इतिहास हा समकालात प्रतिबिंबित होत असतो, तो समकालीनही असतो या धारणेतून कर्नाडांनी नाटकं लिहायला सुरुवात केली. विशेषतः त्यांची ऐतिहासिक व्यक्तींवर बेतलेली जी नाटकं होती ती इतर भाषांमध्ये करण्यासाठी सुलभ असल्यानं तिच जास्त पोहचली. ययाती त्यांचं पहिलं नाटक होतं. अमोल पालेकरांनी हयवदन केल्याचं आठवतं ते पाहिलं होतं. तुघलक असो की बसवराजांवरचं तलेदंड. त्यांचा इतिहासाकडे पाहाण्याचा कोन तिरका होता. कारण ते आजच्या काळात जागरूकतेनं मागे पाहत होते. तलेदंडचं टायमिंग मंडल आयोगाच्या वेळचा गदारोळ आणि बाबरी मशिदीचं उद्ध्वस्त केलं जाणं यांच्याशी जुळून आल्यानं त्याचा परिणाम गडद झाला होता. तुघलकात त्यांना समता शोधणारा प्रशासक दिसला होता. त्यांची नाटकं गाजली. देशभरातल्या वेगवेगळ्या भाषेतल्या दिग्गज रंगकर्मींनी ती केली. त्यातली काही पाहता आली. पण नंतर मी ती वाचून काढली.

लेखक होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या भूमीचा दोन हजार वर्षांचा (तरी) सांस्कृतिक-राजकीय आणि सामाजिक इतिहास नीट माहीत असला पाहिजे असं राम बापट म्हणायचे. कर्नाडांच्या बाबतीत ते खरंच झालेलं होतं. त्यांचं ऱ्होड्स स्कॉलर असणं, शिकत असतांनाच ययातीपासून नाटक लिहायला लागणं, संस्कृत आणि पाश्चिमात्य साहित्याचा सखोल व्यासंग, मराठी-पारशी नाटकांचा इतिहास नीटपणे माहीत असणं, अनेक विधांमध्ये त्यांनी यशस्वी कारकीर्द करणं हे त्यांना त्यांच्या जन्माच्या प्राधिकारातून प्राप्त झालेलं होतं हे खरं असलं तरी ते बाहेरच्या जगाकडे उत्सुकतेनं, करूणेनं पाहात होते हे त्यांच्या लेखनावरून दिसतंच.

काही वर्षांमागे पुण्यात त्यांच्या ‘बिखरे बिंब’चे दोन प्रयोग व्हायचे होते. तेव्हा एलकुंचवारसुद्धा पुण्यात येणार होते. त्यामुळे भेटण्यासाठी मी त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले, तू प्रयोगाला आयुकात येणारेस ना? तिथंच भेटू. प्रयोगाआधी तिथं गेलो तेव्हा ते बाहेरच्या हिरवळीवर उभे होते आणि त्यांच्यासोबत कर्नाडही होते. थोड्यावेळानं मी म्हटलो, आत जायचं ना? तर ते म्हणाले, जाशील रे, थांब इथंच. आपण इथंच गप्पा मारू. प्रयोग उद्याही आहे तू उद्या बघ. तर मग नाटक संपेपर्यंत आम्ही तिथंच बेंचवर गप्पा मारत बसलो. कर्नाड कमी बोलत होते. बिखरे बिंब कसं सुचलं यावर ते म्हणाले गेली काही वर्षं मी अचानक सर्वत्र वाढलेल्या प्रतिमांनी अस्वस्थ झालो होतो. बिलबोर्ड्स, बॅनर्स, पोस्टर्स, निऑन साईन्सचा झगमगाट आणि इमेजिस सर्वत्र. त्या अस्वस्थतेतून हे सुचलं. त्याला कारण एका लेखिकेचं चरित्रही असावं. तेव्हा चांगल्या निवांत गप्पा झाल्या होत्या आणि मी बराचसा श्रोता म्हणूनच त्यात होतो.

त्यांना ४-५वेळा वेगवेगळ्या वेळी ऐकलं. त्यांचं वक्तृत्त्व मला प्रभावी वाटलेलं होतं. नेमकी भाषा आणि भाषेतलं नाट्य याचं महत्त्व ते जाणत. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या पहिल्या साहित्य संवादाला ते आले होते. अलेक पदमसी, विष्णु खरे, इंदिरा गोस्वामी आणि अनेक मोठे लेखक तेव्हा आलेले होते. त्यानंतर इब्राहिम अल्काझींना पुण्यात पहिला तनवीर सन्मान मिळाला तेव्हा तो कार्यक्रम उत्तमच झालेला होता. नसिरुद्दीन शहा होते आणि त्यांचे तीन शिक्षक- महेश एलकुंचवार, गिरीश कर्नाड आणि स्वतः अल्काझी. विजयाबाईही होत्या. सर्वांची भाषणं स्मरणीय झाली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे जनरली उद्घाटकांची भाषणं उत्तम झालेली आहेत आणि गाजलेलीही आहेत.  म्हणजे अशोक वाजपेयी, सुभाष मुखोपाध्याय, सुरजित पातर ही काही चांगली उदाहरणं आठवतात. या साखळीत आधी कर्नाडांचं रेडिओवर भाषण ऐकलं होतं. सरोज देशपांडे यांनी उत्तम भाषांतर केलेलं ते भाषण कर्नाडांनी मराठीत वाचलं होतं. लेखकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यासाठी द्यावं लागणारं मोल यावर एमिल झोलापासून अनेक लेखकांची आणि प्रसंगांची उदाहरणं देत ते लक्षात राहील असं भाषण होतं. नंतर ते प्रतिष्ठानच्या अंकातही बहुधा छापलं होतं.

त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं आणि त्याचा एक ऑरा होताच. सगळं लेखन आवडेल असंही नव्हतं. त्यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या भागानं मला निराश केलं होतं. पण त्यांचे सिनेमे मला आवडले होते. विशेषतः संस्कार, कलयुग, उत्सव आणि चेलुवी. गेल्या काही वर्षात भारतात स्पष्टवक्तेपणाचे निर्भीड प्रयोग करणाऱ्या अगदी मोजक्या लेखकांपैकी ते एक होते. आणि त्यामुळेही माझा त्याच्याविषयीचा आदरभाव दुणावला होता. स्पष्टपणे भूमिका मांडण्याचं मोलही ते चुकवत होतेच. थेट भूमिका घेणारे अधिकाधिक लेखक नेमके कन्नड असावेत हा योगायोग चकित करतोच. लेखकाचं शील त्याच्या ताठपणे भूमिका घेण्यात असतं. म्हणूनही कार्नाड शीलवान लेखक ठरतात.
अनंतमूर्तींनंतर कार्नाडांनीही निघून जाणं त्यामुळे क्लेशदायक आहे.

@ गणेश विसपुते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *