@जयश्री इंगळे

गेल्या महिन्याभरापासून आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये लोकशाही मूल्ये संरक्षणासाठी चाललेली प्रचंड मोठी नागरी चळवळ जगाचे लक्ष वेधून घेत आहे आणि ती देखील कडव्या अजस्त्र कम्युनिस्ट चीन राष्ट्रात! चीनच्या हाँगकाँग या प्रांतात महिन्याभरापासून अगदी रोज सातत्याने लाखोंच्या संख्येत गोळा होऊन हाँगकाँग चे नागरिक शांतीपूर्ण मार्गाने निदर्शनं करीत आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या चळवळीला कुणीही नेता नाही. सर्वसामान्य जनता आपल्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे रस्तांवर  उतरत आहे.


हाँगकाँगचा इतिहास:
चीनच्या दक्षिण पूर्व बाजूला असणारे  हाँगकाँग बेट हजारो वर्षांपासून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्वाचे केंद्र राहिलेले आहे.1842 च्या दरम्यान इथून अफूचा मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. त्यामुळे ब्रिटिशांनी चीनशी युद्ध करून हे बेट जिंकले आणि अगदी आता पर्यंत म्हणजे 1984 पर्यंत हे बेट ब्रिटिशांच्या ताब्यात होते. त्यानंतर चीन आणि ब्रिटनमध्ये 1984 मध्ये झालेल्या करारानुसार, 1997 पासून हाँगकाँग चीनच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र त्या करारानूसार हाँगकाँग प्रांताला विशेष दर्जा देऊन लोकशाही तत्वांवर स्वायत्तता देण्याकरिता चीनला भाग पाडले गेले.

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीमध्ये चिनी नागरिकांवर प्रचंड बंधने असताना, हाँगकाँगमधील नागरिक मात्र स्वतंत्र शासन, स्वतंत्र अर्थव्यवस्था, स्वंतत्र न्यायव्यवस्था, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असे सर्व लोकशाही अधिकार भोगत आले आहेत. मात्र झिनपिंग हे चीनचे राष्ट्रप्रमुख झाल्यापासून हाँगकाँगची स्वायत्तता मोडीत काढण्यासाठी आणि तिथे चीनचे एकछत्री कम्युनिस्ट सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून हाँगकाँगच्या शासनावर दबाव आणून चीनी सरकार त्याच्यावर Extradition Bill (प्रत्यार्पण विधेयक) थोपवू पाहत आहे. हे बिल पास झाल्यास कुठलेही आरोप असलेल्या हाँगकाँग नागरिकास कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मेनलँड चायनामध्ये रवानगी करून तेथील न्यायालयात न्यायिक प्रक्रिया केली जाईल. या विधेयकाचा गैरफायदा घेऊन चिनी सरकार हाँगकाँगच्या नागरिकांना कुठल्याही आरोपाखाली अटक करून दहशत पसरवू शकते म्हणून या विधेयकाला हाँगकाँगमधील नागरिकांचा विरोध आहे.

लाखो नागरिकांच्या सततच्या आंदोलनांमुळे सध्या तरी हे विधेयक तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे मात्र हे विधेयक कायम रद्द करण्यासाठी अजूनही रोज लाखो हाँगकाँगवासी रस्त्यांवर येत आहेत. या कम्युनिस्ट राजवटीत, कुठल्याही नेतृत्वाविना चालवलेली ही क्रांती जगाला अचंबीत करणारी आणि लोकशाही संकल्पनेला बळकटी देणारी तसेच स्फुर्तीदायक आहे. विशेषतः आपल्या देशात लोकशाहीला कमकुवत करण्याचे जे सध्या प्रयत्न होत आहेत त्या पार्श्व भूमीवर आपल्या देशवासीयांनी ह्या चळवळीकडे गांभीर्याने पाहण्याची आणि वेळ पडल्यास अशी व्यापक चळवळ उभी करण्याची गरज आहे.

#HongkongProtests
#MainlandChina
#HongkongExtraditionBill

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *