ख-या सर्वोदयी कार्यकर्त्यांना  जाहीर आवाहन

जय जगत्
सर्व सेवा संघ व सर्वोदय समाजाचे तथाकथित नेतेमंडळी १९७८पासून सर्वोदयाला RSS च्या वाटेवर ओढून नेत आहेत. यावर अनेकदा मी लिहिले आहे. पुन्हा एकदा हा सारा घटनाक्रम आपल्यासमोर मांडतो.

१) १९७८ साली सर्व सेवा संघाचे त्यावेळेसचे नेते यांनी, RSS प्रमुखांशी, RSS व सर्व सेवा संघाने एकत्र काम करावे, अशी बोलणी केली.
२) सर्व सेवा संघाचे त्यावेळेसचे अध्यक्ष शिवसेनेच्या किसान यात्रेत सहभागी झालेत.
३) महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष, जे पनवेलच्या शांतीवनचेही ट्रस्टी होते त्यांनी शांतीवनची जागा RSS च्या संमेलनाला दिली.
४) RSS च्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला सेवाग्रामची जागा द्यायला आश्रमाच्या अध्यक्षांनी विरोध करून अप्रत्यक्षपणे RSS ला मदततच केली.
५) RSS धार्जिण्या सरकारच्या गांधी १५० जयंती समितीत, सर्वोदय समाजाचे अध्यक्ष व नई तालीमचे अध्यक्ष सहभागी झालेत.

आज  सर्वोदय समाजाच्या विद्यमान अध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे होणाऱ्या सर्वोदय समाजाच्या संमेलनाच्या जागेसाठी मागणी पत्र लिहिले. पत्र गांधी १५० जयंती अभियान च्या लेटरहेडवर आहे व कार्यालयाचा पत्ता पुणे, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ असे आहे. पत्रात सर्वोदय समाजाचे विद्यमान अध्यक्ष लिहितात, “भारताचे महामहीम राष्ट्रपती माननीय श्री. रामनाथ कोविंद व भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशामध्ये गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे कार्य चालविले आहे, त्याबद्दल गांधीजनांना व गांधीप्रेमींना आनंद आहे. आपले व महाराष्ट्र सरकारचे संमेलनासाठी सक्रिय मार्गदर्शन व सहकार्य मिळेल अशी आशा आहे.”

गांधीजींच्या खुनाला जी विचारधारा जबाबदार आहे, त्या विचारधारेच्या सरकारने गांधीजींची १५० वी जयंती साजरी करावी व सर्वोदयाच्या तथाकथित नेत्यांनी गांधीजनांना आनंद झाल्याचे सांगावे तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शनही मागावे याचा निषेध करावा तेव्हढा थोडा!

१९४८ साली सर्वोदय समाजाच्या स्थापनेच्या भाषणात विनोबा म्हणाले होते की, “RSS संघटना अगदी फॅसिस्ट पद्धतीची आहे. ही जमात फक्त दंगाधोपा करणारी नाही. ती फक्त उपद्रवाद्यांची जमात नाही, तर ती फॅसिस्ट फिलॉसॉफरांची जमात आहे.” पण सर्व सेवा संघ व सर्वोदय समाजाच्या तथाकथित नेत्यांना विनोबांच्या या विचारांचा विसर पडला आहे.

१९७५ पर्यंत विनोबा दोन वेळा उपवास करून त्याचे ३६ रुपये उपवासदान सर्व सेवा संघाला देत होते. सर्व सेवा संघाला विनोबांनी दिलेला हा नैतिक पाठिंबा होता. पण १९७५ पासून सर्व सेवा संघाची पाऊले ज्या दिशेला पडू लागली ती पाहून विनोबांनी आपले उपवासदान ११ सप्टेंबर १९७५ पासून देणे बंद केले. सर्व संघाला देण्यात येणारा आपला  नैतिक पाठिंबा विनोबांनी काढून घेतला. आजचा सर्व सेवा संघ व सर्वोदय समाज विनोबांचा नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

जेव्हा जेव्हा सर्व सेवा संघाने RSS धार्जिणे धोरण स्वीकारले तेव्हा तेव्हा मी त्याचा निषेध केला आहे. आज पुन्हा एकदा निषेध करतो. पण सर्व सेवा संघ व सर्वोदय समाजाच्या नेत्यांवर या निषेधाचा परिणाम होत नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आले आहे.

आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर ख-या सर्वोदयी कार्यकर्त्‍यांनी या तथाकथित सर्वोदयी नेत्यांच्या विचार केला पाहिजे. व तसे पाऊल उचलले पाहिजे.

@विजय दिवाण

विनोबा जन्मस्थान
९०२८३२१०६३

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *