पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हल‍विण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. या नागरिकांसाठी ४४१ निवारा केंद्रे काही काळासाठी सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३३ पथकांसह आर्मी, नौदल, तटरक्षक दलाची एकूण १११ बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा देखील कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये १०५ बचाव पथकं कार्यरत आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. यासह पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर इथे देखील बचाव पथके कार्यरत आहेत.

पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बारा बाधित तालुक्यातील २ लाख ४७ हजार ६७८ तसंच सांगली शहरासह जिल्ह्यातील चार बाधित तालुक्यातील १ लाख ७३ हजार ८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०८ तर सांगली जिल्ह्यात १०८ निवारा केंद्र काही काळासाठी सुरु करण्यात आली आहेत. पूरपरिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. यातील पूरग्रस्त गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

पावसामुळे पूरस्थितीत असलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये बचाव कार्य जोमाने सुरू आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ११८ गावांमधील ९ हजार ५२१, ठाणे जिल्ह्यामधील २५ गावांमधील १३ हजार १०४, पुणे जिल्ह्यातील १०८ गावांमधील १३ हजार ५००, नाशिक जिल्ह्यातील ५ गावांमधील ३ हजार ८९४, पालघर जिल्ह्यातील ५८ गावांमधील २ हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील १२ गावांमधील ६८७, रायगड जिल्ह्यातील ६० गावांमधील ३ हजार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १८ गावांमधील ४९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *