्या सोबत जाण्याचे निग्रहाने टाळले होते. तसेच नंतर काँग्रेसमध्ये परतल्यावर तिथे कोणाशीही भिडायला ते कमी कधीच पडले नाहीत. कोणत्याही संघर्षात वाटेल ती किंमत मोजण्याची आणि नुकसान सोसण्याची तयारी ठेवूनच पवारांनी सगळ्यांशी दोन हात केले आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडून, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करून केंद्रात महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्याचा इतिहास तर सर्वांनाच ठाऊक आहे.
दिल्लीश्वरांपुढे गुडघे न टेकणारा आणि त्यांना नमवणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता, हीच पवार यांची प्रतिमा कायम राहिली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने त्यांच्यात कायम ‘मराठी पंतप्रधान’ पाहिला आहे. त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा अपवाद नव्हते. पवार यांना ती संधी मिळाली नाही आणि आता ईव्हीएमच्या पर्वात मिळण्याची सुतराम शक्यता नाही, हा भाग वेगळा. पण दिल्लीत महाराष्ट्राचा दरारा निर्माण करून राज्याचा मान आणि शान उंचावणारे पवार हे एकमेव नेते आहेत, हे कोणताही पक्ष नाकारू शकत नाही. पवार यांचे राजकारण, राज्य कारभार यावरून त्यांच्याशी मतभेद असलेल्यांची, त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अन ते स्वाभाविक आहे. पण ‘दाखलेबाजां’ची चलती असलेल्या आणि सुडबाजीच्या आजच्या राजकीय कालखंडात शरद पवार हे राजकीय सुसंस्कृतपणाचा यशवंतराव यांचा वारसा जपणारे नेते आहेत.
त्या पार्श्वभूमीवर, ऐन निवडणुकीत त्यांच्यावर ईडीने केलेली कारवाई मराठी जनांना, मनांना रुचेल, असे वाटत नाही. कदाचित पवार यांच्यासाठी ती कारवाई इष्टापत्तीही ठरू शकते. त्यांच्याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही चौकशी ईडीने केलेली आहेच. या कारवाईला ‘गुजरात विरुद्ध महाराष्ट्र’ असा रंग या निवडणुकीत चढला तर मात्र अनेकांची सारी ध्रुवीकरणे आणि जुळवलेली समीकरणे यांना सुरुंग लागू शकतो.

@दिवाकर शेजवळ

divakarshejwal1@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *