@मधुकर डुबे

पंतप्रधानांच्या कार्यालयाने नुकताच एक फतवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या नावे जारी केला आहे. तो असा;
राष्ट्रीय महामार्ग उभारण्यासाठी सध्या पैसे शिल्लक नाहीत. ते प्रकल्प अतिशय महागडे झाले आहेत. त्यासाठी आणखी पैसे देणे शक्य नाही. ऑथॉरिटीने त्यांच्याकडील असलेले-नसलेले उपाय योजावेत, उपलब्ध मालमत्ता विकाव्यात आणि प्रकल्प पूर्ण करावेत. महामार्ग बांधणीमध्ये जो मोबदला देण्यात आला त्याचा बोजा प्रचंड झाला आहे आणि हे महामार्ग प्रकल्प परवडेनासे झाले आहेत. खासगी क्षेत्राला गुंतवणूक करायला सांगून टोलच्या बदल्यात रस्ते बांधणी प्रकल्प पूर्ण करण्यात यावेत.
हा फतवा महामार्ग बांधणीच्या नियोजनाचे या सरकारने कसे बारा वाजविले आहेत, याचा पुरावा आहे. त्याच बरोबर खासगी क्षेत्रातील लोकांना हा फायद्याचा धंदा कसा देता येईल, याचे “मार्गदर्शन” देखील करण्यात आलेले आहे.
या निमित्ताने मला माझ्या गावातील अतिशय समृद्ध अशा शेतीतून जाणाऱ्या “समृद्धी महामार्गाची” आठवण झाली. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प वैयक्तिक प्रतिष्ठेचा करून प्रचंड पैसा खर्च केला, शेतकऱ्याच्या चांगल्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि मोबदल्यात अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होऊन सरकारी पैसे वाया गेले. तसे पाहिले तर मुंबई-नागपूर हा महामार्ग आहे. त्याच  रस्त्याचा वापर करून त्याचे रुंदीकरण करून कमी पैशात होऊ शकला असता. पण, कदाचित महाकाय प्रकल्पातील महाकाय कमिशन खाण्याच्या बुद्धीमुळे ह्या जास्त व्यवहार्य पर्यायाचा विचार करणे शक्य नव्हते.
आहे ते रस्ते किती खराब आहेत त्याचे मी वैयक्तिक अनुभवलेले मागील आठवड्यातील उदाहरण:
मुंबई-नागपूर सध्याच्या मार्गावरील येवला-अंदरसूल-वैजापूर  ते औरंगाबाद हा रास्ता इतका भयंकर खराब आहे, की ४० किलोमीटर साठी किमान दीड तास लागतो आणि वाहनांची आणि प्रवाशांची प्रचंड हानी होते ते वेगळेच…(अस्थिरोग तज्ञ, मोटर रिपेअरवाले  आणि सरकारचे यात काही साटेलोटे असावे अशी शंका येण्याइतपत हा रस्ता खराब आहे आणि इतके दिवस खराब आहे.)
भारावून टाकणारे वृत्तपत्रांचे मथळे-हेडलाईन्स-देणे वेगळे आणि अर्थव्यवस्था चांगली चालविणे वेगळे…..हे या सरकारला कळणे अवघड आहे. आणि याचे कारण त्यांच्या विचारसरणीत आहे. या भाजप सरकारला लोकांच्या भावनेचे राजकारण करून सत्ता अबाधित ठेवण्यात रस आहे. त्यासाठी गोरक्षण, मंदिर-मस्जिद, काश्मीर, आरक्षण-विरोध, परधर्म-द्वेष हे प्राधान्य क्रम आहेत…आर्थिक प्रश्न नव्हेत.

ज्यांना सरकारी, महाविद्यालयातील, शाळेतील, पक्क्या नोकऱ्या आहेत, ज्यांचे पोट भरून आता फक्त “देशभक्ती- भाजप प्रकार” करायची आहे त्यांना हे कळणे शक्य नाही. कारण, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची झळ लागत नाही.  तसेच काँग्रेसच्या काळात ज्यांनी व्यवसाय वगैरे करून संपत्ती गोळा करून ठेवली आहे आणि उतारवयात “आता उरलो देशभक्तीपुरता” अशी ज्यांची उन्मनी अवस्था आहे, त्यांनाही हे कळणार नाही.तीच गोष्ट मंदीची देखील…

आता भाजप-भक्त मंदी म्हणजे काय? तिची व्याख्या काय, ही मरगळ आहे की मंदी आहे, असे प्रश्न उपस्थित करून दिशाभूल करण्याचा मार्ग शोधात आहेत. पण, मूळ मुद्दा जो आहे तो नोकऱ्या वाढत नाहीत, कमी होत आहेत, परकीय भांडवल भारतातून पळ काढत आहेत, अर्थव्यवस्थेचे ह्या सरकारला काही कळत नाही, कारण यांच्या विचारसरणीत सामान्य लोकांचे जीवन-मरणाच्या प्रश्नाला महत्वाचं नाही, याकडे पद्धतशीर डोळेझाक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *