क्रिकेट हा ब्रिटिशांचा खेळ, त्यांच्याच  विरूध्द भारताचा  2019 ”  विश्वचषकातला सामना होता. वास्तविक ब्रिटिशांनी आपल्यावर १५० वर्षे राज्य केलं.  जगातल्या अनेक शेजारी  दोन देशात फुटबॉल खेळात जे शत्रूत्व आजही धुमसतं तसं काही भारत विरूध्द इंग्लंड क्रिकेट सामन्याचं नसतं उलट भारत विरूध्द पाकिस्तान यात ते जास्त अधोरेखित होतं. खेळातलं हे शत्रूत्व का घडलं असावं? हा शोध घेण्याची गरज नाही. ते सर्वांनाच ज्ञात आहे. फारसा मेंदुला ताण न देता, शोध घेणारी घटना भारत-इंग्लंड सामन्यात घडली. पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात जो आक्रोश आपण आनंदाने साजरा करतो त्या प्रकारचा आनंद देशवासियांनी इंग्लंड विरूध्दच्या सामन्यात भगव्या जर्सीच्या रूपाने प्रथमच साजरा केला. त्या निमित्ताने मोठी चर्चाही घडवली गेली.  तर, मुद्दा फक्त नैसर्गिक रंगाची, नैसर्गिक धाग्यातून बनलेल्या कापडाची जर्सी बदलण्याचा होता. जी जर्सी खेळ खेळताना ओळख म्हणून खेळाडू परिधान करतात. चिखलाने माखली किंवा मळली की बाजूला टाकून दुसरी परिधान करतात. या जर्सीमुळे  रंगाच्या अंगाने धार्मिक भावनेवर चर्चा घडविण्यात आली. खरं तर ब्रिटिशांनी या देशात हा खेळ सुरू केला तो मनोरंजनाकरीता, आपला देश तेव्हा पासुन हा खेळ खेळतोय. क्रिकेट या खेळात भगव्या रंगातील जर्सी रूपाने धार्मिक भावना नव्याने पसरवली जातेय असं अजिबात नाही. पूर्वी पासुनच या खेळाला धार्मिक रूप लादण्यात आलंय.  फरक इतकाच कि ते सुप्तावस्थेत दडलंय. अगदी पूर्वी म्हणजे ब्रिटिशांबरोबर मॅच खेळतानाही याचे दाखले मिळतात. त्या काळी क्रिकेट खेळात विशिष्ट समाजाची मक्तेदारी असायची. वर्णवाद्यांचं १००% आरक्षण असायचं.  त्यामुळे आपण पराभूत व्हायचो. दलित समाजातील अष्टपैलू खेळाडू पी बाळू व त्यांच्या भावांना जेव्हा क्रिकेट मध्ये घेण्यात आलं तेव्हा अनेक मॅचेस या बंधूंनी भारताला जिंकून दिल्या. “लगान”  या चित्रपटातही हि वर्णवादी वर्चस्वाची दाहकता दाखविण्यात आली आहे. आमिर खान कचराच्या हातात गोलंदाजी करायला बॉल सोपवतो आणि सामन्याला कलाटणी मिळते. या पद्धतीने, विशिष्ट समाजाची भारतीय क्रिकेट मधली मक्तेदारी पूर्वांपारची लादलेली.  अगदी दोन दशका पूर्वीही ती तशीच होती. गावस्कर, वाडेकर, वेंगसरकर, सोलकर, तेंडुलकर या आणि  त्यांच्याच गोत्राच्या रूपाने हि मक्तेदारी कायम राहिली. मधल्या काळात हि मक्तेदारी मोडीत  निघाली. मा. शरद पवार साहेबांचा या खेळातला प्रवेश खुप काही सांगून जातो. क्रिकेटला नवं रूप देण्याचा पाया त्यांनी रचला. शहरी भाग वगळता ग्रामीण भागातून व निरनिराळ्या समाज घटकातून गुणी, पराक्रमी खेळाडू भेटण्याचा हाच तो काळ. अलिकडे भारताने या खेळात बऱ्यापैकी ठसा उमटवला तो यांमुळेच! भारतीय क्रिकेटमध्ये झालेली परिवर्तनाची सुरूवात रंगाच्या धार्मिक उन्मादाने  थबकते की काय? अशी शक्यता भगव्या  जर्सीमुळे वाटायला लागलीय. खरं तर, रंगाने देशाचं यश शोधणारी मानसिक कट्टरता, भारत देशाला महासत्ता नव्हे दारिद्रयाची महासत्ता करेल! या देशातले बहुसंख्य  नागरिक बाबा आदमच्या म्हणजे उघडे- नागडे राहणाऱ्या, कंदमुळे, कच्च मांस खाणाऱ्या युगात जगतात की काय असं वाटायला लागतं. पराकोटीचं अज्ञान त्यांना मानसिक गुलामीत जगवतंय.  प्रत्येक समुहाने रंगावर आपला ताबा सांगितलाय. रग हा सुदैवी की दुर्दैवी हि मानसिकताच मुळात  विकलांगतेचं प्रतिक आहे. रंगाने धर्माच्या आडून जनतेला  भरकटविण्याचा प्रयत्न सतत होत   आलाय. आकाशात नैसर्गिक घडामोडींमुळे सप्तरंगाचा मनमोहक पट्टा तयार होतो. (ज्याला इंग्रजी भाषेत रेनबो” म्हणतात) त्यालाही “इंद्रधनुष्य” करून टाकलं. भारतीयांच्या मनावर हा इंद्राचा धनुष्य असल्याचं बिंबवलं गेलंय. आजही भारतीय आपल्या बालकांना  आकाशाकडे बोट करून हा “इंद्रधनुष्य” असल्याचं सांगतात. इंद्राच्या नावावर नैसर्गिक सप्तरंग खपविल्याने आपल्या पाल्याची  वैज्ञानिक दृष्टी, जिज्ञासा वृत्ती मारली जातेय हे त्यांच्या लक्षात येत नाही. आकाशात तयार होणाऱ्या सप्तरंगाचं लॉजिक त्याला सांगितलं तर पुढील शोधमोहिम सुरू होऊ शकते. पण शोध आणि बोधाच्या वाटेने कुणी जाऊ नये असे वातावरण या देशात प्रत्येक कालखंडात निर्माण  करण्यात आले. हल्ली तर रंगदिनाने (कलर्स डे) आपल्याकडे जोम धरलाय. नऊरात्रौत्सवात नऊ दिवस ” देवीची” उपासना केली जायची. “दांडीया रासच्या” रूपाने नाचत, बागडत देवीसमोर जागरण केलं जातंय. उपास आणि अनवाणी पायाने चालणं हे देखील नवरात्रौत्सवात करण्याचे प्रकार. “धार्मिक श्रद्धा”  पाळण्याबाबत दुमत अजिबात नाही. प्रत्येकास संविधानाने दिलेला तो अधिकार आहे. तर, या नवरात्रौत्सवात अलिकडे प्रत्येक दिवस हा रंगाने  ठरतो. नऊ दिवस नऊ रंग सर्वांनी  एकाच रंगाचे कपडे परिधान करायचे. नऊ दिवस कुठल्याच नाविन्याचा विचार करायचा नाही. मेंदूला तसदी न देता रंगाच्या जंजाळात व्यस्त राहयचं हे तर यामागे लॉजिक आहेच पण पुढील हजारो वर्षांच्या मानसिक गुलाम संस्कृतीचं सुत्रंही आहे. माती पासुन अनेक रंगांचा शोध लावणाऱ्या कार्व्हरलाही हे  ( एक होता कार्व्हर- लेखिका-विणा गवाणकर) कोडयात टाकणारं सुत्रं आहे. रंगांचा व इतरही अनेक बाबींचा शोध लावणारा कार्व्हर आयुष्यभर एकच आणि एकाच रंगाचा कोट घालायचा. तो रंगांच्या जंजाळात अडकला असता तर शेतीतील पिकांचे शोध कधीच लागले नसते. सप्तरंगांची उधळण करणाऱ्या सूर्यालाही कधी वाटत नसेल की आपणही असे रंग परिधान करून उगवावं आणि मावळावं. अदृश्य शक्तीमुळे हे सर्व घडतंय असे थोतांड जन्मास घालायचे व पुढील पिढयांच्या मनावर अधिराज्य करायचे. असा हा भगवा जर्सी प्रकार.

रंगच  लक्की  असतात तर पाकीस्तानचा रंगही हिरवा होता मग ते सतत जिंकले असते. भगवा रंग भारताला लक्की असतात तर कालची मॅच आपण हरलो नसतो. तर भविष्यात आपण जिंकूही शकतो. अगदी निळा रंग असतातना विश्वचषक जिंकलो तसे. 2019 चा विश्वकप भारतानेच जिंकावा हे वेगवेगळ्या रंगाचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक भारतीयाचं स्वप्नच. शेवटी निळा, भगवा, काळा, पिवळा, हिरवा वगैरेवगैरे  रंगाच्या जर्सी घालून जरी भारत जिंकला तरी “तिरंगाच” खांदयावर डौलाने फडकेल. भगवा, निळा, अथवा हिरवा रंग खांदयावर घेता  येणार नाही. त्यामुळे रंगाचा वापर करून भावना भडकविणाऱ्यांच्या हाताचं बाहुलं आपण होणार नाही याची काळजी प्रत्येक भारतीयाने घ्यावीच! कारण जसं मुफ्तीबाईंनी राजकीय अंगाने रंगावर वक्तव्य केलंय. त्याच प्रकारे राजकीय अंगाने भगव्या रंगाच्या जर्षीचं राजकारण करणारे करू शकतात. अगदी निळया रंगाचा राजकीय अविष्कार करणारेही यात उतरू शकतात. जर्षीचा निळा रंग योग्य होता. त्यामुळेच धोनीच्या नेतृत्वाखाली आपण विश्वचषक जिंकलो असं मत अनेकांनी सोशल मिडीयावर मांडलं.

भारताने निळा रंग घेतला त्यावेळी एवढी चर्चा झाली नाही. अगदी विश्वकप जिंकला तेव्हाही. मुद्दा हा की अचानक भगव्या रंगाची जर्सी का बदलण्यात आली. समजा, बदल होणं आवश्यक  होतं. तरीही हरकत नव्हती. मात्र हे मिडीयात कुणी दिलं ? सर्वत्र भगव्या जर्सीवर चर्चा व्हावी असं वातावरण कुणी निर्माण केलं? याचा गांभिर्याने विचार करून हा रंगाचा उन्माद भारतीयाने थांबविला पाहिजे. अन्यथा भारत विश्वचषक जिंकेल तेव्हा खेळाडूंच्या मेहनत, पराक्रम व टॕलेंटचा गौरव न होता, भगव्या जर्सीमुळेच जिंकल्याचा गर्व वाटायला लागेल.हे खेळ, खेळाडू आणि देशाच्या क्रिडा विकासाकरिता घातक असेल….

@विशाल हिवाळे
(अध्यक्ष – संविधानवादी रिपब्लिकन पक्ष)

9022488113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *