देशाची आणि काँग्रेस पक्षाची सेवा करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. काँग्रेसची मूल्ये व आदर्श आपल्या देशाच्या धमन्यांमधुन वाहतात. मी देश आणि काँग्रेस संघटनेचा ऋणी आहे.

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून २०१९ च्या निवडणुकीतील पराभवाला मी जबाबदार आहे. भविष्यातील पक्षाच्या वाढीसाठी पराभवाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे म्हणून मी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पक्षाची पुर्नरचना करण्यासाठी कठीण निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. २०१९ च्या पराभवाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी दुर्लक्षित करून इतरांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही.

माझ्या अनेक सहका-यांनी सुचवलं की मी काँग्रेस अध्यक्ष पदासाठी नाव सुचवावे. नक्कीच कुणा नव्या व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व केले पाहीजे पण त्याची नेमणूक मी करावी हे उचित नाही. आपल्या पक्षाला संघर्ष आणि सन्मानाचा मोठा इतिहास आणि वारसा आहे, ज्याचा मी मनापासून आदर करतो.  प्रेमाने, निष्ठेने आणि धाडसाने वागणारे योग्य नेतृत्व पक्ष नक्कीच निवडेल.

मी राजीनामा दिल्याबरोबर काँग्रेस वर्किंग कमिटीतील माझ्या सहका-यांना मी सांगितले होते की नव्या अध्यक्षाच्या निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात करा. ही सर्व प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मी त्यांना पूर्ण अधिकार आणि समर्थन दिले आहे.

माझी लढाईही केवळ राजकीय सत्तेसाठी नाही. मला भारतीय जनता पक्षाबद्दल राग किंवा द्वेष नाही. पण माझ्या शरीरातला प्रत्येक कण त्यांच्या भारताबद्दलच्या  कल्पनेचा प्रतिकार करत राहील. भारताबद्दलच्या त्यांच्या आणि माझ्या वेगळवेगळ्या कल्पनांमुळे हा संघर्ष उभा राहिला आहे. त्यांना जेथे भेद दिसतो तेथे मला साम्य दिसते, त्यांना जेथे द्वेष दिसतो मला तेथे प्रेम दिसते, त्यांना ज्याची भीती वाटते, मी त्यास जवळ करतो. ही सर्वसमावेशक भारताची कल्पना देशातील कोट्यवधी नागरिकांच्या ह्दयात आहे व तिचा बचाव आपल्याला करायचा आहे.

हे संविधान आणि देशावरील अतिक्रमण आपल्या देशाला ज्या धाग्याने एकत्रित बांधून ठेवले आहे तो नष्ट करण्यासाठी आहे. या लढाईपासून मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान सैनिक आणि भारत मातेचा समर्पित पुत्र म्हणून त्यांच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन.

आम्ही मजबूतीने आणि प्रतिष्ठेने निवडणूक लढलो. आमचा प्रचार देशाची बंधुता, सहिष्णुता आणि सर्व धर्म आणि जातीचा आदर कऱणारा होता.

मी वैयक्तिकरित्या पंतप्रधान, आरएसएस आणि त्यांच्या विचारधारे विरोधात लढलो. भारत देशावर माझे प्रेम आहे म्हणून मी लढलो. ज्या विचारांनी भारत घडला त्या विचारांच्या रक्षणासाठी काही वेळेस मी एकटाच लढलो आणि मला त्याचा अभिमान आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चैतन्य आणि समर्पणाने मला प्रेम आणि सभ्यता शिकवली.

देशातील संस्थांच्या तटस्थतेसाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुक प्रक्रियेची आवश्यकता असते. माध्यमांचे स्वातंत्र्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था, आणि पारर्दशक निवडणूक आयोग असल्याशिवाय हे शक्य नाही. तसेच निवडणुकीसाठी लागणारे आर्थिक पाठबळ ही एका पक्षाची मक्तेदारी असेल तर निष्पक्ष निवडणूक शक्य नाही.

आम्ही २०१९ च्या निवडणुकीत एका राजकीय पक्षाशी नाही तर संपूर्ण सरकारी व्यवस्थेशी लढलो. संपूर्ण यंत्रणांचा वापर आपल्याविरोधात केला गेला. आपल्या देशातील संवैधानिक संस्थानाना आता स्वातंत्र्य राहिले नाही हे आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

संवैधानिक संस्था ताब्यात घेण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. आपली लोकशाही मूलभूतपणे कमजोर झाली आहे. निवडणुका म्हणजे भारताचे भविष्य ठरवण्याचे साधन नव्हे तर फक्त एक उपचार बनुन राहण्याचा धोका आहे.

अशा पद्धतीने सत्ता हस्तगत केल्याने देशात हिंसा मोठ्या प्रमाणात वाढेल. शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांक यांची होरपळ होतेय. या देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. ह्या विजयामुळे पंतप्रधानांवरील भ्रष्टाचाराचे डाग धुतले जाणार नाहीत, पैसा आणि प्रचार सत्याचा प्रकाश रोखू शकत नाही.

संपूर्ण देशाने एकत्र येऊन आपल्या संस्थांचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे आणि ते करण्याचे साधन काँग्रेस पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाने स्वतःला बदलले पाहिजे. भारतीय जनता पक्षाकडून पद्धतशीरपणे नागरिकांचा आवाज दडपण्याचे काम सुरु आहे. लोकांच्या आवाजाचे रक्षण करणे हे काँग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे. भारतात एकाधिकारशाहीला थारा नाही. ते विविध सुर एकत्र आल्याने तयार झालेले सुमधुर संगीत आहे. हे ख-या भारताचे वैशिष्ट्य आहे.

देशातून आणि परदेशातून हजारो पत्रे पाठवुन मला पाठिंबा देणा-या सर्व भारतीयांचे आभार. काँग्रेस पक्षाच्या आदर्शांसाठी मी माझ्या पूर्ण ताकदीनीशी लढेन. पक्षाला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी उपलब्ध आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी बांधील कार्यकर्ते हे पक्षाचे भविष्य आहे त्यांच्यावर माझे प्रेम आणि विश्वास आहे. भारतात बलाढ्य (बलवान) व्यक्ती सत्ता सोडायला तयार होत नाहीत. पण सत्तेची ईच्छा सोडून आपल्या विचारधारेची लढाई लढल्याशिवाय आपण आपल्या विरोधकांना हरवू शकत नाही. मी जन्माने काँग्रेसी आहे. काँग्रेस पक्ष कायम माझ्या बरोबर आहे,  तो माझ्या रक्तातच आहे आणि कायम राहील.

जय हिंद

राहुल गांधी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *