प्रश्न : गेली काही शतकं पंढरपूरची वारी फार चर्चेत असते.
अंनिसची या वारीबद्दल नेमकी काय भूमिका आहे?
वारी ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे?
श्रद्धा असेल, तर तिच्यात अंनिसचे कार्यकर्ते सहभागी का होत नाहीत?  आणि ती अंधश्रद्धा आहे, असं वाटत असेल, तर मग तिला तुम्ही विरोध का करत नाही?

डॉ. दाभोलकर: चांगला प्रश्‍न आहे. याच्यासाठी आपण मगाशी केलेल्या श्रद्धेच्या व्याख्येपासून सुरुवात करू.
मी म्हटलं होतं की, उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती म्हणजे श्रद्धा.
यातले उत्कटता आणि कृतिशीलता हे पहिले दोन निकष वारी निश्‍चितपणे पूर्ण करते. सगळे वारकरी येतात, कुणीही निमंत्रण न देता स्वत:च्या खर्चाने येतात, अडीअडचणी सोसून येतात. आणि गर्दीमुळे देवाचं दर्शन झालं नाही, तरी कळसाचं दर्शन घेऊन परत जातात. हा सगळा भाग ‘उत्कटपणे कृतिशीलता’ याचा पूर्वार्ध पूर्ण करतो.
महत्त्वाचा शब्द राहिला आहे, ‘विवेकशक्ती’. मूल्यविवेक उन्नत करते, ती श्रद्धा असते.
वारी कशाकरता सुरू झाली हो?  वारी सुरू झाली, त्या वेळी महाराष्ट्रामध्ये विषमतेचा प्रचंड बुजबुजाट होता. तुमचे कपडे, तुमचं खाणं, तुमची बाह्यांग लक्षणं याच्यावरून जात आणि उपजात कळत होती. त्यावर वारकरी असं म्हणाले की, ‘आम्ही हे सगळं मिटवतो. ज्याच्या कपाळावर टिळा आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, जो गोपालकाला करायला तयार आहे, जो ज्ञानेश्‍वर माऊलीला आणि तुकारामाला मानतो, तो वारकरी.’
म्हणजे
‘विष्णूमय’ जग। वैष्णवांचा धर्म॥ भेदाभेद भ्रम। अमंगळ॥

’त्यामुळे वारीमध्ये कोणीही कुणाच्याही पाया पडतो आणि ‘माऊली’ म्हणतो, हे तुम्हाला माहीत असेल.
चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ते एकत्र नाचतात.
इथून श्रद्धेचा खरा प्रांत सुरू होतो.

पण हे सगळं फक्त
वाळवंटापुरतंच मर्यादित राहतं. म्हणजे आपण असा विचार करायला पाहिजे होता की, एवढा मोठा वारकरी संप्रदाय आहे आणि तो जर जातिधर्माच्या पलीकडे जाणारा आहे, तर गावोगावी त्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंतरजातीय लग्नं व्हायला पाहिजे होती. ती अजिबातच कशी झाली नाहीत?

बरं, नाही झाली. आज आम्ही आंतरजातीय लग्नं लावतो. किमान आम्हाला त्यांनी पाठिंबा द्याला पाहिजे होता.
बरं ते राहू दे. अस्पृश्य लोक गावाच्या बाहेरच कसे राहिले? ते गावात का आले नाहीत? बरं ते राहू दे. वारी सुरू झाल्यानंतर चारशे वर्षांनी फुले आणि पाचशे वर्षांनी आंबेडकर जन्माला आले, त्यांना एवढा विरोध का झाला?

त्यामुळे वारी हे समता संगराच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे, पण ती ‘श्रद्धा’ होण्यासाठी ही समता संगराची लढाई वारकऱ्यांना बरीच अधिक नेटानं लढावी लागेल….

प्रा. प्रवीण एन. देशमुख
‘कुमुद’ बंगला नं ७५
ग्रीन पार्क को. हौ. सो. लिमिटेड लोढा हेवन,
कल्याण शीळ रोड, निळजे, डोंबिवली (पूर्व )
जिल्हा: ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *