गोरेगाव येथे तीन वर्षाचा चिमुरडा मॅनहोलमध्ये पडल्याने पालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना लोकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. या घडलेल्या प्रकारावर महापौरांनी मुंबईकरांनाच जबाबदर ठरवलं आहे. मुंबईकरच गटाराची झाकणं उघडी ठेवतात असा अजब दावा महापौरांनी केला आहे.

दरम्यान याप्रकरणी त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गटार स्थानकांनी तोडलं होतं की, प्रशासनानेच झाकण बसवलं नव्हतं हे पाहणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गोरेगाव मधील आंबेडकर नगरमध्ये काल रात्री साडे दहाच्या सुमारास तीन वर्षांचा चिमुरडा नाल्यात पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अद्यापही या मुलाला शोधण्यात यश आलेलं नाही. महापौर विश्वनाथ महाडेश्वर या परिसरात येण्यापूर्वीच स्थानिकांनी आंबेडकर चौकात रास्तारोको करून हा संपूर्ण रस्ता अडवून धरला होता. दिव्यांश धानसी असं या चिमुरड्याचं नाव आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि पालिका कर्मचारी गेल्या अनेक तासांपासून या मुलाचा शोध घेत आहेत. मात्र अद्यापही या चिमुरड्याचा शोध लागलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *