पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत स्थापन झालेल्या वायमार रिपब्लिकचा प्रमुख हा राष्ट्रपती असे आणि तोच राईशटॅग ( Reichstag) या जर्मन संसदेतील बहुमत पाहून चान्सलर या पदासाठी, पक्षांना त्यांच्या नेत्याची शिफारस करण्याचे आवाहन करत असे. त्यातून चान्सलर निवडला जात असे जो मंत्रिमंडळ स्थापन करून राज्य कारभार करत असे.

वायमार रिपब्लिक १९१९ ला स्थापन झाले आणि फ्रेडरिक एबर्ट याची नियुक्ती राष्ट्रपती झाली. या सैन्यदलास राईशव्हेर (Reichwehr) असे नाव होते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैन्यदलातून सरकार विरोधात काही कारवाई होवू नये या हेतूने सर्व सैन्यदले स्वतंत्रपणे मात्र देशासाठी कार्यरत होती. या सर्व दलाचा सुप्रीम कमांडर हा राष्ट्रपती असे. म्हणूनच वायमार रिपब्लिक मध्ये राईशव्हेरप्रमुख हे पद राष्ट्रपतीकडे होते. या रचनेचा हेतू हा की, सैन्य कारवाईचा निर्णय हा निव्वळ चान्सलरकडे असता कामा नये. म्हणजे एकाच वेळी सैन्यावर सरकारचे आणि सरकारवर सैन्य दलप्रमुखाचे, सर्व सत्ता ही सिविलियन लिडरकडे, अशी ही रचना होती.

नाझी कार्यपद्धतीचे एक मोठे वैशिष्ट्य असे की, लष्कराबद्दल अतीव आदर, शत्रू राष्ट्राच्या विरोधासाठी  प्रखर युद्धोत्सुक असा राष्ट्रवाद, प्रशासनावरील पकड मजबूत करण्यासाठी प्रशासनातील नको असलेले लोक हटवणे, राष्ट्रहित या नावाखाली संपूर्ण कारभार अपारदर्शी करणे आणि समाजात ज्यू लोक हे शत्रू राष्ट्राचे हस्तक असल्याचा वंशवादी हिंसक प्रपोगंडा  प्रचलित करणे, ही सर्व कामे त्यांच्यासाठी राष्ट्रकार्यच होती. ती यशस्वी करण्यासाठी एक मोठे मनुष्यबळ हाती असावे लागते. यासाठी प्रत्यक्ष राष्ट्राचे लष्कराच या कमी वापरण्याचे धोरण आखले गेले. सैन्याचा वापर राजकीय उद्दिष्टांसाठी करणे त्यास विरोध हा राष्ट्रद्रोह, मग अशा विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांना संपवणे ही धोरणे हिटलर सत्तेवर येताच गुप्तपणे सुरू झाली.

वायमार रिपब्लिकमध्ये १९२५ साली राष्ट्रपतीपदाच्या  निवडणुका झाल्या आणि पूर्वी इम्पेरीयाल जर्मन आर्मीचा प्रमुख असणारा हिंडेनबर्ग राष्ट्रपती पदावर बसला आणि राईशव्हेर प्रमुख बनला. याच हिंडेनबर्गने हिटलरला सत्ताधीश बनवण्यात पुढे मोठी भूमिका पार पडली. हिंडेनबर्ग १९३२ च्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्रपतीपदी निवडून आला मात्र दोन अल्पकालीन चान्सलर नंतर त्याने १९३३ मध्ये हिटलरला बहुमत नसताना देखील चान्सलर या पदी बसवले. हिटलर बहुमत नसताना चान्सलर झाला मात्र सत्ता हस्तगत केल्यावर त्याने, त्याचे बहुमत हस्तगतही केले आणि तीच सत्ता राबवत तो विशाल आणि विराटही झाला.  म्हणून तर जागतिक इतिहासात हिटलर सत्तेवर आल्याचा घटनेस ‘Seizure Of Power’ असे म्हटले गेले, जे खूप समर्पक आहे. प्रखर राष्ट्रवाद,ज्यू विरोध यातून बहुसंख्य त्याने लोकांचे समर्थन मिळवले. हिटलरला विरोध म्हणजे देशाला देशाला विरोध हे सर्वमान्य झाल्यामुळे विरोधी पक्षातील अनेक नेते हिटलरचे यश पाहून हिटलर सोबत जाण्यास धन्यता मानू लागले, तर अनेक जण जर्मनी सोडून जाऊ लागले.

हिटलर सत्तेत आला त्याचवेळी त्याचा सहकारी, नाझी पक्षातील सशस्त्रदलाचा प्रमुख  अर्नेस्ट रोहम हा storm batallion चा प्रमुख होता. देशाचे सैन्यदल नाझी पक्षाच्या हाती असावे असा त्याचा विचार होता. पण सैन्याचा प्रमुख  राष्ट्रपती हिंडेनबर्ग होता आणि हे होणे शक्य नव्हते. पुढे हिंडेनबर्ग त्याच्या कार्यालयात मृत आढळला. हिंडेनबर्गनंतर हिटलरने राष्ट्रपती हे पद रिकामेच ठेवले, मात्र राष्ट्रपतीचे अधिकार त्याने स्वतःकडे ठेवले.  हिंडेनबर्ग बद्दल असणाऱ्या  आदरापोटी त्याने स्वत:स राष्ट्रपती म्हटलं नाही,  हे विशेष.

हिटलर अशा प्रकारे,एकाच वेळी चान्सलर आणि राष्ट्रपतीच्या अधिकारानुसार सुप्रीम कमांडर बनला होता. त्याच वेळी अर्नेस्ट रोहम जर्मन सैन्यदले storm batalion मध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव अनेक सैन्य अधिकाऱ्यांना  आणि राजकीय नेत्यांना देखील आवडला नाही. हा प्रस्ताव हिटलरची सत्ता उलथून टाकण्याचा कट आहे असे हिटलरला सांगण्यात आले होते. वास्तविक देशाची सैन्यदले नाझी पक्षाच्या सरकारच्या दिमतीला असावीत याबद्दल हिटलरला आक्षेप नसावा, मात्र याची सूत्रे अर्नेस्ट रोहम कडे जाणे हिटलरला मान्य होणारे नव्हते. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी म्हणून अर्नेस्ट रोहम यास आणि त्याच्या सहकार्यांना ३० जून १९३४ च्या रात्री बोलवण्यात आले.

१ जुलैच्या रात्री अर्नेस्ट रोहम आणि त्याच्या सहका-यांची अक्षरश: कत्तल केली गेली आणि विशेष म्हणजे त्यास हत्या न म्हणता ,’execution’ असे नाव दिले गेलं. शिक्षेची अंमलबजावणी हे  ( execution) हे नाव अर्थातच खुप सूचक आहे. मात्र त्या १ जुलैच्या रात्रीचे वर्णन,  इतिहासात  ‘The Night of Long Knives’ या नावानं केले जाते.

स्वपक्षातील विरोधक संपवण्याची सुरु झालेली मोहीम थांबणे शक्य नव्हते. ती एकाच वेळी सर्व विरोधक संपवणे या ध्येयात रुपांतरीत झाली. याकाळात ज्यू वंशियांचा द्वेष प्रचंड वाढला. ज्यूंना मारण्याचे कोणतेच कारण नसले तर कारण शोधले जात असे, नसेल तर कारण तयार केले जात असे. या सर्व कृत्यात सैन्याचा सहभाग असावा म्हणून सैन्यातून ज्यू सैन्य अधिका-यांना काढण्याची सुरुवात झाली. डिफेन्स मिनिस्टर ब्लॉम्बर्गने जर्मन सैन्याने नाझी पक्षाचे चिन्ह वापरावे असा आदेश काढला तर त्याच वेळी संपूर्ण सैन्याने जर्मन राष्ट्राशी नव्हेतर हिटलरशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यायला हवी असे आदेश दिले. कारण आता हिटलर हाच स्वतः राष्ट्र बनला असल्याचे हे द्योतक होते.

जर्मनी मध्ये हे सर्व घडत असताना इटली मध्ये तर मुसोलिनीच होता. मात्र ब्रिटन  फ्रांस, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड आदि देशातील सुखवस्तू लोकांना हिटलरच्या या कृत्यांबद्दल हेवा वाटत होता. ज्यूंची मस्ती जीरवायचे काम आपले सरकार करू शकत नाही, मात्र ते हिटलर करतो आहे, हे पाहून अनेक लोक खुश होते. युरोपातील अनेक सुशिक्षित लोकांची ही अवस्था होती. पण पुढे काय पाहायला मिळणार आहे, याबाबत सर्व जण बेफिकीर होते.

हिटलरला सर्व सत्ताधीश करणाऱ्या जर्मन सैन्याच्या फेररचनेचे संपूर्ण नेपथ्य तयार करण्यात आले आणि १६ मार्च १९३५ रोजी हा फेररचनेचा प्रस्ताव मांडण्यात आला. ज्यास जो काही विरोध झाला, तो मोडण्यासाठी काही साफसफाई करावी लागली, ती राष्ट्रप्रेम आणि ज्यूंचा विनाश या उद्दिष्टांच्या सबबीखाली यथेच्छ केली गेली आणि १ जून १९३५ रोजी सैन्य दलाची फेररचना करत वायमार रिपब्लिक मधील राईशव्हेर चे रुपांतर व्हँमाट ( Wehrmacht) मध्ये केले गेले. ज्या नुसार heer म्हणजे स्थलसेना  krigsmarine म्हणजे नौसेना आणि  luftwaffe म्हणजे वायुसेना या तीनही दलास एक समन्वयक नेमला जो व्हँमाट प्रमुख म्हणजेच  सुप्रीम कमांडर  असणार होता, जो हिटलर होता.

राईशव्हेर चे रुपांतर व्हँमाटमध्ये झाल्यावर जर्मनीत तीन सर्वोच्च पदे तयार झाली. त्यातील राष्ट्रपती हे पद हिंडेनबर्गच्या मृत्यूनंतर रिक्त होते म्हणून त्या अधिकारासह हिटलरच राष्ट्रपती. चान्सलर तर हिटलर होताच पण व्हँमाटचा  ‘सुप्रीम कमांडर’ हे पदही हिटलर कडेच अशा पद्धतीने हिटलरने देशाची तीन्ही सैन्यदले स्वतःच्या नाझी पक्षाचा राजकीय अजेंडा राबविण्यासाठीची एकत्रित केली. जग हे सर्व  उघड्या डोळ्याने पहात होते आणि तरीही जगाचे डोळे उघडण्यास १९४५ म्हणजे अजून दहा वर्ष कालावधी लागणार होता.

नाझी पक्षाच्या सशस्त्र दलात, उजवा हात वरती करत ‘हेल हिटलर’ असे उच्चारात केला जाणारा एक सँल्यूट  होता. पुढे हाच सँल्यूट जर्मन सैन्याचा अधिकृत सँल्यूट  म्हणून मान्यता मिळाली होती.

@राज कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *