@केशव वाघमारे

‘आर्यन’! नाव पण काय मस्त,भारी ठेवलेलं! म्हणजे, त्यांच्यात ‘मिसळून जाण्याचा’ हा प्राथमिक प्रयत्न होता. आणि दुसरा प्रयत्न म्हणजे की, देवळात जाण्याचा. म्हणजे, आरक्षितता कमी करण्याचे (ब्राह्मणी) मार्ग (बंधनं/सापळे) अधिक आरक्षितता वाढवतात!
पण लहान मुलाला असं नागडं करून तापलेल्या फरशीवर बसवायचं म्हणजे!? फार काही नाहीचं!
आलिया भोगाशी असावे सादर!! हे नविन आहे का?

अगदी काही महिन्यांपूर्वीच, वीट भट्टीवर काम करणाऱ्या मांग जोडप्याच्या मुलाने मालकाला  उलट शीवी दिल्याबद्दल, ‘आईसोबत संभोग कर, नाहीतर गू खा’, म्हणाल्यानंतरही फार आकांत-आक्रोश झालेला नव्हता. तर आता काय फार मोठा विरोध-विद्रोह घडेल असं नाही.

मागे नाही का, विहीरीत पोहल्यामुळं नागवी धिंड काढून मांग मुलांना मारलं होतं;

आणि एकदा हनुमानाच्या मंदिरात नवरदेव ‘जायचं’, म्हणतोय म्हणून वऱ्हाडासकट बुडवून काढलेलं.

तर प्रकरणं खूप आहेत. आणि गेल्या दहा वर्षात याचं प्रमाण वाढलंय.
( आता इथं मुद्दाम, ‘गेल्या पाच वर्षांत’ असं लिहून, ‘जात्याधारीत अन्याय- अत्याचार भाजपाच्याच काळात होतात’,  वगैरे! ज्या काँग्रेसींना अधोरेखित करायचंय, तर करू दे. त्यांची ‘भंपकगीरी’ त्यांच्याजवळ! म्हणजे काँग्रेस राजवट दलितांसाठी ‘मज्जाच मज्जा’ असल्यासारखं, हे काँग्रेसी बरळतांना बघून अजून त्यांची किव येतेय. कोणतही सरकार येवो, जातीव्यवस्थेविरोधात निरंतर संघर्ष करावा लागणार आहे.)

जिथं मऊ तिथं कोपरानं खणलं जातं, हे ओघानं आलंच.
जसं पुरूषसत्तेने बहाल केलीली सत्ता गाजवायला सबल, सुरक्षित, प्रतिकार करू शकणाऱ्या स्त्रीयांची शरीरे धोक्याची आहेत;
म्हणून, अधिक दुबळ्या,  प्रतिकार क्षमता विकसीत न झालेल्या स्त्रीयांच्या अर्थातच, लहान बालिकांच्या शरीराकडे बलात्काऱ्यांनी मोर्चे वळवलेत!
आणि जातीव्यवस्थेतून आलेली सत्ता गाजवायला ‘सक्षम, प्रतिकारक्षम दलित’ ही भूमी जरा धोकादायकच आहे! म्हणून दलितांमधल्या दुबळ्या, प्रतिकारहीन जाती अन्याय-अत्याचाराचे लक्ष्य बनवल्या जात आहेत.

सध्या वारंवार मांग जातीला तर्हेतर्हेच्या अन्याय -अत्याचार व अवमान-अवमूल्यनाला सामोरे जावं लागत आहे; याचे कारण म्हणजे, हा समूह उपद्रव क्षमता नसलेला, तीव्र प्रतिकारक्षमता नसलेला समूह आहे.
अन्याय -अत्याचार, अवमान- अवमूल्यनाची निरंतर मालिका खंडित करायची असेल तर मांग जातीला स्वाभिमानी, स्वायत्त ‘राजकीय वर्ग’ बनावं लागेलं, स्वतःला घडवावं लागेलं. (म्हणजे, तस तर  प्रत्येकच  आरक्षित जातीला राजकीय वर्ग बनण्याशिवाय पर्याय नाही. )

आता हे अगदी उलट आहे. म्हणजे, अन्याय अत्याचार करणार्या उच्च जातीयांनी स्वतःला ‘माणूस बनवेपर्यंत’ पिडीत- शोषित समूहाने काय करावं बरं?! त्यांच्या माणूस बनण्यापर्यंत आपली मानखंडना पहात बसावी काय? तर अगदीच नियोजित नाही पण ‘उत्स्फूर्त रिटनगिफ्ट’ द्यायला शिकावं.

जिथं ‘आमचं आम्ही बघून घेऊ’ म्हणणारे भरपूरैत! पण राजकीय भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा निव्वळ गोगलगाय होणारे पुढारी बघून, समाज ताठ उभा राहायला कसा शिकेल?
(अपवादांना सलाम.)
सध्या तरी जातीव्यवस्थेत आपण जगतोय, तिथं स्वसमूहाला बोटाला धरून लढायला शिकवणारे प्रशिक्षक, हे जातीतलेच असायला हवेत. मांग जातीतून स्वाभीमानी, स्वायत्त राजकीय भूमिका घेत, काही जणांनी अतिकठीण, कष्टांची वाटचाल सुरू केलीय तरीही ही जात म्हणावी तशी ‘राजकीय वर्ग’ न बनल्याने आणि या समूहात चालणार्या परिवर्तनवादी संघटना तुलनेने अधिकच साधनहीन असल्याने, या जात समूहांच्या विरोध -विद्रोहाच्या क्षमता फार धारदार नाहीत.

या विरोध- विद्रोहाच्या क्षमतांचा वापर ‘भलतेच’ घटक करू लागलेत. मांग समूहातील जाणकार आणि संघर्षशील नेतृत्वाने  स्वसमाजाला राजकीय भान देण्यासाठी महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढायला हवी. ज्यात सगळ्या अन्याय -अत्याचार प्रकरणांचे आकलन- विश्लेषण असणारी एक छोटी पुस्तिका सोबत असावी.
‘पाॅलिटीकल वर्ग’ बनण्या- बनवण्यासाठी कुठूनतरी सुरूवात करायलाच हवी. (ही अगदीच नवी सुरूवात होईल असे नाही, आपापल्या स्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत. मी इथं महाराष्ट्रस्तरावरील संघटीत कृतीकार्यक्रमाचं बोलत आहे.)

आता, ‘जिथं कुत्री- मांजरं जातात, तिथं आम्ही का जाऊ नये?’
एवढं भाबडं आकलन चालणार नाही.
जिथं कुत्री- मांजरं जातात, तिथं माणसांना का जावंसं वाटतं? किंवा तिथं माणसांनी का जावं? याने, भाय, कुछ तो हैं  उधर!
‘तेव्हा, आतातरी मांगांनी हिंदू धर्माला…..’ वगैरे टाईपच्या धर्मांध टिप्पण्या थांबवल्या तर बरं होईल.
तर आंबेडकरवादी लढा हा केवळ बौध्दांच्या स्वसन्मानाचा लढा नाही,  बौद्ध  असो वा हिंदू. वा अन्य कुणी, त्याच्या माणूस म्हणूनच्या सन्मानाची लढाई ही आंबेडकरवादी म्हणून, लढावी लागणारच आहे.
बौध्दधम्मदिक्षीतांपुरतं, कोत्या मन-बुध्दीचं आकलन असलेले लोकं स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात! म्हणजे, खरंच गंमत्तै!

#धम्मसंगिनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *