@जाफर गोठे

गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. गणेशोत्सव म्हटले कि कोकण असेच समीकरण झाले आहे.  महाराष्ट्राच्या इतर भागात हा सण, उत्सव कोकणा एवढया उत्साहात साजरा होत नाही. चाकरमानी मुंबईहून कोकणात म्हणजे आपल्या गावी यायला सुरवात झाली कि एक वेगळीच  वातावरण निर्मिती  होते.  चाकरमान्यांचा तो रूबाब, उत्साहासाठी पैसे खर्च करण्याची तयारी,  यामुळे  मुंबईकर चाकरमान्याला आदर मिळतो. त्याच्या भोवती गावकरी मंडळी जमतात. मुंबईहून येताना ते पक्षाचे झेंडे घेऊन येतात. त्यामुळे  उत्सव साजरा करताना पक्षाचे देखील काम होते आणि मग पैशाची कमी पडत नाही.  आता तर दोन महिन्याने विधानसभा निवडणूक आहे. मग काही विचारायला नको. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांचे बुकिंग फूल झाल्या आहेत. एसटी गाड्या पॅक झाल्यात. खाजगी गाड्याचे बुकिंग फुल, चाकरमान्याच्या स्वतःच्या गाड्या आहेतच. तसेच  मिळेल त्या वाहनानी चाकरमानी गावी येण्यास सुरवात झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ हा आता क्रमांक ६६ म्हणून ओळखला जातो. वाढत्या वाहनाची रहदारी व प्रवास सुखकर व्हावा म्हणून या ५५० कि.मी.अंतराच्या  मार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रातील काँग्रेसच्या मनमोहन सरकारने मंजूरी दिली ते काम तीन वर्षे सुरू होते. त्यानंतर अती जलदगतीने  काम करणारे, निर्णय घेणारे भाजपचे मोदी सरकार आले,  त्यामुळे हा महामार्ग मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईलच असे सांगण्यात येत होते. परंतु हा राष्ट्रीय  महामार्ग पाच वर्षात मुदतीत पूर्ण झाला नाही. अशीच  कामाची गती राहिली तर आणखी किमान तीन वर्षे लागतील असो.  बरं दिलेल्या  मुद्दतीत हा महामार्ग पूर्ण का  झाला नाही? असा प्रश्न ही विचारू  शकत नाही. नाहीतर भक्तांना राग येईल. जाऊ दे,  त्याचं असं झाले गेल्याच आठवड्यात एका व्हाँटसअँप ग्रूपवर पूरस्थिती बाबत पोस्ट होती.   “सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पूरस्थिती आणखी गंभीर  झाली. आपत्ती व्यवस्थापन करण्यात सरकारला अपयश”  असे एका बिचाऱ्यांनी ग्रूप वर लिहले. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. पण लगेचच भक्त कि काय म्हणतात. त्याला राग आला लागलीच त्यांनी उत्तर दिले   “काँग्रेस च्या राज्यात पाऊस लागत नव्हता काय. पूर येत नव्हता मग तेव्हा  काय केलेत.” जाऊ दे फारसे मनावर घेऊ नका.  कालचीच गोष्ट एका पेपर मध्ये मुंबई-गोवा महामार्गवर काँक्रिटच्या रस्त्याला खड्डे पडलेत, तडे गेलेत असा फोटो छापून आलाय. बोला आता…प्रश्न विचारणार?  नाही ना. नाही तर परम पूज्य भक्त लगेच उत्तर देतील.   ‘काँग्रेसच्या वेळी खड्डे पडत नव्हते का?’

मोदी सरकारची ही दुसरी टर्म आहे. पहिल्या पाच वर्षात या सरकारने लोकांच्या अन्न, वस्ञ, निवारा या मूलभूत समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडविल्या. पूर्ण केल्या,  रोजी रोटी व सुशिक्षित बेरोजगार तरूणांचे प्रश्न मिटविलेत.  त्यामुळे या प्रश्नांवर आता आपल्याला बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. प्रश्न  विचारून उगाचच वेळ वाया का घालविता?  आता या सरकारने प्रामुख्याने प्रलंबित राहिलेल्या  धार्मिक व राष्ट्रवादाचे जे ज्वलंत व जटील प्रश्न सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. तितकेच जोरदार स्वागत होत आहे.  सत्तेवर येताच सरकारने भारतीय मुस्लीमांचे जटिल प्रश्न सोडविण्यास सुरवात केली.  ‘अच्छे दिन व सबका साथ सबका विकास’ म्हणत प्रथम मुस्लिमांच्या शैक्षणिक व  आर्थिक मागासलेपणा व रोजीरोटी प्रश्नांसंबधी प्राधान्य  देऊन मुस्लीमां मधील गरीबी दूर केली व आता काही जटिल प्रश्न राहिलेत जे  मुस्लिम समाजाच्या विकासाच्या आड येत आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  त्यासंबंधी शासन जलदगतीने काम करत आहे. निर्णय घेत आहे. आणि मुस्लिम समाजातील हे जटिल प्रश्न सुटतात म्हटल्यावर हिंदुत्ववाद्यांबरोबरच तथाकथित विचारवंत व चळवळीतील कार्यकर्ते यांना देखील आनंद होतोय हे सरकारचे मोठ यश म्हणावे लागेल. जे गांधी विचार व तत्त्वज्ञान बद्दल बोलायचे, संविधान बचावची भाषा करायचे ते आज गोडसे व  सावरकर यांचे गुणगौरव करताना दिसतात.  या झालेल्या वैचारिक परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय सरकार व भक्तांना द्यायलाच हवे. देशात  राष्ट्रप्रेम, राष्ट्रवादाची लाट सुरू आहे आणि या लाटेसोबत जाण्यासाठी अनेकजण सज्ज झालेत. आपल्याला  अशी certificates मिळावित म्हणून  नवपेशवाई च्या वर्गात बऱ्याच तथाकथितांनी प्रवेश मिळविण्यासाठी धन्यता मानली. माझ्या मते देशातील बऱ्याचशा समस्या सुटल्या आहेत. एकाद दुसरी राहिली असेल तर तीही निकालात निघेल. म्हणून काळजी करण्याचे कारण नाही. आणि प्रश्न विचारून वेळ वाया घालावण्यात काहीच अर्थ नाही. आणि हो राहिला प्रश्न   राममंदिराचा. तोही  निकालात निघावा म्हणून सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू केलेत. लवकरच भक्तीमार्ग खुला होणार आहे. गणेश उत्साहाला एक वेगळेच वलय, महत्व आहे. माझ्या शेजारी असलेली वाडी व मिञमंडळी यांच्याकडे मी दरवर्षी गणेश दर्शनाला जातो.  याही वर्षी जाणार आहे. गणेशाची अनेक रूपे, नावे आहेत. कोण कोणत्या रूपात त्याला पाहतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. चला म्हणू या गणपती बाप्पा मोरय्या. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!!!

बडे ही अजब के लोग मेरे मुल्क के…

यहाँ भूख से ज्यादा धर्म पर बहस होती है…

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक प्रश्नाचे अभ्यासक आहेत.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *