राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे भाजप आमदार राम कदम यांनी यंदाची दहीहंडी रद्द केली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राम कदम यांची खिल्ली उडवत लबाड लांडगा ढोंग करतोय अशा आशयाची बॅनरबाजी केली आहे. गेल्या वर्षीच्या दहीहंडीला आमदार राम कदम यांनी ‘पोरी पळवून आणू’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर नागरिकांनी तसंच विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं.

मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी लबाड लांडग ढोंग करतंय, पूरग्रस्तांच्या नावाने सोंग करतंय, अशा आशयाची बॅनर छापलं आहे. राम कदम यांनी यंदाची दहीहंडी ‘मुली पळवुन आणू’ या वाक्याने चिडलेल्या महिला प्रचंड निदर्शने करतील व दहीहंडीत राडा होऊन जाईल म्हणूनच रद्द केली, असं मनसेने म्हटलं आहे.

मनसेने नेमकं काय म्हटलं आहे?

२००९ साली संपूर्ण महाराष्ट्रात स्वाइन  फ्लूची साथ पसरलेली असताना व त्यात शेकडो नागरिक मृत्युमुखी पडलेले असताना सरकारने तसेच सर्व राजकीय पक्षांनी दहीहंडीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी मुंबई तसेच ठाण्यातील सर्व मोठ्या पारंपारिक दहीहंडीचे कार्यक्रम विशेषत:  वरळी येथील सचिन अहिर, पार्ला येथील कृष्णा हेगडे, ठाणे येथील जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आदींसह सर्व दहीहंडी आयोजकांनी आपली अनेक वर्ष चालत आलेली दहीहंडी रद्द करून सामाजिक भान दाखवून दिले होते. परंतु त्याच वेळेला प्रथमच दहीहंडी लावणाऱ्या घाटकोपरच्या “चमकेश” ने दहीहंडी रद्द करण्यास नकार देऊन लोकांच्या जीवाची पर्वा न करता आपली राजकीय पोळी भाजून घेतली होती. 2015-16 साली पडलेल्या दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना तसेच मुंबईमध्ये पाणी कपात जाहीर असतानाही पाण्याचे टँकर आणून पूर्ण पाण्याची दहीहंडी या “चमकेश” ने घाटकोपर मध्ये  साजरी करून आपली हौस भागवून घेतली होती. अशा चमकेशने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर येथील पुरांचे कारण देऊन दहीहंडी रद्द करणे हे खरे कारण नसून ह्या “चमकेश”चे दुखणे हे वेगळेच आहे.

गेल्या दहीहंडीच्या वेळेला “मुली पळून आणू” अशी मुक्ताफळे उधळून कुप्रसिद्ध झाल्यामुळे या “चमकेश” च्या दहीहंडी वर मुंबईतल्या गोविंदा पथकांनी बहिष्कार घातलेला आहे. “चमकेश”च्या दहीहंडीला कोणतेही पथक सलामी द्यायला फिरकणार नाही. तसेच “मुली पळवुन आणू” या वाक्याने चिडलेल्या महिला प्रचंड निदर्शने करतील व दहीहंडीत राडा होऊन जाईल म्हणूनच “चमकेश” घाबरला आहे.

गेल्या वेळच्या धसक्याने कोणताही सेलिब्रिटी व मुख्यमंत्र्यांसह कोणताही नेता दहीहंडीला येणार नाही याची खात्री “चमकेश”ला पटली आहे .

एवढेच नव्हे तर “चमकेश” च्या अनेक कारनाम्याने नाराज मिडीया त्याची चांगलीच वाजवणार याची त्याला माहिती होती आणि म्हणूनच “चमकेश”ने दहिहंडी रद्द केली.

म्हणतात ना की हत्तीचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे….

#गोWINदा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *